जी ‘कॉकरोच जनता पार्टी’ अजून पक्ष म्हणून साधी नोंदणीकृतही नाही, तिच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधूंना मुंबईत मोर्चा काढण्याची खुमखुमी यावी, हे खरं म्हणजे त्यांचे पक्षीय अस्तित्व संपुष्टात आल्याचेच द्योतक. अस्वस्थ युवाशक्तीला आणखीन चिथावून ‘युवाहृदयसम्राट’ होण्याचे स्वप्नरंजन करणार्या ठाकरे बंधूंची ही केविलवाणी धडपड. पण, शेवटी उधारीतून जरी तात्कालिक लाभ मिळत असला, तरी त्याची नंतर परतफेड करावीच लागते, हे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणार्या ठाकरे बंधूंनी न विसरलेले बरे!
उधारी ही केवळ पैशांचीच नसते. अगदी राजकारणही उधारीवर करता येते, हा नवाच पायंडा महाराष्ट्रात सध्या पडलेला दिसला. हा पायंडा पाडण्याचे श्रेय उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचेच! येत्या रविवारी मुंबईत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या समर्थनार्थ मोर्चा काढणार असल्याचे ठाकरे बंधूंनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केले. यापूर्वी, उद्धव ठाकरेंनी अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील अपहाराविरोधात दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन केले होते. ‘आंदोलन’ हा शब्दही मोठा वाटावा, इतका किरकोळ त्या उपक्रमाचा परिणाम होता. पण, आता दिल्लीत झुरळांच्या पक्षाने पेपरफुटीविरोधात चालविलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, पोलिसांनी दिल्लीत तरुणांवर केलेल्या लाठीमाराविरोधात मुंबईत मोर्चाचा घाट ठाकरे बंधूंनी घातलेला दिसतो.
एकीकडे उद्धव ठाकरेंचा उरलासुरक्षा पक्षही रिकामा झालेला, तर राज ठाकरेंच्या मनसेचा तर एकही आमदार निवडून आलेला नाही. इतकंच काय तर राज ठाकरेंना त्यांच्याच मुलाला त्यांच्याच राहत्या मतदारसंघातही साधे निवडून आणता आलेले नाही. मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना महानगरपालिकेच्या निवडणुकतही मुंबईकरांनी साफ नाकारले. त्यावेळी केंद्राच्या त्रिभाषा धोरणाविरोधात आणि आता ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरुन सरकारविरोधी वातावरण तापलेले असताना, त्यासाठीच दोन्ही बंधू राजकीय लाभ लाटण्यासाठी एका व्यासपीठावर आले. पण, यांचे एकत्र येणेही तेवढ्यापुरतेच म्हणा. नंतर एकाचे तोंड वांद्य्राकडे आणि दुसर्याचे दादरकडे! असो.
दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाच्या एका आभासी पक्षाने ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी केलेले आंदोलन चांगलेच भडकले. आता त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मुंबईच्या मोर्चातून खटाटोप करणार आहेत. म्हणजे, आंदोलन त्या झुरळांच्या पक्षाचे (जो पक्षच मुळी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही!) आणि त्याला पाठिंबा देणार उद्धव-राज ठाकरे यांचे पक्ष! म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या एका पक्षाच्या आंदोलनाला अस्तित्वात असलेल्या पक्षांनी समर्थन देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. यावरुन उद्धव-राज यांच्या पक्षाचे अस्तित्व किती, हेच अधोरेखित व्हावे.
लोकशाहीत मतदारांचा पाठिंबा हाच कोणत्याही पक्षाच्या विजयाचा अंतिम निकष. उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाला तर महाराष्ट्रातील मतदारांनी साफ झिडकारले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या तुलनेने बर्या यशात त्यांच्या नशिबाचा वाटा अधिक होता. याचे कारण, त्यानंतर केवळ सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. नंतर झालेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येही त्यांच्या गटाकडे मतदारांनी पाठ फिरविली आणि ते मुंबई महापालिकेतील सत्ता तब्बल २५ वर्षांनंतर गमावून बसले. आता तरुणांच्या मनातील आक्रोशाचा राजकीय लाभ भविष्यात लाटता यावा, म्हणूनच ठाकरे बंधूंचे अशा ‘पर्यायी राजकारणा’तून हे आंदोलननाट्य! मात्र, येती तीन-चार वर्षे तरी महाराष्ट्रात कोणत्याच निवडणुका नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षांच्या फावल्या वेळाचे करायचे काय, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्नच म्हणावा लागेल. कारण, त्यांच्याकडे सरकारविरोधात ठोस असे मुद्देच नाही. म्हणूनच मग आता दुसर्या पक्षांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या उधारीच्या राजकारणाची दुर्दैवी परिस्थिती ठाकरे बंधूंवर ओढावलेली दिसते.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील काही आरोपींनाही लगोलग अटक झाली. पण, तेव्हा उद्धव किंवा राज ठाकरेंपैकी कोणी एकानेही या आरोपींच्या विरोधात मोर्चा काढल्याचे ऐकिवात नाही. हे आरोपी कोचिंग लासशी संबंधित आहेत. त्या कोचिंग लालेसविरोधातही तेव्हाच अशा भव्य मोर्चाचा घाट का घातला गेला नाही? तसेच या पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांचीही ठाकरे बंधूंपैकी कोणी भेट घेतल्याचे, विचारपूस केल्याचे किंवा त्यांना आर्थिक मदतीचा हात दिल्याचेही दिसले नाही. म्हणजे, जे या पेपरफुटी प्रकरणामुळे प्रत्यक्षात बाधित झाले, त्यांच्याशी प्रत्यक्ष कसलाच संपर्क, संवाद ठाकरेबंधूंनी साधलेला वरकरणी दिसत नाही. पण, मोर्चा आणि आंदोलनाला पाठिंबा यांसारखे आयते उपक्रम करून केवळ राजकीय लाभ घेणे, इतकाच त्यांचा उद्देश. खरेतर ‘नीट’ची फेरपरीक्षा सुरळीत पार पडून आता त्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला. विद्यार्थ्यांनी या निकालावर जल्लोष केल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. त्यामुळे ‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या प्रसिद्धीवर स्वार होत, राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचीच ठाकरे बंधूंची अगतिकताच यातून दिसून येते.
"हा मोर्चा शांततापूर्ण असेल; पण कोणी त्याला अडविण्याचा किंवा चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जागच्या जागी फटकावून काढू,” असा इशाराही काल पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी दिला. एकीकडे त्यांनी आंदोलन शांततापूर्ण रीतीने करण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे या इशार्याद्वारे संभाव्य हिंसाचारासाठी पार्श्वभूमीही तयार केली. कारण, सारेच शांततापूर्ण रीतीने पार पडले, तर त्याची बातमी कशी होईल? त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल? या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी पुष्कळ निरर्थक आणि असंबद्ध, तसेच पुराव्याशिवाय भाष्य केले. त्यावर काही टिप्पणी करणे म्हणजे त्यांच्या वक्तव्याला मान्यता देण्यासारखे ठरेल. पण, ठाकरे बंधूंनी केलेले एक आचरट वक्तव्य असे की, "हे आंदोलन मोडून काढायला भाजपने पाकिस्तानातून लोक आणले का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे बंधूंच्या एक गोष्ट नजरेस आणून दिली पाहिजे आणि ती म्हणजे, जंतरमंतरवरील कथित आंदोलकांना दोनवेळचे भरपेट खायला देण्यासाठी थेट पाकिस्तान, कतार आणि अन्य देशांतून अन्न मागविले जात आहे. ते कोणी मागविले, तेही ठाकरे बंधूंनी सांगितले असते, तर बरे झाले असते.
लोकशाही मार्गाने सत्तेवर येण्याचे ठाकरे बंधूंचे सारे प्रयत्न निष्फळ झाले असून, त्यांना आता सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी कोणताही विषयच उरलेला नाही. शिवाय, संघटनात्मक स्तरावरही त्यांचा गट अतिशय दुबळा झाल्यामुळे आंदोलन करायचे म्हटले तरी कसे, हा प्रश्नच. त्यामुळे इतर विरोधी पक्षांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन अशा ‘पर्यायी राजकारणा’तून जितका फायदा लाटता येतील, तितका लाटण्याचा हा केविलवाणा प्रयत्न. ते करताना आपल्या राजकीय अपयशावर आपणच प्रकाश टाकत आहोत, याचेही त्यांना भान नाही. शेवटी ठाकरेंना फडणवीसांनीही काल करुन दिलेले छोटेसे स्मरण महत्त्वाचे. ठाकरे मुख्यमंत्री असताना ‘टीईटी’ घोटाळा झाला होता. मग त्यावेळी ठाकरेंनी कोणत्या उपाययोजना केल्या, कोणाचा राजीनामा घेतला होता का, तेही या मोर्चात एकदाचे जगजाहीर करावे!