खजुराहोच्या लक्ष्मण मंदिराची खरी ओळख त्याच्या दगडांवरच्या विचारविश्वात आहे. येथे असलेले प्रत्येक शिल्प भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्म आणि मानवी जीवनदृष्टीचा साक्षेपी दस्तऐवजच. येथील असंख्य मूर्तीतून समाजजीवनाची असंख्य रूपे कोरताना, चंदेल शिल्पकारांनी विश्वाचीच एक प्रतीकात्मक रचना घडवली. लेखाच्या या दुसर्या भागात या मंदिराच्या शिल्पभाषेतील सूक्ष्म आशयाचा घेतलेला मागोवा...
मागील लेखात आपण खजुराहोच्या लक्ष्मण मंदिराची स्थापत्यरचना आणि चंदेल स्थापत्याच्या परिपक्वतेतील त्याचे स्थान जाणून घेतले. परंतु, खजुराहोची खरी ओळख केवळ त्याच्या शिखरांमध्ये किंवा आराखड्यात नाही; ती त्याच्या दगडांत कोरलेल्या विचारविश्वात आहे. लक्ष्मण मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून सावकाश चालताना हे मंदिर आपल्याशी बोलू लागते. प्रत्येक शिल्प, प्रत्येक कोनाडा, प्रत्येक अलंकार जणू एका मोठ्या कथानकाचाच भाग आहे. येथे दगड केवळ सजावटीचे माध्यम नाही; तो धर्म, तत्त्वज्ञान, समाजजीवन आणि मानवी अनुभव यांची भाषा होतो.
भारतीय मंदिर स्थापत्यात शिल्पांचा उद्देश केवळ सौंदर्यनिर्मिती नव्हता. मंदिर म्हणजे विश्वाचे प्रतीक मानले गेले. त्यामुळे त्याच्या बाह्यभागावर संपूर्ण विश्वाचेच चित्रण घडवले गेले. लक्ष्मण मंदिर हे याचेच उत्कृष्ट उदाहरण. बाह्य भिंतींवर देव-देवता, दिपाल, गंधर्व, सुरसुंदरी, व्याल, यक्ष, नर्तक, संगीतकार, सैनिक, शिकारी, पशुपक्षी आणि सामान्य लोकांचे जीवन अशा असंख्य प्रतिमा दिसतात. हे मंदिर पाहताना असे वाटते की, चंदेल शिल्पकारांनी संपूर्ण समाजच दगडात जतन केला आहे.
या मंदिराचा केंद्रबिंदू आहे, वैकुंठ विष्णू. सामान्यतः विष्णूची चतुर्भुज प्रतिमा सर्वत्रच दिसते; परंतु येथे प्रतिष्ठित असलेले वैकुंठ स्वरूप अधिक गूढ आणि तात्त्विक आहे. मुख्य मानवी मुखासोबतच सिंह आणि वराह ही दोन रूपे दर्शविली जातात. काही परंपरांमध्ये चौथे मुख मागील बाजूस मानले जाते. या रूपामध्ये विष्णू हा केवळ एका देवतेच्या स्वरूपात नसून संपूर्ण विश्वाचा रक्षक, धर्माचा आधार आणि विविध शक्तींचा समन्वय म्हणून उभा राहतो. चंदेल राजांसाठी ही प्रतिमा राजसत्तेच्या दैवी अधिष्ठानाचेही प्रतीक होती.
लक्ष्मण मंदिरातील शिल्परचना पाहताना सर्वप्रथम लक्ष वेधतात त्या सुरसुंदरी. आरशात स्वतःकडे पाहणारी दर्पणा, पायातील काटा काढणारी नायिका, नृत्याची तयारी करणारी अप्सरा, केस विंचरणारी स्त्री, पोपटाशी संवाद साधणारी सुंदरी या सर्व प्रतिमा, भारतीय शिल्पकलेतील स्त्री-सौंदर्याच्या सर्वोच्च अभिव्यक्ती मानल्या जातात. परंतु, ही शिल्पे केवळ सौंदर्यचित्रे नाहीत. भारतीय सौंदर्यशास्त्रात स्त्री म्हणजे सृजनशक्ती, समृद्धी आणि जीवनाचा उत्सव! मंदिराच्या बाह्यभागावर या प्रतिमा कोरण्यामागे जीवनातील आनंद, उत्साह आणि सर्जनशीलता यांचे स्वागत करण्याची भावना होती. त्याचबरोबर मनुष्य ज्या गोष्टींच्या आहारी जाऊ शकतो, त्या म्हणजे शब्द, रस, रूप, स्पर्श आणि गंध हे विकारदेखील या सुरसुंदरी शिल्पांमध्ये व्यक्त केले आहेत.
मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना काही ठिकाणी मिथुन शिल्पे दिसतात. आजही खजुराहोचा उल्लेख झाला की, सर्वप्रथम याच शिल्पांची चर्चा होते. परंतु, प्रत्यक्षात ही शिल्पे संपूर्ण शिल्पसंपदेच्या अत्यंत कमी भागात आहेत. अनेक संशोधकांनी याविषयी विविध मते मांडली आहेत. काहींच्या मते, ती तांत्रिक साधनेचे प्रतीक आहेत. काहींच्या मते, गृहस्थाश्रमाचे प्रतिनिधित्व करतात; तर काही अभ्यासक त्यांना पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती किंवा जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचे प्रतीक मानतात.
प्रसिद्ध संशोधक देवांगना देसाई यांच्या मते, या शिल्पांकडे केवळ कामदृष्टीने पाहणे हा मोठाच गैरसमज आहे. ती संपूर्ण मंदिराच्या तत्त्वज्ञानाचा एक छोटासा भाग आहेत. मंदिराच्या भिंतींवर जिथे देवता, ऋषी, समाजजीवन आणि विश्वरचना यांचे चित्रण आहे, तिथे मानवी जीवनातील प्रेम, दाम्पत्य आणि सृजन यांनाही स्थान देण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ समान महत्त्वाचे मानले गेले. लक्ष्मण मंदिराची शिल्पभाषा याच संतुलित जीवनदृष्टीचे दर्शन घडवते.
या मंदिराच्या अधिष्ठानावर कोरलेल्या आडव्या शिल्पपट्ट्याही तितयाच महत्त्वाच्या आहेत. हत्तींच्या रांगा, घोडेस्वार, युद्ध दृश्ये, शिकारी, वेलबुट्ट्या आणि पौराणिक प्रसंग यांमधून, त्याकाळातील समाजजीवनाचे जिवंत चित्र उभे राहते. विशेष म्हणजे प्रत्येक हत्ती, प्रत्येक सैनिक आणि प्रत्येक प्राण्याची मुद्रा वेगळी आहे. यावरून चंदेल शिल्पकारांनी केवळ पुनरावृत्तीच केली नाही, तर प्रत्येक प्रतिमेला स्वतंत्र व्यक्तिमत्त्वही दिले.
लक्ष्मण मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिपालांची मांडणी. आठ दिशांचे रक्षण करणार्या या देवतांमुळे, मंदिराची संपूर्ण रचना विश्वाच्या केंद्रस्थानी उभी असल्याची भावना निर्माण होते. पूर्वेला इंद्र, दक्षिणेला यम, पश्चिमेला वरुण, उत्तरेला कुबेर आणि इतर दिशांमध्ये उभ्या असलेल्या दिपालांमुळे, मंदिर हे केवळ एका देवतेचे निवासस्थान राहत नाही; ते संपूर्ण विश्वाचाच केंद्रबिंदू होते.
शिल्पांच्या अभ्यासातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे चंदेल कलाकारांनी मानवी शरीराचे अत्यंत सूक्ष्म असे निरीक्षण केले होते. वस्त्रांच्या घड्या, दागिन्यांचे वजन, स्नायूंची रचना, चेहर्यावरील भाव आणि हालचालीतील लय यांमध्ये विलक्षण वास्तववाद दिसतो. तरीही, या प्रतिमा वास्तववादी न वाटता आदर्शवादी वाटतात. कारण, त्यांचा उद्देश व्यक्तीचे चित्रण करणे नव्हता, तर सौंदर्याच्या आदर्श संकल्पनेला आकार देणे हा होता.
लक्ष्मण मंदिराच्या शिल्पांकडे पाहताना आणखी एक वैशिष्ट्य जाणवते ते म्हणजे, येथे कोणतीही प्रतिमा एकाकी नाही. प्रत्येक शिल्प दुसर्या शिल्पाशी संवाद साधते. देवतांच्या शेजारी सामान्य माणसे आहेत, राजांच्या शेजारी संगीतकार आहेत, युद्धाच्या शेजारी प्रेम आहे, तपस्येच्या शेजारी उत्सव आहे. भारतीय जीवनदृष्टीतील सर्व पैलू येथे एकत्र येतात. कदाचित, म्हणूनच खजुराहोची मंदिरे आजही जिवंत वाटतात.
कंदारिया महादेव मंदिरात ही शिल्पभाषा आपल्या सर्वोच्च उंचीवर पोहोचते; पण तिची बीजे प्रथम स्पष्टपणे रुजलेली दिसतात, ती लक्ष्मण मंदिरात. म्हणूनच, हे मंदिर केवळ स्थापत्याचा पाया नाही, तर चंदेल कलादृष्टीचा पहिला आत्मविश्वासपूर्ण उच्चार आहे. आज खजुराहोला भेट देताना बहुतेक पर्यटक कॅमेर्याच्या शोधात असतात; पण लक्ष्मण मंदिर आपल्याला एक वेगळाच धडा शिकवते. येथे प्रत्येक शिल्पाकडे काही क्षण शांतपणे पाहिले; तर जाणवते की येथील दगडही बोलत आहेत. त्याची भाषा शब्दांची नसली; तरी ती प्रतीकांची असते. ती धर्माची असते, तत्त्वज्ञानाची असते, जीवनाच्या उत्सवाची असते.
लक्ष्मण मंदिर म्हणजे केवळ विष्णूचे देवालय नाही. ते भारतीय संस्कृतीच्या सर्वसमावेशक दृष्टीचे दगडी हस्तलिखित आहे. या मंदिराच्या भिंतींवर कोरलेले विश्व आपल्याला सांगते की, आध्यात्मिकता ही जीवनापासून दूर जाण्यात नाही; तर संपूर्ण जीवन समजून घेण्यात आहे. म्हणूनच, खजुराहोचा प्रवास जर कंदारिया महादेवमध्ये परिपूर्णतेला पोहोचत असेल, तर त्याचा आत्मा प्रथम आपल्याला भेटतो तो लक्ष्मण मंदिराच्या या शांत; पण विलक्षण बोलक्या दगडांमध्ये!
इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४