इंडोनेशियामधील २०२५ सालची एक घटना! दानी हिदायत नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार केली की, अस्त्री फित्रिनीका हिने त्याच्या बाळाचे अपहरण केले. पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली. चौकशीत समोर आले की, दानी हिदायतनेच त्याचे मूल तिला विकले होते. नंतर अस्त्रीने ते बाळ सिंगापूरला एका दाम्पत्याला लाखो डॉलर्सला विकले. तसेच अस्त्री ही केवळ प्यादे असून, अशाच प्रकारे ३३ बाळांची विक्री केली गेली आणि या गुन्ह्याची सूत्रधार होती, ७० वर्षीय ली सिऊ लुआन. दि. २१ जुलै २०२६ रोजी न्यायालयाने लुआनसह इतर १९ जणांना सजा सुनावली. मात्र, इंडोनेशियातली ही काही पहिलीच घटना नाही.
याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये पोलिसांनी मेदान शहरात एका घरावर छापा टाकला. तिथे त्यांना काही गरोदर महिला सापडल्या; ज्या गरीब होत्या किंवा अविवाहित गरोदर मुली होत्या. त्यांनी मूल जन्माला घातले की, त्यांना पैसे देऊन ती बाळे विकत घेतली जाणार होती. गरीब आणि मजबूर असलेल्या महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेत हे षड्यंत्र सुरू होते. पोलिसांनी तेव्हाही नऊजणांना अटक केली होती.
त्या पार्श्वभूमीवर २०२४ साली तर भयंकर गुन्हा उघडकीस आला होता. सोशल मीडियावर ‘प्रायव्हेट हार्ट कन्सल्टेशन’ नावाचे एक पेज होते. गरोदर महिलांना सल्ला, मदत, तसेच नवजात बालकांची आणि त्यांच्या मातांची काळजी, याबाबत या पेजवर माहिती असे. मात्र, सायबर पोलिसांना या पेजवरच्या मजकुरातील संवादामध्ये सांकेतिक शब्द आढळले. त्याचा पाठपुरावा केला. तेव्हा त्यांना संशय आला की, इथे नवजात बालकांच्या व्रिकीबाबत काहीतरी घडत आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक बनत नवजात बालक विकत घेण्यासंदर्भात संदेश या पेजवर टाकला. त्यावेळी लगेचच त्यांना पेजवरून उत्तर आले की, त्यांना नवजात बाळच नव्हे; तर सध्या मातांच्या गर्भात असलेले बाळ जन्माला आल्यावर विकत मिळू शकते. फक्त त्यांनी बाळ कसे हवे, याचा तपशील द्यावा. पोलिसांनी तसा तपशील दिला. त्यानंतर एक व्यक्ती पोलिसांच्या संपर्कात राहू लागली. बाळ विकत घेण्यासाठी पोलीस त्या व्यक्तीने सांगितलेल्या स्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण, बाली बेटाच्या त्या परिसरात अनेक नवजात शिशू चक्क विक्रीला ठेवले होते. त्यांच्या रंगारूपावरून परदेशी नागरिक त्यांची बोली लावत होते. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्कात असलेल्या व्यक्तीला पकडले. हे नवजात शिशू कुठून आले? याची खास पोलिसी चौकशी झाल्यानंतर त्या व्यक्तीने इंडोनेशियातील ‘लुईह चिल्ड्रन्स फाऊंडेशन’ या अनाथालयाचे नाव घेतले. स्वयंसेवी सामाजिक संस्था म्हणून या संस्थेच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम सुरू केले जायचे. गरोदर असलेल्या गरीब आणि फसलेल्या महिलांशी मदतीच्या नावाने संपर्क केला जायचा. कधी पैशाचे आमिष देऊन, तर कधी फसवून, तर कधी धाकदपटशा करून या महिलांकडून त्यांच्या नवजात बालकांना ताब्यात घेतले जायचे. या बालकांना दत्तक देण्याच्या नावाखाली विकले जायचे.
इंडोनेशियामध्ये नवजात बालकांच्या विक्रीचे असे अनेक गुन्हे घडले. अनेक संघटित गुन्हेगारांनी हा त्यांचा धंदाच बनवला. या गुन्हेगारांच्या जाळ्यात महिला फसतात. कारण, इथे प्रत्येक घरात पाच-सहा मुले. रोजगाराच्या आणि अर्थार्जनाच्या संधी फारशा नाहीत. गरिबीमुळे स्वतःचे अपत्य विकण्याची नामुष्की मग या पालकांवर येते. दुसरे असे की, इंडोनेशियामध्ये गर्भपातासंदर्भात अत्यंत कडक नियम आहेत. त्यामुळे फसलेल्या किंवा अनिच्छेने लादलेले मातृत्व प्राप्त झालेल्या मुली, महिला सहजासहजी गर्भपात करूच शकत नाहीत. इथले सामाजिक नियम फार कडक. त्यामुळेच विवाहापूर्वी मूल जन्माला घालणार्या स्त्रीला जगणे म्हणजे जिवंतपणी मृत्यूच! हे सगळे टाळण्यासाठी अशा फसलेल्या मुली, महिला आपल्या नवजात बालकांना सरळ तस्करांकडे सोपवतात, हे भीषण वास्तव!
नुकतेच इंडोनेशियामध्ये मुख्य सूत्रधार लुआनसोबत १९ जणांना न्यायालयाने सजा सुनावली. मात्र, मुख्य सूत्रधाराला केवळ सात वर्षांची सजा आणि इतरांना पाच वर्षे ते तीन महिने अशी सजा. त्यामुळे नवजात बालकांचे अपहरण करणार्या टोळीला खरोखरच खर्या अर्थाने सजा मिळाली का, हा प्रश्न आहे.
९५९४९६९६३८