शब्दांपलीकडचा वास्तववादी प्रवास!

    24-Jul-2026   
 
 
Ravikumar Karad
 
बीडमधून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास, अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील वाटचाल, वाचनातून घडलेली वैचारिक बैठक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करणार्‍या रविकुमार कराड यांच्या प्रवासाची ही कहाणी...
 
रविकुमार यांच्यासाठी शिक्षण हा स्वतःपुरता विषय असा कधीच राहिला नाही. आपण शिकत आहोत, तर आपल्यासोबत गावातील इतर मुलांनीही शिकले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. शिक्षणाचे महत्त्व न समजलेल्या पालकांना मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा असलेल्या ठिकाणी पाठविण्यासाठी त्यांनी समजावले. आर्थिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या शुल्कासाठी टप्प्याटप्प्याने पैसे देण्याची व्यवस्थाही करून घेतली. काही विद्यार्थ्यांचे शाळांमधील प्रवेश निश्चित करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. शिक्षणामुळे माणूस घडतो आणि त्यातून कुटुंबाबरोबरच समाजाचीही वाटचाल पुढे जाते, हा वडिलांचा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला आहे.
 
लेखनाची सुरुवातही फार ठरवून झाली नाही. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असताना एका वृत्तपत्र समूहाच्या नवोदित लेखकांसाठीच्या संपादकीय उपक्रमात ‘काटा रुते मनाला’ हा त्यांचा लेख प्रकाशित झाला. शहरांचा विस्तार होत असताना गावांच्या विकासाचा प्रश्न मागे पडतो आहे, याकडे त्यांनी या लेखातून लक्ष वेधले. पुढे वाचन त्यांच्या जगण्याचा भाग बनले. अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू असतानाच विविध भाषांतील सुमारे ५०० पुस्तके त्यांनी वाचली. त्यातून एखाद्या प्रश्नाकडे अनेक बाजूंनी पाहण्याची सवय लागली.
 
‘फेसबुक’चे माध्यम नुकतेच लोकप्रिय होत असताना त्यांनी त्याचा वापर केवळ स्वतःचे मत मांडण्यासाठी केला नाही. गंभीर विषय सहज भाषेत, कधी मिश्कीलपणे, तर कधी थेटपणे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. त्यामुळे त्यांच्या लिखाणाभोवती वाचकांचा एक वर्ग तयार झाला. पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करताना संविधान, इतिहास, भारतीय समाजरचना, ग्रामविकास आणि सार्वजनिक प्रश्नांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आणि हाच अभ्यास त्यांच्या लेखनाचा आधार बनला. नागरी सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षांना सामोरे जात त्यांनी ‘साहाय्यक कमांडंट’ पदाच्या मुलाखतीपर्यंतही मजल मारली.
 
नियमांवर प्रश्न उपस्थित करण्याची त्यांची सवयही याकाळात दिसून आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॅटूबाबतच्या नियमांना त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात न्यायालयीन लढा देताना त्यांनी आपली भूमिका मांडली. एखादी गोष्ट परंपरेने चालत आली आहे म्हणून ती तशीच स्वीकारण्यापेक्षा तिच्यामागचा आधार तपासला पाहिजे, हा दृष्टिकोन त्यांच्या सार्वजनिक वावरातही जाणवतो.
 
नागरी सेवा परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, अपयशानंतर त्यांची वाटचाल थांबली नाही. सॉफ्टवेअर कोडिंगच्या कौशल्याचा उपयोग करत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत प्रणाली विश्लेषक (सिस्टम अ‍ॅनालिस्ट) म्हणून काम सुरू केले. नोकरी आणि लेखन हे दोन्ही त्यांच्या आयुष्याचा एकत्रित भाग बनले. तंत्रज्ञानाच्या जगात काम करतानाही समाजातील प्रश्नांवर वाचणे, लिहिणे आणि चर्चा करणे सुरू राहिले.
 
सर्वसामान्यांच्या रोजच्या अडचणीही त्यांच्या लेखनाचा विषय बनल्या. बँकिंग व्यवस्थेतील तक्रारी कशा हाताळाव्यात, सरकारी ‘आपले सरकार’सारख्या संकेतस्थळांचा वापर कसा करावा, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. बीडमधील ऊसतोड कामगार, विशेषतः महिला ऊसतोड कामगारांच्या गर्भाशय काढण्याच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी केलेल्या लिखाणाची माध्यमांनी सुद्धा गंभीर दखल घेतली. जातीय तणावाच्या वातावरणात त्यांनी संयमित भूमिका मांडली. राजकारणातील घराणेशाहीवरही सातत्याने लिहिताना त्यांनी त्याच्या लोकशाहीवरील परिणामांवर प्रश्न उपस्थित केले.
 
‘ओबीसी’ समाजाच्या प्रश्नांकडे पाहताना त्यांचा अभ्यास अधिक खोल जातो. आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालयीन निवाडे, प्रशासकीय कागदपत्रे आणि घटनात्मक तरतुदींचा आधार घेत ते विषय मांडतात. ‘काका कालेलकर आयोगा’पासून ‘मंडल आयोगा’पर्यंतचा प्रवास, ‘ओबीसीं’ची सामाजिक आणि राजकीय स्थिती आणि आरक्षणाच्या बदलत्या संदर्भांचा ते आपल्या लेखनातून मागोवा घेतात. स्थानिक वृत्तपत्रांपासून विविध संकेतस्थळे आणि ‘युट्यूब’ वाहिन्यांपर्यंत त्यांचे लेखन पोहोचले. या अभ्यासामुळे ‘ओबीसी आरक्षणाच्या विषयावरील अभ्यासक’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
 
२०२५ मधील ‘नीट’ प्रश्नपत्रिका-फुटीच्या प्रकरणानंतर त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांवर आवाज उठवला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही ते सातत्याने लेखन करतात. परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी विविध माध्यमांवरील चर्चांमधूनही मांडला.
 
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्या वैचारिक जडणघडणीत मोठा वाटा. गांधींच्या नैतिक विचारांकडे ते जीवनातील गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेण्याचा आधार म्हणून पाहतात, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्भीडपणाचा आणि स्पष्ट मांडणीचा प्रभाव त्यांच्या लेखनात दिसतो. नानी पालखीवाला यांच्या ‘वुई, द पीपल’ या पुस्तकानेही त्यांच्या तरुण मनावर प्रभाव टाकला. त्यांच्या भाषणांमधून आणि न्यायालयीन अनुभवांमधून राजकारण आणि लोकशाही समजून घेण्याची दृष्टी विकसित झाली.
 
रविकुमार कराड यांची ओळख एका चौकटीत बसवता येत नाही. ते सॉफ्टवेअर अभियंता, लेखक, ‘ओबीसी’ आरक्षणाचे अभ्यासक आणि विविध प्रश्नांवर सार्वजनिक चर्चेत सहभागी होणारे चर्चाकार आहेत. मात्र, या सगळ्या ओळखींच्या मागे एक समान धागा आहे- प्रश्न विचारण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची सवय! एखादा विषय समोर आला की, त्याची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या लेखनातून दिसतो. त्यामुळे त्यांचे लिखाण केवळ मत मांडत नाही, तर वाचकाला त्या प्रश्नाचा विचार करायला भाग पाडते.
 
‘फेसबुक’वरील सहज संवादापासून अभ्यासपूर्ण लेखनापर्यंत, ‘ओबीसी’ आरक्षणाच्या प्रश्नांपासून विद्यार्थ्यांच्या हक्कांपर्यंत आणि लेखकापासून चर्चाकारापर्यंत रविकुमार कराड यांची ही वाटचाल अधिक समृद्ध होत राहो. त्यांच्या लेखणीतील प्रश्नांची धार आणि अभ्यासाची खोली कायम राहावी, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांच्या पुढील लेखन, वैचारिक आणि सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
 
९९६७०२०३६४




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर