संघ समर्पणातून साकारलेले कार्यवैभव

    27-Jul-2026

 
Balasaheb Thakura

 

 
संघकार्य हे केवळ एखादे दायित्व नसून ते एक जीवनमूल्य आहे. अशा जीवनमूल्याशी स्वतःला पूर्णतः एकरूप करून, अखंड समर्पणाने कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी ठरते. कै. बाळासाहेब ठाकूर हे अशाच कार्यकर्त्यांपैकी एक होते. संघकार्य, वनवासी समाजसेवा, विवेकचे कार्य आणि बाल स्वयंसेवकांवरील अपार प्रेम यांतून त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श उभा केला. त्यांच्या कार्याचा हा परिचय म्हणजे एका समर्पित स्वयंसेवकाच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाला वाहिलेली कृतज्ञ मानवंदना.

कै. बाळासाहेब ठाकूर यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी एकरूप झालेले होते. संघकार्याविषयीची त्यांची निष्ठा, साधेपणा, कार्यकर्त्यांप्रती असलेले प्रेम आणि सातत्य यामुळे ते अनेक स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थान ठरले.

करवडी येथे पाटबंधारे खात्याच्या आरफळकण्हेर कालवा विभागात ते नोकरीला होते. नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाही संघकार्याकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही. करवडी गावात त्यांनी अनेक वर्षे नियमित शाखा चालवली. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर साडेपाच वाजता शाखेला सुरुवात होत असे. प्रारंभी शाखेत मोजकीच मुले येत; मात्र त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हळूहळू अनेक बाल स्वयंसेवक शाखेत सहभागी होऊ लागले. करवडी गावात संघकार्याची पाळेमुळे रुजविण्यात बाळासाहेबांचा मोलाचा वाटा होता.

भवानी सायंशाखा सायंकाळी सहा वाजता लागत असे. या शाखेचे पालक म्हणून बाळासाहेब नोकरी आटोपून साधारण साडेसहाच्या सुमारास शाखेवर पोहोचत असत. शाखेवर आल्यानंतर ते आवर्जून शिशुगण स्वतः घेत. विशेष म्हणजे शिशुंना शिकविताना ते स्वतःही शिशु बनून खेळत असत. त्यांच्या या समरसतेमुळे लहान मुलांना त्यांच्याशी विशेष आपुलकी वाटत असे. त्यांचे मनही शिशुवर्गाप्रमाणे निर्मळ, कोमल आणि प्रेमळ होते. ते अत्यंत मितभाषी होते; परंतु त्यांच्या कृतीतून आणि वर्तनातूनच त्यांचे संस्कार व कार्यकर्तृत्व व्यक्त होत असे.

वनवासी कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव कुलकर्णी एकदा त्यांच्या घरी आले होते. त्या भेटीत झालेल्या चर्चेने प्रेरित होऊन बाळासाहेबांनी एक वर्षासाठी वनवासी कल्याण आश्रमाच्या विक्रमगड आणि कनाशी प्रकल्पात कार्य केले. वनवासी समाजासाठी केलेली त्यांची ही सेवा त्यांच्या व्यापक सामाजिक बांधिलकीचे द्योतक आहे.

विक्रमगडहून परतल्यानंतर त्यांनी साप्ताहिक विवेकचे काम पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान स्वीकारले. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी हे कार्य नव्या उमेदीने सुरू केले आणि जवळपास पंचवीस वर्षे अविरतपणे त्यात सातत्य राखले. या कामासाठी ते अनेकदा मुंबई येथे होणाऱ्या बैठकींना नियमित उपस्थित राहत असत. त्यांच्या चिकाटीमुळे आणि निष्ठेमुळे विवेकचे कार्य परिसरात अधिक दृढ झाले.

संघकार्याबरोबरच बाळासाहेबांना चित्रकलेची विशेष आवड होती. खेळांमध्येही त्यांना प्राविण्य होते. टेबल टेनिस आणि कबड्डी हे त्यांचे आवडते खेळ होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आसपास सांगली येथे होणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या कबड्डी स्पर्धांमध्ये ते उत्साहाने सहभागी होत असत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शारीरिक क्षमता, कलात्मकता आणि संघभावना यांचा सुंदर संगम होता. त्यांचे मोठे बंधू लक्ष्मण ठाकूर हेही संघाचे स्वयंसेवक होते आणि कराड येथील घोष पथकात उभे राहत असत. त्यामुळे ठाकूर कुटुंबात संघकार्याचे संस्कार दृढपणे रुजलेले होते.

कै. बाळासाहेब ठाकूर यांनी प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे, सातत्याने आणि समर्पित वृत्तीने संघकार्य केले. त्यांचा साधेपणा, कार्यकर्त्यांवरील प्रेम, बाल स्वयंसेवकांशी असलेली आत्मीयता, वनवासी समाजासाठी केलेली सेवा आणि विवेकच्या कार्यासाठी दिलेले प्रदीर्घ योगदान ही त्यांची कायम स्मरणात राहणारी जीवनवैभवे आहेत. त्यांचे जीवन प्रत्येक स्वयंसेवकासाठी निष्ठा, समर्पण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे आहे. कै. बाळासाहेब ठाकूर यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.





संबंधित मजकूर