गुणवत्तापूर्ण शिक्षणावर तडजोड नाही; विद्यार्थी हितासाठी अभाविपचा सातत्यपूर्ण लढा : आशीष चौहान

    25-Jul-2026   
 
 
ABVP Mumbai Student Leader Meet
 
मुंबई (ABVP Mumbai Student Leader Meet) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई महानगराच्या वतीने आयोजित 'छात्र सत्ता' स्टुडन्ट लीडर मीट कार्यक्रम शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. यावेळी सन २०२६-२७ या कार्यकालासाठी अभाविप मुंबई महानगराचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून संदीप शिंदे तसेच नवनिर्वाचित महानगर मंत्री म्हणून अभिषेक पवार यांच्यासह नव्या महानगर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच मुंबई महानगरातील सुमारे ६० महाविद्यालयांच्या अध्यक्ष व मंत्र्यांची (सचिव) घोषणा करण्यात आली. याशिवाय ५० कार्यकर्त्यांना महानगर कार्यकारिणीमध्ये विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.
 
कार्यक्रमास अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशीष चौहान, राष्ट्रीय मंत्री पायल किनाके तसेच पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गौरव सिंह सोहेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 
राष्ट्रीय संघटन मंत्री आशीष चौहान यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसून विद्यार्थी हितासाठी अभाविपने सातत्याने संघर्ष केला असल्याचे सांगितले. एनटीएसमोरील आंदोलन असो वा परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठीचा लढा, सर्वप्रथम रस्त्यावर उतरलेली संघटना अभाविपच होती, असे त्यांनी नमूद केले. तसेच व्यक्तिनिर्माणातूनच राष्ट्रनिर्माण साध्य होत असून विकसित भारतासाठी सक्षम युवाशक्ती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. (ABVP Mumbai Student Leader Meet)
 
राष्ट्रीय मंत्री पायल किनाके यांनी विद्यार्थ्यांना अभाविपच्या विचार, कार्यपद्धती व विद्यार्थी चळवळीच्या विधायक भूमिकेची ओळख करून देत सामाजिक जाण, राष्ट्रीय विचार आणि नेतृत्वक्षमतेसह कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गौरव सिंह सोहेल म्हणाले, "ज्ञान, शील, एकता हा केवळ घोष नसून विकसित भारताच्या निर्मितीचा मंत्र आहे." विद्यार्थ्यांनी वैयक्तिक प्रगतीसोबतच राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत सक्रिय योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. (ABVP Mumbai Student Leader Meet)
 
मुंबई महानगरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात आगामी कार्यकालात विद्यार्थी हिताचे प्रश्न, संघटन विस्तार आणि विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. (ABVP Mumbai Student Leader Meet)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर