इस्रायलचे अंतरंग...

    26-Jul-2026   
 
 
Israel Nationalism
 
चारही बाजूंनी शत्रूराष्ट्रांनी घेरल्यावरही इस्रायल शत्रूंना आणि शत्रूच्या मित्रांनाही जेरबंद करतो. तर, ‘तुम्ही शत्रुराष्ट्राने केलेल्या हल्ल्यावर कारवाई केली ती खोटीच आहे, अन्यथा त्याचे पुरावे द्या,’ असे आपल्याकडे म्हटले जाते.इस्रायलमध्ये कुणीही शत्रूराष्ट्राची तरफदारी करत नाही की, ‘हा देश माझा नाही, मला स्वधर्माची लाज वाटते’ असे म्हणणारे लोकही तिथे नाहीत. विविध राजकीय आणि सामाजिक विचारधारेचे लोक आणि संघटना तिथे आहेत. पण, त्यांना बांधून ठेवणारा एक बंध आहे, तो म्हणजे ज्यू-राष्ट्रवादाचा! इस्रायलच्या दौर्‍यात इस्रायल देशाचा, इस्रायलच्या जनतेच्या या प्रखर राष्ट्रवादाचा प्रत्यय अनेकदा आला. त्याचा मागोवा घेणारा लेख.
 
आम्ही गाझा पट्टीच्या दिशेने निघालो. उंच-सखल भाग, रस्त्याच्या एका बाजूला वीज सोडलेल्या कुंपणसदृश्य तारा होत्याच. याचाच अर्थ, पलीकडून इस्रायलमध्ये कुणी घुसण्याचा प्रयत्न केला, तर त्याची रवानगी थेट अल्लाकडेच. हा भाग बर्‍यापैकी निर्मुनष्य. आमचे नियोजित स्थळ आले. ती जागा उंच होती. तिथे बसण्याची व्यवस्थाही व्यवस्थित होती. तिथे असलेल्या दुर्बिणीतून खालची गावे स्पष्ट पाहण्याची सोयही होती. कुठून, कसा हल्ला झाला हे तिथे एक तरुण अतिशय शांत-संयतपणे सांगत होता. मी त्यांना विचारले, "तुम्हाला भीती नाही वाटत की, ते लोक परत हल्ला करतील?” प्रश्न विचारता क्षणीच इतका वेळ शांतपणे बोलत असलेल्या त्या तरुणाच्या डोळ्यांत जणू रक्तच उतरले. त्याचा मिश्कील चेहरा अगदी दगडासारखा स्तब्ध झाला. त्याचा मृदू आवाज बदलला आणि कठोर स्वरात तो म्हणाला, "काय म्हणालात? भीती? कुणाची? कशाला? जीवाची का? आमच्या इस्रायलपेक्षा जीव महत्त्वाचा आहे का? हा आमचा देश आहे. घाबरलो, जीवाची भीती करत राहिलो; तर ते पुन्हा कब्जा करतील. आम्हा ज्यूंचा हा एकमेव देश आहे, जसा तुमच्या हिंदूंचा एकमेव देश ‘इंडिया’ आहे, अगदी तसा! समजले का मॅडम, म्हणून या गाझा पट्टीच्या जवळपास देशासाठी काम करताना मलाच काय, कोणत्याही ज्यूला भीती वाटणार नाही.” कधी काय येईल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळेच देशापुढे जीवाच काय घेऊन बसलात, म्हणणार्‍या त्या तरुणामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती मला स्मरल्या, त्या म्हणजे ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण!’
 
भारतापासून अनेक मैल दूर असतानाही, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या महान सुपुत्रांसाठी डोळे पाणावले. अर्थातच, ‘मर जाऊंगा, देश नहीं मिटने दूंगा’ ही भावना मी आपल्या देशातही अनेक रा. स्व. संघाच्या खर्‍या स्वयंसेवकांमध्ये पाहिली होती. त्यामुळेच या तरुणाच्या भावना माझ्या मनाला भिडल्या. तसे पाहायला गेले, तर ज्यूंची इस्रायलभक्ती हा विषय नवा नाही. ती ज्वलंत आणि अगदी टोकाचीच म्हणूया. अशी राष्ट्रभक्ती यांच्यात आली कुठून? स्वतःच्या धर्मभूमीतून-मातृभूमीतून बळजबरीने, हिंसेने, अत्याचाराने विस्थापित झालेले ज्यू जगभरात विखुरले. मात्र, हजारो वर्षे जगभरातले ज्यू एकमेकांना भेटताना, ‘लल-शाना हबाआ ब-येरुशलाईम’ म्हणत (म्हणजे पुढच्या वर्षी जेरुसलेममध्ये). देश, मातृभूमी पुन्हा मिळवण्यासाठी मातृभूमीपासून दूर राहूनही त्यांनी दहा शतके संघर्ष केला, तग धरला. हजार वर्षांच्या कठीण काळानंतर, शेवटी १९४८ साली ज्यूंचे राष्ट्र म्हणून इस्रायलचा उदय झाला. हजार वर्षांपूर्वीच्या ज्यूंच्या मनात हा देश निर्माण करतानाचा जो संघर्ष, वेदना, धर्माभिमान, मातृभूमी निष्ठा होती; त्या सर्व भावना आजच्या ज्यूंच्याही मनात तितक्याच प्रखरपणे आहेत. त्यामुळेच चहूबाजूंनी शत्रूंनी घेरलेला असतानाही हा छोटासा देश सर्वांना पुरून उरतो. ज्यूंच्या राष्ट्रभक्तीचे आणि ज्यू-धर्मीय म्हणून, त्यांच्या असलेल्या एकतेबद्दल उत्सुकता वाटत होती.
 
या पार्श्वभूमीवर जसे आपल्या भारतात विविध धर्मांचे, जातींचे, वंशाचे आणि विचारांचे लोक आहेत; तसेच इस्रायलमध्ये ज्यू ख्रिश्चन आणि मुस्लीमही आहेत. पण, ज्यू समाजातील आपापसातील समरसता इतकी पक्की आहे की, देशाच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिकतेचा पाया हा ज्यू संकल्पना आणि धर्मांवरच आधारित आहे. ज्यू धर्मात आणि इस्रायलमध्येही जाती व्यवस्था नसली, तरी तिथल्या ज्यू समाजात सर्रास एक वर्गवारी आढळते. जसे युरोप आणि अमेरिकेतून इस्रायलमध्ये आलेले ज्यू हे ‘अश्केनाझी’ ज्यू; तर स्पेन, पोर्तुगाल आणि उत्तर आफ्रिकेतून आलेले ज्यू हे ‘सेफार्दी’ ज्यू. तसेच, मध्य-पूर्व आणि आशियाई देशांमधून इस्रायलमध्ये आलेले ज्यू हे ‘मिझराही’ ज्यू. ही वर्गवारी दृश्यस्वरूपातही का दिसते, तर इस्रायल देश म्हणून मान्यता मिळाल्यावर जगभरातले ज्यू इस्रायलकडे परतले. त्यांची-त्यांची स्वतंत्र संस्कृती, खानपान, वर्तन, सवय होती. इस्रायलमध्ये परतताना त्यांनी, आपल्यासोबत त्यांची ती संस्कृती सोबत आणली.
 
मुख्य म्हणजे ते जरी ज्यू-धर्मीय होते, तरी अमेरिकेमधून आलेले ज्यू आणि युरोपमधून आलेले ज्यू, तसेच आफ्रिकेमधून आलेले ज्यू यांच्या शारीरिक ठेवणीमध्ये, त्वचेच्या रंगामध्ये कमालीचा फरक होता आणि आजही आहे. तसेच धार्मिक आचरण आणि नियमांच्या पालनावरूनही, इस्रायल ज्यूंचे ‘ऑर्थोडॉक्स’, ‘कन्झर्व्हेटिव्ह’ आणि ‘रिफॉर्म’ असे धार्मिक पंथ आहेत. पण, यांना जाती म्हणता येत नाहीत. पण, ही वर्गवारी असली तरीसुद्धा ज्यू म्हणून हे सगळे एकच असतात, इस्रायल म्हणून ते एकच राहतात आणि प्रत्येक ज्यू व्यक्ती इस्रायलचा किंवा ज्यूंचा शत्रू तो आपला शत्रू, असे मानतात. हे का? ही एकीची भावना संवर्धित होण्यामागचे कारण आहे, अथक संघर्ष, वेदना, अत्याचार पार करतच आज जिवंत असल्याची भावना. जगात आपला एकच देश आहे, हे सत्य इस्रायली जनता कधीच विसरत नाही. नव्हे, त्यांना ते कधीच विसरूच दिले जात नाही.
 
त्यामुळेच तिथे प्रत्येकजण, त्यांच्या धार्मिकस्थळी ‘सिनेगॉग’मध्ये जातोच जातो. पण, प्रत्येक पालक त्यांच्या पाल्यांना आणि प्रत्येक शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना घेऊन, जेरुसलेमच्या पश्चिमेकडील ‘हार हाझिकारॉन’ डोंगरावरच्या ‘याद वाशेम’ या स्मारकामध्ये आणि २०२३ सालानंतर उभारलेल्या गाझा पट्टीजवळच ‘नोव्हा फेस्टिव्हल मेमोरियल साईट’मध्ये जातातच जातात.
 
‘याद वाशेम’ हे जमिनीखाली त्रिकोणी आकारात बांधलेले मोठे संग्रहालय आहे. दुसर्‍या महायुद्धादरम्यान हिटलर आणि त्याच्या नाझी सैन्याने ६० लाख ज्यूंची (ज्यामध्ये १५ लाख लहान मुले होती) क्रूरपणे हत्या केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे केंद्र उभारण्यात आले. इस्रायलच्या संसदेने १९५३ मध्ये, एका विशेष कायद्याद्वारे याची स्थापना केली. स्मारकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये नाझींच्या छळ-छावण्यांमधील वस्तू, छायाचित्रे आणि ज्यूंचे वैयक्तिक दस्तऐवज ठेवलेले आहेत.
 
आम्हीसुद्धा तिथे गेलो. आमच्यासोबत एक ज्येष्ठ मार्गदर्शक होती. हिटलरने ज्यूंचे केलेल्या शिरकाणातील भयानक क्रूरता, अमानवता, त्याचबरोबर बळी गेलेल्यांच्या स्मृती, त्यांच्या वेदना या स्मारकातल्या प्रत्येक गोष्टीतून व्यक्त होत होत्या. हे स्मारक ज्यूंच्या गर्दीने भरले होते. आम्ही त्या स्मारकातल्या वस्तू पाहात होतो, मनात वेदना दाटत होती. पण, आजूबाजूला सर्वत्र हुंदक्यांचाही आवाज येत होता. आजूबाजूला पाहिले, तर आजूबाजूचे ज्यू महिला-पुरुष त्या स्मारकातल्या वस्तुरूपी वेदना पाहून रडत होते, काही मूकपणे अश्रू ढाळत होते. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, त्यांचे प्राध्यापक वर्गही तिथे होतेच. तसेच सैनिकी वेशातले तरुण-तरुणींचे अनेक गटही होते. एक सैनिकी गट ‘हिब्रू’ भाषेत सामूहिकरीत्या काहीतरी चर्चा करत होता. ‘हे काय’ विचारल्यावर समजले की, सैनिकी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सैनिकांचा गट इथे येऊन शपथ घेतो की "आपले पूर्वज ज्यू-धर्मीय होते, म्हणून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. एकही ज्यू जगात उरू नये म्हणून क्रूर नरसंहारही झाला. तरीही, आपण आज आपल्या ज्यूंच्या देशात ज्यू म्हणून आहोत. त्यामुळे आपण त्या शक्तिमान देवाचे लाडके आहोत, ‘अब्राहम’चे वंशज आहोत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, आपल्या पूर्वजांनी आपला देश उभा केला, तर आज आपणही सगळ्या शत्रूंचा पराजय करू शकतो आणि आपला देश-धर्म वाचवू शकतो. त्यासाठी प्राणाची आणि सर्वस्वाची आहुती द्यायला सज्ज आहोत.” सैनिकच नव्हे, तर अनेक युवक-युवतींचे गटही तिथे आले होते. आज आपण जिवंत आहोत, ते प्रचंड संघर्षातून. त्यामुळे आपले जगणे फुकटचे न घालवता, देश आणि समाजासाठी खर्ची घालावे, असे इथे पावलोपावली सांगितले जात होते.
 
दुसरे स्मारक ‘नोव्हा फेस्टिव्हल मेमोरियल साईट.’ इथेही ज्यू आपल्या कुटुंबीयांसह जातातच जातात. गाझा पट्टीच्या बाजूलाच असलेले हे मेमोरियल. आम्ही इथेही गेलो. ‘नोव्हा फेस्टिव्हल’मध्ये जमलेल्या शेकडो लोकांना, इथेच ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी क्रूरपणे मारले होते. तसेच काहींचे अपहरणही केले होते. इस्रायल सरकारने त्यानंतर ‘हमास’ला उद्ध्वस्त केले. मात्र, ही घटना देशाने विसरू नये म्हणून, हे इस्रायलने स्मारक निर्माण केले आहे. यामध्ये ‘हमास’च्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या युवक-युवती, बालकांच्या स्मृती जतन केल्या आहेत. ‘हमास’चे राक्षस कसे आले? त्यांनी निरपराध युवक-युवतींना कसे मारले? मारले गेलेले कोण होते, हे सगळेसगळे इथे स्मारकस्वरूपात उभे केले आहे. डोळ्यांत स्वप्न घेऊन आनंदासाठी आलेल्या या युवक-युवतींचे फोटो पाहून, डोळ्यांत अश्रू आणि मनात ‘हमास’च्या विरोधात संताप आला. तर, आपल्यासोबत भूतकाळात काय झाले होते? वंशवाद आणि ‘शरिया’ कानून आणण्याच्या इस्लामिक उन्मादामुळे, आपण काय भोगले आहे? आपले शत्रू कोण आहेत? हे इस्रायलच्या नव्या पिढीने आणि कुणीही विसरू नये म्हणून, इस्रायल पालक आणि शिक्षक मुलांना अगदी दरवर्षी ‘याद वाशेम’ आणि या ‘नोव्हा फेस्टिव्हल मेमोरियल साईट’मध्ये घेऊन येतात. त्यामुळे इथला तरुण आपला इतिहास विसरत नाही आणि वर्तमानात काय करायचे, याची दिशाही विसरत नाही.
 
हे सत्य असले, तरीसुद्धा इस्रायल निर्मितीपूर्वीच इथे ‘झीयोनिझम’च्या रूपाने कट्टर राष्ट्रवादाची बीजे रुजली गेली होती. ‘झीयोनिझम’ किंवा ‘ज्यूवाद’ म्हणजेच ज्यू लोकांना त्यांची मूळ, ऐतिहासिक भूमी असलेल्या इस्रायलमध्ये स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करण्याची आणि ते टिकवून ठेवण्याची राष्ट्रीय चळवळ. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये ज्यू लोकांवर होणार्‍या अत्याचार व छळाला कंटाळून, थिओडोर हर्जल यांनी आंतरराष्ट्रीय चळवळीला मोठे रूप दिले.
 
दुसरीकडे सर्वच दिशांनी शत्रूने घेरल्यावरही, ठामपणे प्रतिकार करणार्‍या इस्रायलची प्रेरणा आहे ‘बेटार’ संघटना. या ‘बेटार’ संघटनेबद्दल मायकेल एग्लाश यांनाही भेटण्याचा योग आला. त्यांनी जी माहिती दिली, त्यातूनच समजले की, ‘बेटार’ संघटना ही इस्रायलच्या राष्ट्रीय आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी प्रचंड संघर्ष आणि समन्वय उभी करणारी संघटना आहे. इस्रायलच्या सध्याच्या सत्ताधारी पक्षाची ‘लिकुड’ पक्षाची मातृसंघटना आहे. इतकेच नव्हे, तर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे वडील या संघटनेचे अत्यंत क्रियाशील पदाधिकारी होते. १९२३ साली लाटव्हिया येथे व्लादिमीर जाबोटिन्स्की यांनी जोसेफ ट्रम्पेलडोर यांच्या नावाला स्मरून, ‘बेटार’ संघटनेची स्थापना केली. १९२० साली इस्रायलच्या ‘तेल हाय’ या ज्यूंच्या वस्तीवर अरबांनी हल्ला केला. त्यावेळी ज्यूंसाठी लढताना जोसेफ ट्रम्पेलडोर यांना वीरगती प्राप्त झाली. पण, मृत्यूपूर्वी त्यांचे वाक्य होते- ‘काही हरकत नाही, आपल्या देशासाठी मरणे हे अभिमानास्पद आहे.’ हे वाक्य, इस्रायलच्या राष्ट्रवादाचे प्रणेता झाले. जगभरातील ज्यूंचे एकत्रीकरण करत, त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशनिर्मितीसाठी जागृती करण्याचे काम ‘बेटार’ने केले. जगभरातले हजारो ज्यू ‘बेटार’चे सदस्य झाले. यात सहभागी होणार्‍यांसाठी नियम होते. जसे प्रत्येकाने स्वच्छ आणि सदस्यांसाठी नियमित केलेला पोशाख परिधान करणे, स्वच्छ पोशाखासहित स्वच्छ नीतिमान वर्तन, शिस्तबद्ध सैनिकी कवायती, सभ्य वागणे आणि बोलणे, अगदी शत्रूशीही सन्मानाने बोलणे, त्याचबरोबर प्रत्येक दुर्बलाचे प्राणपणाने रक्षण करणे, देशासाठी सर्वोच्च त्याग करणे हे प्रत्येक सदस्याचे आद्य कर्तव्य मानले गेले. या संघटनेला मातृसंस्था मानत, पुढे अनेक संघटना तयार झाल्या. १९४८ सालापूर्वी पॅलेस्टाईनवर ब्रिटिशांचे राज्य होते. ‘बेटार’ संघटनेचा आणि ब्रिटिशांचा संघर्ष सुरू झाला. त्यात स्वातंत्र्यासाठी अगणित वीरांनी बलिदान दिले, यात महिलाही होत्या. या संघटनेची स्वतःची प्रार्थना होती आणि आजही आहे. त्यातले एक कडवे-
 
ज्यू व्यक्ती गरिबीत असो किंवा गुलाम असो,
तो मनाने एक राजकुमार असतो.
अन्याय पाहून गप्प बसणे हे अत्यंत घृणास्पद आहे.
देशासाठी प्राण अर्पण करावे लागले
तरी चालेल, पण शरण जायचे नाही.
 
ही प्रार्थना गातगातच अनेक स्वातंत्र्ययोद्ध्यांनी, ब्रिटिशांच्या विरोधात स्वतःच्या जीवाची आहुती दिली होती. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर ‘बेटार’ संघटनेचे राजकीय संघर्षाचे स्वरूप कमी होऊन, ते सामाजिक आणि सांस्कृतिक झाले. ‘देशासाठी प्राण अर्पण करावे लागले तरी चालेल; पण शरण जायचे नाही,’ हा मंत्र, आजही ‘बेटार’चे लाखो सदस्य इस्रायलच्या वस्त्यावस्त्यांमध्ये रुजवत असतात. आज इस्रायलमध्ये ‘बेटार’ला मातृसंस्था मानून, काही संघटना शैक्षणिक क्षेत्रात काम करतात. काही सहकारमध्ये, काही कामगार क्षेत्रात, तर काही ज्यू धर्मसंवर्धन आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधातही काम करणार्‍या संघटना आहेत. ‘बेटार’चा इतिहास आणि ‘देश सर्वतोपरी’ ही भावना पाहून, भारतातील रा. स्व. संघ या संघटनेची आठवण न आली तरच नवल. (त्याबाबत पुढे केव्हातरी.) थोडक्यात, इस्रायलमध्ये कोणतेही सरकार असले, तरी ते समाजातील प्रत्येक घटकांमध्ये अखंड राष्ट्रवाद कायमच प्रदीप्त राहावा, यासाठी विशेष कार्यतत्पर असते. नुसते सरकारच नाही, तर समाजातला प्रत्येक घटक त्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्नशील असतो. इस्रायलींच्या राष्ट्रनिष्ठेची हीच कहाणी आहे.
 
९५९४९६९६३८




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर