जंतरमंतरवर राष्ट्रविरोधी शक्तींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न, विद्यार्थ्यांच्या हितासाठी राजीनामा देतोय; नीट वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा!
मुंबई : (Dharmendra Pradhan Resigns) नीट-यूजी २०२६ पेपरफुटीनंतर जंतरमंतरवर सुरु असेल अराजक आंदोलन आणि त्यानुषंगाने विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कारवाया या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, हा निर्णय विद्यार्थ्यांचे भविष्य, देशाची एकता आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजीनाम्यानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रधान यांनी सांगितले की, गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी कार्यरत आहेत. देशातील तरुणांच्या आकांक्षा आणि न्याय्य अपेक्षांचा नेहमीच आदर केला असून, सक्षम शिक्षण व्यवस्था ही विकसित भारताचा पाया असल्याचा आपला विश्वास असल्याचे त्यांनी नमूद केले.
३ मे २०२६ रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करत तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला. तसेच परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Dharmendra Pradhan Resigns)
प्रधान यांनी म्हटले की, २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन तसेच विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्याने ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टिकोनातून काम करण्यात आले. २१ जून २०२६ रोजी परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली आणि १६ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आले. या निकालात गरीब आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळविल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे मन व्यथित झाल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलन आणि देशातील निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनाऐवजी शिक्षण व करिअरवर लक्ष केंद्रित करावे, या भावनेतून आपण पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Dharmendra Pradhan Resigns)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शन, विश्वास आणि सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी, शिक्षण मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी आणि आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. राष्ट्रसेवा हीच आपल्या जीवनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, प्रभू श्री जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने भारत माता, ओडिशातील जनतेची आणि देशातील तरुणांची सेवा करण्यासाठी भविष्यातही कार्यरत राहणार असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Dharmendra Pradhan Resigns)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.