मुंबई : (Ghatkopar Railway Station) मुंबई उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोदरम्यान प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घाटकोपर रेल्वे स्थानकावरील नवीन एलिव्हेटेड डेक आणि १२ मीटर रुंद दक्षिणेकडील पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल केला आहे. स्थानक सुधारणा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे घाटकोपर स्थानकावरील गर्दी कमी होण्याबरोबरच रेल्वे आणि मेट्रोदरम्यानची जोडणी अधिक सुलभ होणार आहे.
घाटकोपर हे मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या उपनगरीय आणि मेट्रो इंटरचेंज स्थानकांपैकी एक आहे. नवीन एलिव्हेटेड डेक आणि दक्षिणेकडील पादचारी पूल सुरू झाल्यामुळे प्रवाशांच्या हालचालीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार असून, गर्दीच्या वेळेत प्लॅटफॉर्म, मेट्रो स्थानक आणि पूर्वेकडील स्कायवॉकदरम्यान प्रवाशांचे वितरण अधिक प्रभावीपणे होईल. (Ghatkopar Railway Station)
शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी सुरू करण्यात आलेला ५५ मीटर लांबीचा एलिव्हेटेड डेक विद्यमान मेट्रो पादचारी पुलाला नव्या दक्षिणेकडील पुलाशी जोडतो. या डेकची रुंदी मेट्रोकडील बाजूस ४ मीटर, तर दक्षिणेकडील पुलाजवळ ७.५ मीटर आहे. याशिवाय ६.१० मीटर रुंद जिन्याद्वारे मेट्रो स्थानकाच्या इमारतीत थेट प्रवेशाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रोदरम्यान प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. (Ghatkopar Railway Station)
१२ मीटर रुंद दक्षिणेकडील पादचारी पूल स्थानकाच्या प्रवासी हाताळणी क्षमतेत मोठी भर घालणार आहे. मात्र, स्थानकावरील रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांची वर्दळ अबाधित ठेवत हे काम करावे लागल्याने हा पूल दोन टप्प्यांत सुरू करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडणारा जिना, प्लॅटफॉर्म क्रमांक २-३ आणि ४ साठी दुहेरी उतरण व्यवस्था, नव्याने सुरू झालेला एलिव्हेटेड डेक तसेच विद्यमान पूर्वेकडील स्कायवॉकशी जोडणी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. (Ghatkopar Railway Station)
उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक २-३, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस मुख्य जिने उपलब्ध होतील. तसेच संपूर्ण सुविधेत सहा सरकते जिने (एस्केलेटर) आणि चार लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी तसेच सामानासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संपूर्ण सुविधेमध्ये सीसीटीव्ही देखरेख, आधुनिक सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली, प्रवासी माहिती आणि दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहेत. प्रवाशांच्या हालचालीचे नियोजन आणि मार्गदर्शन प्रणालीची रचना आयआयटी रुडकीच्या शिफारशींनुसार करण्यात आली आहे.
एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास एस. वाडेकर यांनी सांगितले की, घाटकोपर स्थानकावरील नवीन एलिव्हेटेड डेक आणि दक्षिणेकडील पादचारी पूल सुरू होणे हा मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या आधुनिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. या सुविधांमुळे स्थानकातील प्रवासी हालचाली अधिक सुरळीत होतील, मेट्रो-रेल्वे जोडणी मजबूत होईल आणि गर्दीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यास मदत होईल. प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमआरव्हीसी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. (Ghatkopar Railway Station)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.