धारावीतील दोन हजारहून अधिक भाडेकरार पूर्ण, एक हजार २३ कुटुंबांनी स्वेच्छेने घरे रिकामी केली; अदानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडने दिली माहिती

 
 
Dharavi Redevelopment Project
 
मुंबई (Dharavi Redevelopment Project) : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग येत असून, स्थानिक रहिवाशांकडूनही प्रकल्पाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २,२५० हून अधिक रहिवाशांशी भाडेकरार पूर्ण झाले असून, १,०२३ कुटुंबांनी स्वेच्छेने आपली घरे रिकामी केल्याची माहिती अदानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिली.
 
रहिवाशांच्या वाढत्या सहभागामुळे प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकत असून, काही ठिकाणी पाडकामालाही सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे ५७० झोपड्यांचे पाडकाम पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध होत असल्याचे एएनडीपीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव विपिन पालीवाल यांनी सांगितले की, रहिवाशांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा प्रकल्पावरील विश्वासाचे प्रतीक आहे. दर्जेदार घरे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक कुटुंबे स्वेच्छेने पुनर्विकास प्रक्रियेत सहभागी होत आहेत. राहते घर रिकामे करण्याचा निर्णय सोपा नसल्याची जाणीव असल्याने संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. (Dharavi Redevelopment Project)
 
पुनर्विकासासाठी घरे रिकामी करणाऱ्या पात्र कुटुंबांना १२ महिन्यांचे आगाऊ भाडे डिमांड ड्राफ्टद्वारे दिले जात आहे. याशिवाय एक महिन्याचे अतिरिक्त भाडे (ब्रोकरेज) आणि स्थलांतरासाठी ५,००० रुपयांची एकरकमी आर्थिक मदत देण्यात येत आहे. आतापर्यंत १,७०० हून अधिक डिमांड ड्राफ्टचे वितरण करण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
 
यापुढे घरभाड्याची रक्कम थेट कुटुंबप्रमुखांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून, या भाड्यात दरवर्षी ५ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. भाडेकरार आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. (Dharavi Redevelopment Project)
 
धारावी पुनर्विकास प्रकल्पातून स्थानिकांना आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार घरे तसेच अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत पालीवाल म्हणाले की, रहिवाशांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रकल्पाची वाटचाल अधिक वेगाने होत आहे. (Dharavi Redevelopment Project)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर