शतकभराचा संस्कार...

    26-Jul-2026



RSS 100 Years

जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना अशी संघाची ओळख. या १०० वर्षांच्या वाटचालीत उपेक्षा, उपहास, विरोध या गोष्टी पचवूनच संघाने ही ओळख निर्माण केली. त्यामुळेच संघ समाजाच्या कुतूहलाचा, अपेक्षेचा आणि विश्वासाचा विषय झाला. संघाच्या या वाटचालीवर अनेक ग्रंथ, स्मरणिका, लेख उपलब्ध आहेत. त्यातून संघाच्या यशस्वी वाटचालीचे रहस्य थोडेफार उमगते. मात्र, या विषयी अधिक भाष्य करत, संघकामाची सविस्तर ओळख करुन देणार्‍या पुस्तकांचा मागोवा घेणारा हा लेख...
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षे’ हे श्रीपाद कोठे लिखित आणि डॉ. शुभा साठे लिखित ‘सहा सरसंघचालक’, अशी दोन पुस्तके नुकतीच वाचनात आली. संघाची शतकाची वाटचाल, संघाची रचना, कार्यपद्धती, वैशिष्ट्ये आणि संघाचे आधारस्तंभ असलेल्या १८ व्यक्तिमत्त्वांचा परिचय श्रीपाद कोठे यांच्या पुस्तकातून होतो, तर, ‘सहा सरसंघचालक’ हे पुस्तक वाचताना सर्वसामान्य वाचकाला संघ म्हणजे एक व्यापक व्यक्तिनिर्माणाचे संघटन आहे; सामाजिक कार्यासाठी अष्टोप्रहर झटणारे स्वयंसेवक निर्माण करणारी ती एक संस्था असल्याचे समजते. १९२५ सालच्या या रोपट्याच्या फांद्या आज शिक्षण, वनवासी, धार्मिक, वैद्यकीय, शेती क्षेत्र, कामगार क्षेत्र, ग्राहक अधिकार क्षेत्र, प्रसारमाध्यमे अशा विविध क्षेत्रांत फोफावून, त्याचे एका विशाल महाकाय सामाजिक वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तसेच सामाजिक चारित्र्याचा पाया भक्कम करण्याकरिता बालसंस्कार, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, रोजगार तथा व्यवसाय समुपदेशन, रोजगारनिर्मिती, स्वदेशी पुरस्कार, नागरी कर्तव्याप्रति जागृती अशा अनेक गतिविधींमध्ये संघाचे काम अद्वितीय आहे.सोप्या शब्दांत सांगायचे, तर संघ सर्वव्यापी झाला आहे. दुसर्‍या शब्दांत, ‘संघावाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान...’ हे संघपद्यातील शब्द वास्तव झाले आहेत.
 
साधारणपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना संघाची विचारधारा यातून संघ संस्थापक, संघ स्थापना आणि आजपर्यंतच्या प. पू. सरसंघचालकांची ओळख याबद्दलची माहिती असते. त्यातील काहीजण या सहाजणांपैकी ज्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आले असतील, त्याबद्दल त्यांना अभिमानही वाटतो. पण, ‘सहा सरसंघचालक’मधून आतापर्यंतच्या सहाही प. पू. सरसंघचालकांच्या काहीशा व्यक्तिगत आणि संघजीवनाच्या तपशीलवार कथनातून, आतापर्यंतचा संघाचा प्रवास कसा कसा झाला, याचे समग्र वर्णन टप्प्याटप्प्याने वाचकांपर्यंत पोहोचते. मुख्य म्हणजे सहाही प. पू. सरसंघचालकांचे संघकार्याचे मूलभूत सूत्र एकच असले, तरी प्रत्येकाचे संघविस्तारासाठीचे विशिष्ट असे वेगवेगळे योगदान आहे, जाणवते. प्रत्येक प. पू. सरसंघचालकांनी फक्त मागची ‘री’ न ओढता, स्वतःचा दृष्टिकोन आणि काळाची गरज याप्रमाणे संघाला विशिष्ट दिशा दिल्याचेही प्रकर्षाने लक्षात येते.

पहिला टप्पा : आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशवराव बळीरामराव हेडगेवार
 
स्थापना: स्थापना करताना राष्ट्रवाद, अनुशासन, चारित्र्यबांधणी व एकात्मभाव स्वयंसेवकांमध्ये सहज रुजण्यासाठी संघाचा ढाचा बाल, तरुण, प्रौढ यांना भावणारा; पण तितकाच परिणामकारक करण्याचे सगळ्यात अवघड काम आद्य सरसंघचालकांनी केले. आपल्याला जे हवे, ते समोरच्यांना आपलेच काम वाटावे आणि त्यांनी स्वतःला त्यात झोकून काम करावे, इतकी विलक्षण कामाची हातोटी प. पू. डॉक्टरांकडे होती.
 
तसेच, संघ निरनिराळ्या भाषाप्रांतात विस्तारला जाण्यासाठीची व्यवस्था आणि तसा विस्तार होताना, स्वयंसेवकांमध्ये एकात्मभाव साधण्यासाठीची पायाबांधणीही त्यांनी केली.‘संघकार्य हेच जीवनकार्य’ ही मनोभूमिका असलेल्या सुशिक्षित प्रचारकांची निर्मितीही त्यांनी केली. संघाची विचारधारा शाश्वत राहण्यासाठी व बाह्य वैचारिक आक्रमण रोखण्यासाठीची योजनाही, डॉक्टरांनी गुरुपौर्णिमेच्या उत्सवातून आखली.

दुसरा टप्पा : द्वितीय सरसंघचालक प. पू. माधवराव सदाशिवराव गोळ्वलकर
 
संघशाखांचा देशांतर्गत विस्तार, आंतरराष्ट्रीय स्तरावर संघकार्याची सुरुवात, स्वदेशी, तसेच संघाचा विविध सामाजिक आयामांमध्ये प्रवेश करुन, राष्ट्रीय-सामाजिक आपत्तीत योगदान देणारी संस्था ही ओळख प. पू. गुरुजींनी संघाला दिली. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सरकारला सावध करणे, मार्गदर्शन करणे आणि स्वकीय सरकारने घातलेल्या बंदीतही, स्वयंसेवकांचे मनोबल दृढ ठवण्याचे काम त्यांनी केले. स्वामी विवेकानंदांच्या कन्याकुमारी येथील शिल्प समारकाची योजना ही श्रीगुरुजींचीच! त्यांचा प्रवास अलौकिकच! दरवर्षी ते पूर्ण भारत अक्षरशः पिंजून काढायचे.

तिसरा टप्पा : तृतीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस
 
मा. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत, समरसतेच्या क्षेत्रात संघाने ठरवून भरीव कामगिरी केली. त्यांचा अनुशासनावर प्रचंड भर होता. संघकाम समाजातील सर्व क्षेत्रांतील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे; त्यासाठी निरनिराळ्या क्षेत्रांत संघाला अपेक्षित असे वळण देण्याचे काम सुरू झाले. यासाठी संघटन, एकत्रीकरण आणि प्रत्यक्ष कृती ही त्रिसूत्री त्यांनी संघ स्वयंसेवकांना दिली.

चौथा टप्पा : चतुर्थ सरसंघचालक मा. प्रोफेसर रज्जूभैय्या
 
समाजिकदृष्ट्या मा. रज्जूभैय्या हे संघाचे पहिले अमहाराष्ट्रीय व ब्राह्मणेतर सरसंघचालक असले, तरी संघासाठी त्यात अनैसर्गिक असे काहीच नव्हते. संघ महाराष्ट्रात जन्मला, त्यात तत्कालीन पुरोगामी आणि पुढारलेल्या उच्चशिक्षित लोकांचा वावर असल्याने, डॉक्टरांनंतर महाराष्ट्रातील उच्चशिक्षित नेतृत्व संघाला लाभणे, हे इतर सीमित पर्यायांमुळे साहजिकच होते.
 
जसजसा संघ फोफावला, सर्व समाज आणि प्रांतसमावेशक झाला, तसतसे इतर ठिकाणांहूनही सक्षम नेतृत्व संघात येऊ लागले. मा. रज्जूभैय्या हे त्याचेच प्रतीक!
 
मा. रज्जूभैय्या हे संघाचे सगळ्यात वयोवृद्ध झालेले सरसंघचालक. ते विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने, त्यांच्या प्रत्येक विचारात वैज्ञानिक दृष्टिकोन असे. कुठल्याही प्रश्नावर सर्वांगीण विचार करूनच त्या समस्येची वस्तुनिष्ठ मांडणी करून, त्यावर ते सहज प्रभावी उपाययोजना सुचवत. संघाची अनेक पद्ये त्यांनीच लिहिली व रचली आहेत. संघ विस्ताराबरोबरच शेती, शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य, सुरक्षा अशा सर्व क्षेत्रांत देशाला बलशाली करण्याकरिता त्यांनी संघकाम अधिक प्रभावी केले. ते स्वदेशी आणि सक्षम ग्रामीण व्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते होते.
 
भारतात मानवी हक्क संघटना स्थापनेच्या कार्यात, त्यांचाच सिंहाचा वाटा होता. ते समान नागरी कायद्याचेही खंदे पुरस्कर्ते होते. मा. रज्जूभैयांच्या काळातच रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन झाले. त्यामुळे समाजातील सर्व स्तरात हिंदुत्वाची भावना जागृत झाली. हे रामजन्मभूमी आंदोलनाचे फार मोठे फलित. काळाची गरज म्हणून, मा. रज्जूभैय्या यांच्या काळातच संघाचा अधिकृतरीत्या प्रचार विभागही सुरू झाला. संघाच्या प्रचार विभागाचा उद्देश संघकामाची प्रसिद्धी, तसेच लोकांपर्यंत संघ पोहोचवण्याचे काम हा आहे. तसेच कम्युनिस्ट विचारांचे खंडण करणे आणि जे चुकीचे जनमत रेटे समाजात पसरवले जातात, ते परास्त करून सकारात्मक विचार रुजवणे हा आहे.
 
पाचवा टप्पा : मा. कुप्प. सी. सुदर्शनजी
 
मा. सुदर्शजी हे त्याकाळचे टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर. अखिल भारतीय शारीरिक शिक्षणप्रमुख तथा अखिल भारतीय बौद्धिकप्रमुख अशा दोन्ही परस्परविरोधी जबाबदार्‍या पार पाडणारे, मा. सुदर्शनजी हे बहुतेक पहिले व्यक्तिमत्त्व असावे. यथावकाश सहसरकार्यवाह आणि तद्नंतर सरसंघचालकांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कन्नड, बंगाली, मराठी, आसामी, उडिया, तामिळ, हिंदी, इंग्रजी या भाषा त्यांना नुसत्या अवगतच नव्हत्या; तर त्यांच्यावर प्रभुत्वही होते. मध्य प्रदेशपासून प्रचारक जीवनाची सुरुवात करत, बंगाल आणि पूर्वाचलमधल्या सगळ्या राज्यांत त्यांनी काम केले. त्यांची प्रतिभा अलौकिक होती. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, दैनंदिन प्रात:स्मरणात काही भर पडून प्रात:स्मरणाचे एकात्मता स्तोत्रात रूपांतर झाले. संघामध्ये प्रज्ञाप्रवाह कार्याचे ते मार्गदर्शक होते. त्यासाठी देशातील अनेक बुद्धिजीवींना त्यांनी यात सामील करून घेतले. हिंदू ऐकतेला जागतिक दृष्टी देण्याचे काम त्यांनीच केले.
 
मा. प्रोफेसर राजेंद्रसिंह यांच्या प्रमाणेच कृषी, जल संरक्षण व स्वदेशी यांच्यावर त्यांचाही विशेष भर होता. त्यांनी जैविक शेतीचा आग्रह धरला. गौ-ग्राम-कृषी या त्रयीवरही त्यांचा विशेष जोर होता. पर्यावरण, इंधन यावर त्यांचे विशेष चिंतन होते. पेट्रोल, डिझेल यांना पर्यायी इंधन शोधण्यासाठी ते विशेष आग्रही होते. त्याचप्रमाणे आयुर्वेद, योग उपचार, पारंपरिक आहार पद्धती यावरही त्यांचा भर असे. भारतीय जीवनशैलीच्या आधारावर विकासाबद्दल ते आग्रही होते. निसर्ग शोषणाच्या विरोधात त्यांनी काम केले. घुसखोरी, विघटनवादी कारवायांविरोधातही ते सक्रिय होते.

सहावा टप्पा : सध्याचे सरसंघचालक मा. डॉ. मोहनजी भागवत
 
मा. मोहनजींनी, ”संघ हा गतिशील आहे. त्यामुळे जसजशी काळाची गरज निर्माण होईल, त्याप्रमाणे त्या काळाचे विषय संघात येतील. आधीचा काळ त्याविषयी विचार केला नाही म्हणून आज करायचा नाही, अशी झापडबंद भूमिका संघाची नाही,” हा विचार त्यांनी मांडला. तद्नुसार, त्यांच्याच काळात संघाच्या गणवेशातही बदल झाला.
 
काहीजण संघशाखेत येत नसतील; पण सकारात्मक काम करत असतील. अशा वेळी संघ स्वयंसेवकांनी फक्त शाखा एके शाखा न करता, समाजातील प्रत्येक सकारात्मक कामात सहभागी झाले पाहिजे, समाजातील सज्जनशक्ती वाढली पाहिजे, असा त्यांचा आग्रह. तेही एक संघकामच आहे.
 
आजची परिस्थिती धावपळीची आहे. मुलांच्या शाळेच्या वेळा, त्यानंतर शिकवण्या, त्याचबरोबर जिम, जिमखाना आणि अभ्यास अशा चक्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना संघशाखेत इच्छा असून, येणे शक्य नाही. तसेच बारा-बारा तास काम करून आणि त्यासाठी दीड-दोन तास प्रवास करणारा वर्गही पूर्ण पिचल्याने शाखेत येऊ शकत नाही. त्यामुळेच या सरसंघचालकांनी ‘गतिविधी’ हा वेगळा भागच तयार केला. तसेच पुढे जाऊन ‘कुटुंबप्रबोधन’, ‘नागरिक कर्तव्य’, ‘पर्यावरण’, ‘सामाजिक समरसता’ व ‘स्वदेशी’ हा पंच-परिवर्तनचा मंत्र त्यांनी, स्वयंसेवक व समाजाला दिला. या पंच-परिवर्तनातून समाज विकसित करण्याचे उद्दिष्टही त्यांनी दिले. भारतातील मुस्लीम यांचे पूर्वज हे हिंदूच होते फक्त, काही कारणांनी धर्मांतरित झाले. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यायला हवे, असे त्यांचे मार्गदर्शन आहे.
 
संघाची आवश्यकता, संघविचार, स्थापना!
 
संघस्थापना करताना प. पू. डॉक्टरांच्या डोळ्यांपुढे परमवैभवप्राप्त सुसंघटित, चारित्र्यसंपन्न, बुद्धिवंत, बलवंत व विकसित राष्ट्राचे चित्र स्पष्ट होते. ती दूरदृष्टी, ते द्रष्टेपण त्यांच्या ठायी होते. भारतीय समाज आत्मभान विसरलेल्या अवस्थेत असताना, जाती-जातींमध्ये विघटित असताना, राष्ट्रीय व सामाजिक भान विसरून फक्त वैयक्तिक स्वार्थात गुरफटलेला असताना, समाजातील दुर्बल समजघटकांविषयी अत्यंत असंवेदनशील असताना, प. पू. डॉ. हेडगेवार यांच्या मनात फक्त तांत्रिक स्वातंत्र्य मिळवणे एवढा संकुचित विचार नव्हता. तर, एका सुसंघटित, चारित्र्यसंपन्न व वैभवसंपन्न राष्ट्रनिर्माणाचा विचार तो होता. असे वैभवसंपन्न राष्ट्र होण्यासाठी आवश्यकता होती ती देशभक्त, अनुशासित आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माणाची! हे व्यक्तिनिर्माण हे काही भाषण देऊन, शिक्षणातून, कुठल्याही प्रलोभनातून होणे शक्य नाही, हे प. पू. डॉक्टर जाणून होते. त्यासाठी संस्काराची गरज होती. आणि हे संस्कार काही दोन-तीन मुलांवर करून चालणार नव्हते; तर संपूर्ण समाजावर करण्याचे असाध्य काम होते. प. पू. डॉक्टरांनी हे शिवधनुष्य पेलले. तेवढ्याकरिता सखोल विचारमंथनातूनच त्यांनी संघाचे स्वरूप निश्चित केले.
 
एखादी संघटना उभी करायची, तर जीवाला जीव देणार्‍या लोकांची फौज उभी करावी लागणार. त्यासाठी लोकांमध्ये एकात्मभाव तयार होण्यासाठी काय करावे लागेल, याचा त्यांनी विचार केला. आणि ठरवले, दैनंदिन मैदानावरील खेळण्यासाठी लहान मुलांपासून तरुणांना एकत्र आणायचे. तसेच खेळत असताना त्यांच्यावर एकात्मतेचे, चारित्र्याचे, सामर्थ्य संवर्धनाचे, संघटनेचे, त्यागाचे, देशभक्तीचे संस्कार करायचे. अशा तर्‍हेने संघशाखा सुरू झाली. प. पू. डॉक्टरांची लोकसंग्राहकशक्ती मोठी विलक्षण होती. आज संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि संघाने समाजाचे प्रत्येक अंग व्यापले आहे. संघ आज देशाला दिशा दाखवतो आहे. त्यामागे या सहा सरसंघचालकांची प्रेरणा व अविरत काम आहेच. त्याचबरोबर त्यांनी निर्माण केलेल्या, स्वतःचे आयुष्य समर्पित केलेल्या हजारो सुशिक्षित प्रचारकांची २४द७ काम करणारी फौजही आहे. तसेच गावागावांतील चारित्र्यसंपन्न, उच्चशिक्षित आणि समर्पित स्वयंसेवकांचा सहभागही आहे. त्यांच्या त्यागातून आज संघाचे संक्रमण होत असून, संघ सर्वसमावेशक आणि विश्वव्यापी झाला आहे. स्वयंसेवकाचे खरे काम, शाखा प्रार्थनेनंतरच्या ‘विकीर’ या आज्ञेनंतर खर्‍या अर्थाने सुरू होते. संघकाम म्हणजे काय, याची स्पष्ट कल्पना अशा पुस्तकांच्या वाचनातूनच सामान्यांना नक्कीच मिळते. यातूनच संघ वृद्धिंगत होत राहणार, यात जराही संशय नाही.

सुनील कुलकर्णी
९६७३३३०८४७




संबंधित मजकूर