प्रशासकीय चौकटीपलीकडे जाऊन समाजाचा कॅनव्हास न्याहाळणारे आणि कलाकृतीच्या रंगमंचावर भावनांचे रंग भरणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व दिगंबर आचार्य यांच्याविषयी...
दिगंबर यांचे बालपण डोंबिवलीतले. त्यांची आई धनश्री शिक्षिका असल्याने, शिस्तीचे आणि शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातूनच लाभले. त्यांचे वडील राजेंद्र हे खासगी कंपनीमध्ये ‘अकाऊंट मॅनेजर’ या पदावरून सेवानिवृत्त झाले.
दिगंबर यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीच्या आर. व्ही. नेरूरकर शाळेत झाले. त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले. दिगंबर यांनी ‘मराठी’ या विषयात पदवी संपादन केली असून, त्यानंतर त्यांनी कला पदव्युत्तर पदवी ‘समाजकार्य-शहरी आणि ग्रामीण समुदाय विकास’ या विषयात घेतली. सध्या ते ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क’ येथे ‘पीएचडी’ करत आहेत. त्यांनी ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे’च्या खारघर शाखेतून, ‘शहरी आणि ग्रामीण समुदाय विकास’ या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. तसेच दिगंबर सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क’ येथे, ‘पीएचडी’च्या माध्यमातून ‘सेरेब्रल पाल्सी’ व्यक्तींच्या पुनर्वसनाबाबत मुंबईमधील वास्तवाचा शोध घेत आहे. दिगंबर विविध सामाजिक संस्थांशी सल्लागार म्हणून जोडलेले असून, सध्या ‘पर्किन्स इंडिया’ या दिव्यांगांच्या विषयात जागतिक स्तरावर कार्य असलेल्या संस्थेचे सल्लागार आहेत.
भारतात आज समावेशक विकास, दिव्यांग अधिकार, ‘सीएसआर’, ‘ईसीजी’ आणि शाश्वत विकास या विषयांवर काही जण भरीव कार्य करत आहेत. काही व्यक्ती त्यात चर्चेची दिशा ठरवतात. नव्या पिढीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून, दिगंबर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा हा प्रवास संघर्ष, सातत्य, अभ्यास आणि समाजाला वेगळ्या नजरेने पाहण्याच्या दृष्टिकोनातून उभा आहे. त्यांचे संशोधन केवळ शैक्षणिक प्रबंध नाही, ते पालक, कुटुंब, पुनर्वसन संस्था आणि शासन यांच्यातील वास्तवाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणारा अभ्यास आहे.
गेल्या दशकभरात दिगंबर यांनी दिव्यांग समावेशन, विविधता समता आणि समावेशकता, समुदाय विकास, शाश्वत विकास यांमध्ये विविध संस्थांसोबत काम केले असून, अनेक उपक्रमांचे नेतृत्वही केले आहे. त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर ते दिव्यांगत्वाकडे मानवी अधिकार, सामाजिक न्याय आणि समान संधीच्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांनी सामाजिक क्षेत्रातील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथे ‘फील्डवर्क सुपरवायझर’ म्हणूनही कार्य करत, अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. विल्सन कॉलेजमध्ये ‘विल्सन सोशल रिस्पॉन्सबिल्टी सेल’सारखी अभिनव संकल्पना उभारून, हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना समाजाशी जोडले. ‘अपनालया’मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी, शहरी दिव्यांग समावेशनाच्या क्षेत्रात नेतृत्व केले आहे. तसेच, ‘उम्मीद चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर’मध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण व गुणवत्ता विकास उपक्रमांमध्येही योगदान दिले.
दिगंबर यांच्या मते, ‘सीएसआर’ म्हणजे समाजात मोजता येईल असा बदल घडवणे. तर, ‘ईसीजी’ म्हणजे केवळ अहवाल नव्हे, तर संस्थेच्या संस्कृतीत समावेशकता रुजवणे, हीच विचारसरणी त्यांना सामाजिक क्षेत्र आणि कॉर्पोरेट जग यांच्यातील दुवा बनवते. याशिवाय, दिगंबर हे कीर्ती कॉलेज, ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’, ‘जन शिक्षण संस्था (रायगड)’ आणि विल्सन कॉलेज येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवतात. दिगंबर यांनी केवळ सामाजिक क्षेत्रातच काम केले आहे असे नाही, तर रंगभूमी, चित्रपट आणि माध्यम क्षेत्रातील तब्बल १७ वर्षांचा अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच धार देतो. कार्यकारी निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, न्यूज अँकर आणि प्रभावी जनसंपर्कतज्ज्ञ आणि तांत्रिक प्रमुख अशा विविध भूमिकांमध्येही त्यांनी मुशाफिरी केली आहे. मागील १७ वर्षांपासून रंगभूमीशी त्यांचा सक्रिय संबंध असून, त्यांनी अनेक प्रयोगशील नाट्यप्रयोगांना यश मिळवून दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक विभाग अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. ‘झी गौरव’ पुरस्कारासाठी नामांकन, तसेच ‘आंतरराष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिक’मध्ये भारताचे प्रतिनिधित्वही त्यांच्या कलात्मक प्रवासातील मैलाचा दगड ठरले आहे.
स्पर्धा-परीक्षा क्षेत्रातही त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, ‘यूपीएससी’त अंतिम मुलाखतीपर्यंत मजल मारणे, हे त्यांच्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहे. त्याचबरोबर ‘एनएसएस’मधील नेतृत्व, सामाजिक संस्थांशी बांधिलकी आणि विविध स्वयंसेवी उपक्रमांतील सक्रिय सहभागांमुळे त्यांची सामाजिक ओळख अधिकच समृद्ध झाली. संशोधन आकडे सांगते आणि कला माणसांच्या भावना जागृत करते. पण, ही दोन्ही शस्त्रे त्यांनी समाजपरिवर्तनासाठी वापरली. दिगंबर यांच्या मते धोरणे बदलणेच पुरेसे नाही; समाजाची मानसिकताही बदलली पाहिजे. संशोधन जर समाजापर्यंत पोहोचलेच नाही, तर ते केवळ ग्रंथालयापुरतेच मर्यादित राहते. म्हणूनच संशोधन, अध्यापन, कला आणि सामाजिक कृती यांचा संगम आवश्यक आहे. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला, पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!