मुंबई (BMC Birth Certificate Services) : जन्म प्रमाणपत्राशी संबंधित प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला आणि चेंबूरसह परिमंडळ-५ मधील भागांमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अर्जांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिक सुविधा केंद्रांमध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाढविण्याबरोबरच आवश्यकता भासल्यास रविवारीही ही केंद्रे सुरू ठेवावीत, असेही त्यांनी सांगितले. (BMC Birth Certificate Services)
शनिवारी चेंबूर येथील एम-पश्चिम विभाग कार्यालयात परिमंडळ-५ आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. (BMC Birth Certificate Services)
त्यांनी सांगितले की, एम-पूर्व, एम-पश्चिम आणि एल विभागांमध्ये जन्म प्रमाणपत्रासंदर्भातील अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून अधिकाधिक अर्जांचा कमी कालावधीत निपटारा करता येईल. तसेच अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर किमान वेळेत कार्यवाही करून त्यांचा निपटारा करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. (BMC Birth Certificate Services)
जन्म प्रमाणपत्रातील दुरुस्ती आणि नव्या अर्जांची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यासाठी महापालिकेकडून नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरद्वारे अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे तसेच डॅशबोर्डच्या माध्यमातून सर्व अर्जांवर ऑनलाइन देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होईल. (BMC Birth Certificate Services)
प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी शिक्षणाशी संबंधित प्रकरणांतील अर्जांना प्राधान्य देण्याचे निर्देशही दिले. परदेशात शिक्षण घेण्यासाठी आणि व्हिसा प्रक्रियेसाठी क्यूआर कोडयुक्त जन्म प्रमाणपत्रांची मागणी वाढत असल्याने अशा अर्जांचा तातडीने निपटारा करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.(BMC Birth Certificate Services)
बैठकीत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प, पावसाळी आजारांची सद्यस्थिती, प्रसूतिगृहे, उपनगरीय रुग्णालयांची क्षमता वाढ आणि दुरुस्ती कामांचा आढावाही घेण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (सायन), गोवंडी शताब्दी रुग्णालय आणि चेंबूर येथील माता रुग्णालयाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.(BMC Birth Certificate Services)
आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता वाढावी आणि नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी सर्व विभागप्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांनी नियमित आढावा बैठका घ्याव्यात तसेच क्षेत्रीय पाहणी वाढवावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. (BMC Birth Certificate Services)