युरोप फिरण्याचे स्वप्न अनेकांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये असते. बहुतांश पर्यटक विमानाने एका शहरातून दुसर्या शहरात पोहोचतात आणि पुढच्या ठिकाणी रवाना होतात. मात्र, अनुभवी प्रवासी सांगतात की, ‘युरोप खर्या अर्थाने अनुभवायचा असेल, तर तो रेल्वेनेच फिरायला हवा. कारण, रेल्वेचा प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग नसून, तो युरोपचा इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि जीवनशैली जवळून पाहण्याची संधी देतो.लंडनच्या जगातील सर्वांत जुन्या भूमिगत रेल्वेपासून ‘पॅरिस मेट्रो’, ‘बर्लिन यू-बान’ आणि स्वित्झर्लंडच्या पर्वतरांगांमधून धावणार्या रेल्वेमार्गांपर्यंत, युरोपमधील रेल्वे व्यवस्था ही स्वतःमध्ये एक पर्यटन आकर्षण. या प्रवासाला अधिक सुलभ बनवण्यासाठी ‘युरेल’ आणि ‘इंटररेल’ हे दोन विशेष रेल्वे पास उपलब्ध आहेत. हे पास प्रवाशांना तब्बल ३३ युरोपीय देशांमध्ये रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा देतात. आहे की नाही गंमत...
भारतीय पर्यटकांसाठी विशेषतः ‘युरेल’ पास उपलब्ध आहे. युरोपियन देशांतील नागरिक आणि रहिवाशांसाठी ‘इंटररेल’ पास असतो; तर भारतासह आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ओशनियातील नागरिक ‘युरेल’ पासचा लाभ घेऊ शकतात. या पासच्या माध्यमातून ऑस्ट्रिया, बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, नेदरलॅण्ड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्कीये यांसह ३३ देशांमध्ये बहुतांश रेल्वेसेवांचा वापर करता येतो. स्पेनची ‘रेन्फे’, फ्रान्सची ‘एसएनसीएफ’ आणि स्वित्झर्लंडची ‘एसबीबी’ यांसारख्या प्रमुख रेल्वे कंपन्या या योजनेत सहभागी आहेत.
प्रवाशांच्या वेळेनुसार आणि प्रवासाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे पास उपलब्ध आहेत. अनेक देशांचा प्रवास करायचा असल्यास ‘ग्लोबल’ पास सर्वाधिक लोकप्रिय. या पासद्वारे एका महिन्यात ठरावीक दिवस किंवा सलग तीन महिन्यांपर्यंत रेल्वेने प्रवास करता येतो. याची सुरुवातीची किंमत सुमारे २१२ युरोपासून सुरु होते. जर एखाद्याला एकाच देशाचा सखोल अनुभव घ्यायचा असेल, तर ‘वन कंट्री पास’ हा अधिक किफायतशीर पर्याय. या पासद्वारे एका महिन्यात तीन ते १५ दिवस त्या देशात रेल्वेने अमर्याद प्रवास करता येतो. ग्रीसमधील बेटांवर फिरण्यासाठी उपलब्ध असलेला ‘ग्रीक आयलंड्स’ पास अवघ्या ९७ युरोपासून सुरू होतो.
तथापि, या पासमध्ये सर्व सेवांचा खर्च समाविष्ट नसतो. हायस्पीड रेल्वे, रात्रीच्या गाड्या किंवा अत्यंत लोकप्रिय मार्गांसाठी सीट आरक्षण स्वतंत्रपणे करावे लागते आणि त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. यासाठी आता ‘प्लस पास’ हा नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पासमध्ये काही लोकप्रिय हायस्पीड मार्गांवरील आसानांच्या आरक्षणाचाही खर्च समाविष्ट करण्यात आला असून, तो सध्या ‘ग्लोबल’ पास, तसेच जर्मनी आणि इटलीतील काही मार्गांवर उपलब्ध आहे. दोन आठवड्यांच्या सुटीत स्वित्झर्लंड आणि इटलीचा रेल्वेप्रवास हा सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो. झ्युरिकपासून सुरुवात करून ल्युसर्न, मिलान, फ्लॉरेन्स आणि पुढे रोम किंवा व्हेनिसपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय ठरतो. एका बाजूला हिमाच्छादित आल्प्स पर्वतरांगा, तर दुसर्या बाजूला इटलीतील ऐतिहासिक शहरे, द्राक्षमळे आणि अप्रतिम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव या मार्गावर मिळतो. तितकाच लोकप्रिय आणखी एक मार्ग म्हणजे अॅमस्टरडॅम ते ब्रुसेल्स. अवघ्या अडीच तासांच्या हायस्पीड रेल्वेप्रवासानंतर बेल्जियमची राजधानी गाठता येते. या मार्गासाठी उपलब्ध असलेला ‘बेनेलस पास’ नेदरलॅण्ड्स, बेल्जियम आणि लझेंबर्ग या तीन देशांमध्ये रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा देतो.
उत्तर युरोपची सफर करणार्यांसाठी ‘नॉर्डिक’ पास आकर्षणाचा विषय ठरतो. या पासद्वारे डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि फिनलंडमधील रेल्वेप्रवास सहज करता येतो. नॉर्वेचे फ्योर्ड्स, स्वीडनची ‘फिका’ संस्कृती, डेन्मार्कची सायकल जीवनशैली आणि फिनलंडमधील ‘सॉना’ संस्कृती या सर्वांचा आस्वाद या प्रवासात घेता येतो. युरोपमध्ये रेल्वेने प्रवास करणे म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर संपूर्ण खंडाला नव्या नजरेने अनुभवण्याची संधी आहे. त्यामुळे पुढील युरोप सहलीचे नियोजन करताना विमानाच्या तिकिटांबरोबरच ‘युरेल पास’चाही विचार नक्की करा.