ठाणे : (Thane Municipal Corporation Flood Relief Dahanu) अतिवृष्टीमुळे डहाणू परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीच्या विठ्ठलभक्तीबरोबरच समाजसेवेचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज (२५ जुलै) विशेष मदत पथक रवाना केले आहे.
डहाणू परिसरात निर्माण झालेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी मदत व स्वच्छता कार्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील २०० कर्मचारी, १० स्वच्छता निरीक्षक आणि ५ उपमुख्य स्वच्छता निरीक्षक यांचे विशेष पथक आवश्यक साहित्य व उपकरणांसह पाच बसेसद्वारे डहाणूकडे रवाना करण्यात आले आहे. (Thane Municipal Corporation Flood Relief Dahanu)
याशिवाय जेटिंगच्या १० गाड्याही स्वच्छता मोहिमेसाठी पाठविण्यात आल्या असून, डहाणू नगर परिषदेसोबत समन्वय साधत "स्वच्छतेची वारी" या संकल्पनेअंतर्गत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
पूर ओसरल्यानंतर परिसरातील कचरा हटविणे, चिखलाची साफसफाई, निर्जंतुकीकरण तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना या पथकाकडून करण्यात येणार आहेत. (Thane Municipal Corporation Flood Relief Dahanu)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने "सेवा हीच खरी विठ्ठलभक्ती" या भावनेतून ठाणे महानगरपालिकेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे पाऊल उचलले आहे.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून राज्य प्रशासन व स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधत मदत व पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग घेतला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली. (Thane Municipal Corporation Flood Relief Dahanu)