ज्योत सेतू होऊन गेली...

    26-Jul-2026



माणसे जातात, आठवणी राहतात, असे आपण सहजच म्हणतो. पण काही माणसे अशी असतात की, त्यांच्या जाण्याने आठवणींपेक्षा अधिक हरवतो तो एक विचार, एक परंपरा, एक संस्कार आणि एक जिव्हाळ्याचा आधार! क्रांतिगीताताई महाबळ यांचे निधन हा असाच एक क्षण. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांशी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठावान राहिलेल्या या ध्येयवेड्या कार्यकर्तीने राष्ट्रीय कीर्तन, लेखन, व्याख्याने आणि संघटनकार्याच्या माध्यमातून असंख्य मनांत राष्ट्रभावनेची ज्योत प्रज्वलित केली. त्यांचे आयुष्य हे व्यक्तीपेक्षा विचार मोठा असतो, याचेच जिवंत उदाहरण ठरावे.
 

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला एक अतिशय दुःखद बातमी कानावर आली आणि मन काही काळासाठी सुन्न झाले. सावरकर विचारांची एक धगधगती मशाल, आचरणाने कट्टर हिंदुत्ववादी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निस्सीम अनुयायी असलेल्या क्रांतिगीता महाबळ यांच्या निधनाची ती वार्ता! एका प्रखर विचारधारेचा, एका ध्येयवेड्या आणि समर्पित पिढीचा एक महत्त्वाचा दुवा आज आपल्यातून हरपला. त्यांच्या जाण्यावर व्यक्त होताना, त्यांच्या आठवणींचा एक मोठा पटच माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो आहे. त्याचबरोबर सावरकर विचारांचे झालेले हे मोठे नुकसान किती भरून न येणारे आहे, याचीही प्रकर्षाने जाणीव होतेय.

क्रांतिगीताताईंचे संपूर्ण आयुष्यच हे सावरकर विचारांनी आणि हिंदुत्वाच्या ध्यासाने भारावलेले होते. दादरच्या ‘आयडियल बुक डेपो’च्या वरच्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य. दादरमधले त्यांचे हे घर म्हणजे, सावरकरभक्तांसाठी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी केवळ एक वास्तू नव्हती, तर ते एक हक्काचे व्यासपीठ आणि ऊर्जाकेंद्रही होते. आजच्या काळात ‘हिंदुत्व’ हा शब्द अभिमानाने मिरवणे कदाचित सोपे झाले असेल; पण एक काळ असा होता, जेव्हा सावरकर अनुयायांना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पावलोपावली प्रचंड मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असे. समाजात त्यांच्याभोवती एकप्रकारची अघोषित कोंडीच असे. अशा त्या अत्यंत प्रतिकूल, खडतर आणि उपेक्षेच्या काळात, खिशात पैसे नसतानाही जे मोजके लोक हिंदुत्वाचा विचार उराशी बाळगून खंबीरपणे टिकून राहिले, त्यांनी तो विचार नेटाने पुढे नेला, त्यामध्ये क्रांतिगीताताईंसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा वाटा सिंहाचाच.
 

माझे आजोबा आणि स्वातंत्र्यवीरांचे सचिव, आचार्य बाळाराव सावरकर यांच्या अवतीभोवती त्याकाळात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे एक अत्यंत भक्कम असे वलय असायचे. क्रांतिगीता महाबळ, मंदाकिनी भट, दिलीप सावंत, चंद्रशेखर साने, रवींद्र रामदास, आप्पा दाबके अशी अनेक नावे, या चळवळीचे आधारस्तंभ होती. ही सगळीच मंडळी बाळारावांच्या सोबतीत आणि सावरकर विचारांच्या छत्राखाली कायम एकत्र राहिली. सभोवतालच्या विरोधाचे कितीही झंझावात आले, तरी त्यांनी आपली वैचारिक एकजूट कधीच तुटू दिली नाही. स्वतःच्या खिशाला झळ लावून, पदरमोड करून त्यांनी विविध हिंदुत्ववादी उपक्रमही राबवले. केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता, विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून राज्यभर आणि देशभर दौरे करून, सावरकर विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आणि ते टिकवण्याचे अनन्यसाधारण कार्य या पिढीने केले. हे ऋण आजच्या पिढीने आणि हिंदुत्ववादी समाजाने कधीही विसरता कामा नये.
 
क्रांतिगीताताईंना कीर्तनाचा वारसा लाभलाच तो त्यांचे वडील आणि ज्येष्ठ कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचा. त्यांचे बंधू चारुदत्त आफळे हेदेखील प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार असून, हाच कौटुंबिक वारसा ताईंनीही अभिमानाने पुढे नेला. त्यांचा स्वभाव जितका रोखठोक आणि स्पष्टवक्ता होता, तितकाच त्यांचा आवाज अगदी एखाद्या कसलेल्या कीर्तनकारासारखा खणखणीत, पहाडी होता. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून त्यांची महती निश्चितच मोठी अशीच. त्यांच्या याच गुणाचा सावरकर विचारांच्या प्रसारासाठी मोठाच उपयोगही झाला. त्यांच्या आवाजाची भुरळ माझ्या आजोबांना म्हणजेच, बाळारावांनाही पडली होती. बाळारावांच्या कोणत्याही सार्वजनिक भाषणापूर्वी त्यांचा एक अत्यंत प्रेमाचा आग्रह असे की, कार्यक्रमाची सुरुवात ही क्रांतिगीताताईंच्या सावरकर गीतानेच व्हावी. ताईंनी आपल्या खणखणीत आवाजात सावरकरांचे एखादे स्फूर्तिगीत गायले की, संपूर्ण वातावरणात एक चैतन्य संचारे. सावरकरांची गीते गाण्याचा त्यांचा हा उपक्रम म्हणजे, एका प्रखर विचारधारेची आणि राष्ट्रीयत्वाची आळवणी होती.
 

त्या सावरकर साहित्याच्याही अत्यंत गाढ्या अभ्यासक आणि लेखिकाही होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या २४ कवितांचे निरूपण करून, त्यांचा अर्थ त्यांनी ‘वैनतेयाची गगनभरारी’ या पुस्तकात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. सावरकरांचे विचार सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे हे त्यांचे मोठेच साहित्यिक योगदान. त्या आजीव विश्वस्त असलेल्या दादरच्या सावरकर स्मारकातही शिकविण्याचे कार्य करत, जे अतिशय श्रवणीय आणि स्फूर्तिदायक असायचे. जुन्या विचारांच्या असूनही, त्यांनी आधुनिक माध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर केला. ‘फेसबुक’ आणि ‘युट्यूब’सारख्या समाजमाध्यमांवरही त्या खूप सक्रिय होत्या. ‘सिद्ध साधक साधना’ नावाच्या ‘युट्यूब’ चॅनेलमधून, त्या नियमितपणे आध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. नुकतेच ‘श्रीकृष्ण नीती’ या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचनही केले होते. पिंपरी-चिंचवडसारख्या ठिकाणी त्यांनी, ‘भान समाजमनाचे’ यासारख्या विषयांवरही व्याख्याने दिली होती. अगदी गणेशोत्सवातही उंदराव्यतिरिक्त श्रीगणेशाची इतर वाहने कोणती, अशा रंजक आणि पौराणिक माहितीवर त्यांनी समाजमाध्यमांवरून संवाद साधला होता. त्यांचा हा सर्व प्रवास पाहता, काळासोबत बदलून विचारांचा प्रचार कसा करावा, याचा एक उत्तम वस्तुपाठच.
 

आमच्या कुटुंबाशी त्यांचे नाते केवळ वैचारिकच नव्हते, तर ते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि घट्ट कौटुंबिक होते. माझा भाऊ संतोष हा गतिमंद होता. अशा मुलांसोबत वावरताना, अनेकदा बाहेरच्या लोकांना संकोच वाटतो. पण, क्रांतिगीताताईंचा संतोषवर विशेष जीव आणि संतोषचाही त्यांच्यावर तितकाच लोभ. आमच्या आजीसोबत जेव्हा संतोष दादरच्या बाजारात जाई, तेव्हा खरेदीनंतर ताईंच्या घरी जाऊन चहा पिऊन येणे, हा त्यांचा अगदी ठरलेला कार्यक्रम. ताईंच्या दादरच्या घरातून मिळणारा वाफाळलेला चहा आणि त्याहूनही अधिक मिळणारा तो जिव्हाळा, संतोषसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी खूपच मोलाचा होता. त्यांचा रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणा जेवढा प्रसिद्ध होता, तेवढीच त्यांच्या आत दडलेली एक अथांग प्रेमळ मातृवृत्ती यातून आम्हाला नेहमीच जाणवली.
 

कालांतराने त्यांचा मुलगा देवदत्त नोकरीच्या निमित्ताने पुण्याला गेला. त्यानंतर साहजिकच क्रांतिगीताताई आणि त्यांचे यजमानदेखील कायमचे पुणेकर झाले. दादरचे ते हक्काचे घर आणि नेहमीचा प्रत्यक्ष संपर्क थोडा कमी झाला. संपर्क बर्‍याचदा केवळ फोनपुरताच मर्यादित राहिला. तरीही, त्यांच्याशी असलेली विचारांची आणि प्रेमाची नाळ कधीच तुटली नाही. सावरकर विषयाशी संबंधित कोणतीही अडचण आली, एखादा संदर्भ हवा असेल तर क्रांतिगीताताईंशिवाय आमचे पान कधीच हलत नसे. सावरकर साहित्यातील आणि हिंदुत्वाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे दाखले, त्यांना चक्क तोंडपाठ होते. त्यांचा हिंदुत्वाचा आणि सावरकर साहित्याचा अभ्यास इतका प्रचंड आणि सखोल होता की, कोणत्याही अवघड प्रश्नाचे अचूक उत्तर त्यांच्याकडे हमखास असे. त्या खर्‍या अर्थाने चालता-बोलता ‘सावरकर ज्ञानकोश’च होत्या.
 

शेवटच्या काळात त्या आजारी पडण्यापूर्वी, त्यांच्या आयुष्यातील आणखी एक अत्यंत भावुक आठवण कायम माझ्या स्मृतीत कोरलेली राहील. केवळ माझ्यावरील प्रेमापोटी आणि मला भेटण्याच्या ओढीने, त्या पुण्याहून खास मुंबईत माझ्या घरी दोन दिवस मुक्कामासाठी आल्या होत्या. वय आणि तब्येत साथ देत नसतानाही, त्यांचा तो उत्साह वाखाणण्याजोगा होता. विशेष म्हणजे, आजारी असताना स्वतःची औषधे घेण्यासाठी दुकानात मी जातो असे सांगूनही, त्या स्वतः माझ्यासोबत दुकानात येण्यासाठी आग्रही राहिल्या. तब्येत बरी नसतानाही माझ्याबरोबर दुकानापर्यंत आल्यास, तितकाच वेळ माझ्याशी जास्त बोलता येईल, जुन्या आठवणींना उजाळा देता येईल आणि गप्पा मारता येतील, हा त्यामागचा त्यांचा निखळ आणि प्रेमळ हेतू होता. तो प्रसंग आठवला की, आजही मन गहिवरून येते. त्यांचा तो बाणेदार, स्पष्टवक्तेपणाचा स्वभाव आणि त्याच वेळी माझ्यावर भरभरून प्रेम करणारी त्यांची ती वात्सल्यमूर्ती मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
 

काही काळापूर्वीच त्यांच्या या प्रदीर्घ कार्याची, अभ्यासाची आणि निष्ठेची पावती म्हणून, ‘सावरकर साहित्य अभ्यास मंडळा’च्या अध्यक्षा म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली होती. ही निवड म्हणजे, त्यांच्या आजवरच्या वैचारिक तपश्चर्येचा एक यथोचित सन्मान होता. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी अतिशय उत्साहाने, संस्थेच्या भावी कार्यक्रमांची आणि वाटचालीची आखणीही करून दिली होती. त्यांच्या डोळ्यांत संस्थेसाठी अनेक स्वप्ने होती; पण दुर्दैवाने, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अचानक त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. आता त्यांनी आखून दिलेल्या त्या कार्यक्रमानुसार, त्यांच्याच ध्येय-धोरणांवरून पुढे ही संस्था यशस्वीपणे चालवणे, हे आम्हा सर्वांपुढे असलेले एक मोठे आव्हान असून, हे आव्हान समर्थपणे पेलणे हीच क्रांतिगीताताईंना आपली सर्वांत मोठी आणि खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल.
 

एका ध्येयनिष्ठ पर्वाचा, एका प्रखर आवाजाचा आज अस्त झाला आहे. सावरकर विचारांसाठी आपले उभे आयुष्य वेचणार्‍या, संकटांना न घाबरता छातीठोकपणे हिंदुत्वाचा विचार मांडणार्‍या आणि आयुष्यभर विचारांशी तडजोड न करणार्‍या क्रांतिगीताताई महाबळ यांना शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
 

मनःपूर्वक ॐ शांती!
 
 

- स्वप्नील सावरकर




संबंधित मजकूर