नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’ने गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. मात्र, ही हाक कुठवरं पोहोचली, हाच खरा प्रश्न. कारण, महाराष्ट्र सोडा, साधी गल्लीही बंद पडली नाही. त्यामुळे ‘वंचित बहुजन आघाडी’चा सध्याचा जनाधार, संघटनात्मक ताकद आणि राज्यातील राजकीय प्रभाव पाहता, त्यांनी दिलेली ‘महाराष्ट्र बंद’ची हाक हास्यास्पदच ठरली. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ‘वंचित’ने राज्याच्या राजकारणात तिसरा पर्याय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आटोकोट प्रयत्न केला. मात्र, आजपर्यंत संघटनात्मक विस्तार, निवडणुकीतील यश आणि व्यापक जनाधार यापासून हा पक्ष कायम ‘वंचित’च राहिला. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर या पक्षाचा अत्यल्प प्रभाव कायम असला, तरी राज्यव्यापी जनआंदोलनाची क्षमता नाहीच. आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमध्येही उमेदवार निवडून येण्यापेक्षा केवळ मतांचे विभाजन करण्यापुरताच ‘वंचित’ गाजला. अशा परिस्थितीत पक्षाने किमान ‘अंथरूण पाहून तरी पाय पसरावे.’ पण, इथेही शेवटी एका बापाचा पुत्रमोह आड आलेला दिसतो. म्हणजे आदित्य, अमित ठाकरे ‘सीजेपी’ला पाठिंबा देऊन, दिल्लीत भेट घेऊन आणि प्रसंगी आंदोलन करुनही मोकळे झाले. ठाकरेंच्या मुलांना ‘युवानेते’ म्हणून ‘मायलेज’ मिळाले, मग माझ्या सुपुत्राने काय घोडं मारलं बरं? त्यात त्याच्या ‘लूक्स’मुळे तो तर ‘सीजेपी’च्या झुरळांच्या झुंडीत तंतोतंत शोभणाराच की. असाच विचार करुन प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’ने कसलाही विचार न करता ‘महाराष्ट्र बंद’चा फुसका प्रयोग करुन बघितला.
मुळात ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापन केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या बदललेल्या भूमिका पाहता, त्यांना मिळणारा हा अत्यल्प प्रतिसाद स्वाभाविकच. कारण, ना त्यांचे सूर ठाकरेंशी जुळले ना ओवेसींशी. जनता तर त्यांच्या समर्थनात नाहीच. त्यामुळे कुठचाही जनाधार नाही, सक्षम नेत्यांची, कार्यकर्त्यांपासूनही हे ‘वंचित’च! त्यामुळे ‘बंद’ची तोंडदेखला स्टंट करुन आंबेडकरांनी स्वत:चीच फजिती करुन घेतली. परंतु, थेट ‘महाराष्ट्र बंद’ करण्याची घोषणा म्हणजे ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ असेच म्हणावे लागेल.
दूध भेसळखोरांना लगाम
दूध हा प्रत्येक घरातील दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्याशी दूध हा पदार्थ थेट जोडलेला असल्याने त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड परवडणारी नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कृत्रिम दूध, पाणी, स्टार्च, डिटर्जंट, युरिया किंवा इतर रासायनिक पदार्थ मिसळून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या. पण, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
‘एफडीए’ने राज्यभरात विविध ठिकाणी धडक कारवाई करत या भेसळीचा पर्दाफाश केला असून, दुधात भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता दुधात भेसळ आढळल्यास संबंधित दूधविक्रेत्यावर १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हा निर्णय केवळ दंडात्मक नसून, ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल मानला जातो.
दुधात मिसळण्यात येणार्या घातक रसायनांची प्रयोगशाळेत तपासणी होणार असून, दुधातील सूक्ष्म जीवाणूंचे प्रमाणही तपासण्यात येणार आहे. दुधातील भेसळ हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा करणार्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद केल्याने भेसळ करणार्यांमध्ये निश्चितच कायद्याची भीती निर्माण होईल.
दुग्धव्यवसाय हा राज्यातील लाखो शेतकर्यांच्या उपजीविकेचा आधार. काही मोजक्या भेसळखोरांमुळे संपूर्ण दुग्धव्यवसायाची प्रतिमा मलिन होणे योग्य नाही. त्यामुळे प्रामाणिक दूध उत्पादक आणि सहकारी दूध संघटनांनाही या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी गुणवत्तापूर्ण दूध पुरविणे, हीच काळाची गरज आहे.
दुधातील भेसळीविरोधात १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद हा कठोर आणि स्वागतार्ह निर्णय मानला जात आहे. मात्र, या निर्णयाचे यश त्याच्या प्रभावी अंमलबजावणीवरही अवलंबून असेल. ग्राहकांचे आरोग्य, शेतकर्यांचा प्रामाणिक व्यवसाय आणि अन्नसुरक्षेवरील विश्वास जपण्यासाठी सरकार, प्रशासन, दुग्धव्यवसाय आणि नागरिक या सर्वांनी म्हणूनच मिळून काम करण्याची गरज आहे.