... आणि मुंबई थांबली नाही!

    26-Jul-2026


Mumbai Flood Management २०२६
 
आज दिनांक दि. २६ जुलै...हा दिवस मुंबईकरांच्या स्मृतिपटलावर कायमचा कोरला गेला, तो २००५च्या महापुरामुळे! आज त्या घटनेला २१ वर्षे लोटली असली, तरी त्या महापुराच्या वेदना मुंबईकरांच्या आजही स्मरणात आहेत. या पुरानंतर मुंबईतील मिठी नदीचा प्रश्न प्रामुख्याने ऐरणीवर आला. पूरपरिस्थिती रोखण्यासाठी उपाययोजनांच्या घोषणाही झाल्या. मात्र, त्यानंतरही कित्येक पावसाळे नालेसफाई, पाणी तुंबणे हे प्रश्न कायम राहिले. मात्र, यंदाच्या पावसात मुंबईत काही ठिकाणी पाणी तुंबले असले, तरी मुंबईची गती थांबली नाही. तेव्हा मुंबई महानगरपालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर यादृष्टीने केलेले नियोजन आणि उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...
 
यावर्षी मुंबई शहरात महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर, आपल्या सर्वांना दि. २६ जुलै २००५ची आठवण आल्याशिवाय राहात नाही. दि. २६ जुलै २००५चा ज्या-ज्या वेळेला उल्लेख होतो, त्या प्रत्येक वेळेला मुंबई शहरावर ओढावलेली गंभीर परिस्थिती, त्या दिवशी पडलेला पाऊस व मुंबईकरांनी अनुभवलेली स्थिती असा पटच पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतो. ती परिस्थिती पुन्हा मुंबई शहरात उद्भवू नये म्हणून अनेक योजना राबविल्या गेल्या, त्याची अंमलबजावणी सुरू झाली, काही योजना केवळ कागदावरच राहिल्या; परंतु यावर्षी मुंबई शहरात संपूर्ण पावसाळ्यामध्ये पडणारा पाऊस केवळ चारच दिवसांत पडला. या चार दिवसांमध्ये, एकूण पावसाळ्यादरम्यान पडणार्‍या पावसाचे ४० टक्के पाणी मुंबई शहरात आले. परंतु, एवढा पाऊस पडूनदेखील, मुंबई शहरात कुठेही जनजीवन विस्कळीत झाले किंवा मुंबई थांबली नाही. केवळ अर्ध्या तासात मुंबई शहरातले पाणी, यावेळी ‘ड्रेनआऊट’ झाले अथवा ओसरले. त्यामुळे मुंबई थांबल्याचे चित्र यावेळेला कुठेही उभे राहिले नाही. मुंबई शहरामध्ये यावेळेला नेहमी पाणी भरणार्‍या विविध ५४७ ठिकाणी, पंप बसविण्यात आले होते. या पंपातूनच पवई तलाव आठवेळा भरेल किंवा विहार तलाव आठवेळा भरेल, एवढे पाणी आपण समुद्रात सोडण्याचे काम केले आहे.
 
प्रत्येक वर्षी नालेसफाईवरून चर्चा होते. यावर्षी तर विरोधकांनी नालेसफाई या विषयावरून खूपच मोठा गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जणूकाही खूप मोठाच भ्रष्टाचार झाला असून, यावर्षी मुंबई बुडणार अशा पद्धतीचे वातावरण करण्याचाही प्रयत्न केला. वास्तविक, मुंबई शहरात महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर, एकूणच कारभार मार्च महिन्यात सुरू झाला. त्यानंतर मुंबई शहरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर, अनेक ठिकाणी जुन्या कंत्राटदारांनी टेंडरच भरले नाही. मुंबई शहरात नालेसफाईची टेंडर भरणारी एक मोठी साखळी होती. जी अनेक वर्षे कार्यरत आहे. मधल्या काळात तर मिठी नदीचा गाळ उपसण्यात, राजकीय नेत्यांचे हितसंबंध असलेल्या सिने-अभिनेत्यांच्या नावानेदेखील टेंडर भरून भ्रष्टाचार झाला. यामध्ये मुंबईकरांचा पैसा कसा कुठे जातो, ते आपण सर्वांनी पाहिले.
 
परंतु, या सर्व घडलेल्या घटनांमधून धडा घेऊन प्रत्यक्ष काम होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात आले. मुंबई शहरामध्ये दि. ७ जून रोजी वेगवेगळ्या ठिकाणी सफाईचे काम सुरू होते. काही ठिकाणी या कंत्राटदारांना काम देण्यात आले होते, त्यांनीच ते काम यावर्षी केले, तर काही ठिकाणी नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक वेळेला चर्चेचा विषय असतो, तो म्हणजे मिठी नदी आणि कुर्ला परिसर! आश्चर्य म्हणजे, यावेळेला कुठेही मिठी नदी व कुर्ला परिसर यांची फार चर्चा झाली नाही. याचे कारण, फारसे पाणीच याभागात तुंबले नाही. तसेच, काही विरोधी पक्षाला हवे असलेले चित्रही यावर्षी दिसले नाही. मिठी नदीतून गाळ काढण्याची जी प्रक्रिया दरवर्षी केली जाते, त्यापेक्षा यावर्षी प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. प्रत्येक वर्षी जे आकडे दाखवण्यात येत होते, त्यात तफावत असून ते फुगवून दाखवल्याचे वारंवार सभागृहात मी मांडले होते. त्याचे कारण वाहतूक करणारे डंपर त्यांचे वजन काटे आणि या डंपरमधून डेब्रिजची वाहतूक करून बिल काढणे, हा प्रकार वारंवार दिसून येत होता.
 
आजपर्यंत सत्ताधारी म्हणून ज्यापद्धतीने यावर लक्ष देणे किंवा कारवाई करणे हे अपेक्षित होते, ते काहीच न घडल्याने या कंत्राटदारांचे प्रत्येक वेळेला फावले होते. परंतु, यावर्षी मात्र कारवाईच्या भीतीने किंवा खोटी आकडेवारी दिल्यास तुरुंगात जावे लागेल आणि ‘स्टॅण्डिंग कमिटी’मधली ‘अंडरस्टॅण्डिंग’ बंद झाल्यामुळे, आपल्याला काम करावे लागेल हे कंत्राटदाराच्या लक्षात आल्याने, काही कंत्राटदार मागे हटले. परंतु ज्यांनी काम केले, त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. यावर्षी गाळ काढल्यानंतर कुठेही मिठी नदीबाबत तक्रार आली नाही. विरोधी पक्षांनी याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, मुंबई शहरात मिठी नदी किंवा इतर परिसर अंधेरी सबवे, दहिसर सबवे, मिलन सबवे यांचा परस्परसंबंध जोडण्याचा प्रयत्नही केला पण, वस्तुस्थिती तशी अजिबात नाही.
 
अंधेरी सबवे हा पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जमीन सपाटीपासून १८ मीटर खाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच तिथे चारही बाजूने येणारे पाणी आले की, सबवे बंद होतो. परंतु, यावर्षी दहिसर सबवे एकदाही बंद झाला नाही. हे कशाचे उदाहरण असेल, तर बसवलेली पंपिंग यंत्रणा व झालेली नालेसफाई आणि वेळेचे अचूक नियोजन याचेच. त्यामुळेच यावर्षी ती परिस्थिती मुंबई शहरात उद्भवली नाही. हिंदमाता, गांधी मार्केट, सायन परिसर इत्यादी नेहमीच्या परिसरांमध्ये तर चार दिवसांतच पाऊस २२५ मिलिमीटरपर्यंत पडला. त्यानंतर समुद्रातील भरतीच्या वेळेला जी परिस्थिती येते, ती वगळता कुठेही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाणी तुंबले नाही. नियोजन केले व प्रामाणिकपणे काम केल्यास, मुंबईचे चित्र बदलू शकते व मुंबईकरांनाही दिलासा मिळू शकतो, हेच यातून दिसले. नालेसफाईच्या बाबतीत म्हणाल, तर एस विभागात जी आकडेवारी आली, ती मुळात सरासरीपेक्षा नालेसफाई कमी झाल्याचे दर्शवित होती. परंतु, एस विभागामध्ये मात्र, कुठेही पाणी भरल्याचे यावेळेला चित्र दिसले नाही. मिठी नदीच्या आसपास असलेले उषानगरसारखे नाले हे दरवेळी भरतात. यावेळेला मात्र तसे चित्र दिसले नाही. यावेळी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, मी स्वतः व इतर सर्व स्टॅडिंग कमिटीच्या सदस्यांसोबत, आम्ही जवळपास पाचवेळा पाहाणी दौर्‍याचे आयोजन केले. कुर्ला परिसर असेल, मिठी नदी असेल, मिठी नदीत त्या चार भागांमध्ये आम्ही प्रत्यक्ष नाल्याच्या किनार्‍यावर जाऊन पाहणी केली. मानखुर्द नाला असेल, समडा नाला असेल, मानखुर्दच्या स्लोटर हाऊसच्या मागच्या बाजूचा नाला असेल, दहिसर नदी असेल इत्यादी ठिकाणीही आम्ही स्वतः गेलो होतो. सोबतच ब्रिटानिया नाला, वर्सोवा पंपिंग स्टेशन, वरळी पंपिंग स्टेशन अशा ठिकाणी जाऊन त्यांची व्यवस्थाही समजून घेतली. त्यात काही अडचणी असल्यास, त्या दूर होतील याची खातरजमा आम्ही करून घेतली. यामुळे पाचवेळा संपूर्ण मुंबईमध्ये आमचे नालेसफाई दौरे झाले. त्यामुळेच मुंबई शहरात प्रामाणिकपणे काम करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला, त्याचाच परिणाम स्वरूप आज मुंबई शहरात या पावसात आतापर्यंत तरी कुठेही पाणी भरले नाही. मुंबई शहराची स्थिती लक्षात घेता, आपण समुद्रसपाटीपासून काही भाग खाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी एका महिन्यापेक्षा जास्त पाऊस पडला, त्याठिकाणी पाणी भरते. परंतु, ते पाणी अर्ध्या तासाच्या आत ओसरण्यास सुरुवात होते. याचे कारण, यावेळी आपण मजबूत केलेली पंपिंग व्यवस्था कारणीभूत ठरली आहे. यावेळेला या पंपिंग व्यवस्थेमध्ये मूलभूत सुधारणा करून, अधिक क्षमतेचे व वेळेचे अचूक नियोजन असलेले व्यवस्थापन उभे केले. यामुळे यावेळेस मुंबई शहरात कुठेही पाणी भरले नाही. दि. २६ जुलै २०२६ येत असताना, मुंबई शहरातली बदललेली परिस्थिती ही आपल्या डोळ्यांसमोर आहे. मुंबई शहर यापुढे अधिकच सक्षमपणे या परिस्थितीला सामोरे जाईल, याची तयारी आपण प्रामाणिकपणे करत आहोत.
 
गणेश खणकर
(लेखक मुंबई महापालिकेत सभाग़ृह नेते आणि भाजपचे गटनेतेही आहेत.)




संबंधित मजकूर