दुर्मीळ शेणगोळा भुंग्याच्या उपप्रजातीची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद; तानसा अभयारण्यात आढळ

    24-Jul-2026
telecoprid dung beetle
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद करत तानसा वन्यजीव अभयारण्यात प्रथमच 'रोलर डंग बीटल' (telecoprid dung beetle) या शेणगोळा बनविणाऱ्या भुंग्याची अधिकृत शास्त्रीय नोंद करण्यात आली आहे (telecoprid dung beetle). या भुंग्यांच्या पॅराजिम्नोप्लुरस सिन्यूएटस सिन्यूएटस या उपप्रजातीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच वैज्ञानिक पुरावा असून, पश्चिम घाटातील कीटकवैविध्याविषयीचे ज्ञान अधिक समृद्ध करणारा हा शोध मानला जात आहे. (telecoprid dung beetle)

शेणगोळा भुंगे हे जंगलातील सर्वात महत्त्वाच्या परिसंस्था अभियंत्यांपैकी एक मानले जातात. हे भुंगे प्राण्यांच्या विष्ठेचे गोळे तयार करून ते लांब अंतरावर घरट्यासाठी किंवा अन्नासाठी नेतात. त्यामुळे जंगलात साचणारे शेण कमी होते, जमिनीचे नैसर्गिक खत वाढते, मातीची हवा खेळती राहते तसेच अनेक वनस्पतींच्या बियांचे दुय्यम प्रसारण होते. परिणामी जंगलाचे पोषणचक्र सुरळीत राहण्यास त्यांचा मोठा हातभार लागतो. या शेणगोळा भुंग्यांमधील पॅराजिम्नोप्लुरस सिन्यूएटस या प्रजातीच्या दोन उपप्रजाती आहेत. यामधील पॅराजिम्नोप्लुरस सिन्यूएटस सिन्यूएटस या उपप्रजातीची महाराष्ट्रातून प्रथमच नोंद झाली आहे. ही नोंद झूलाॅजिकल सर्वे आॅफ इंडियाच्या (वेस्टर्न रिझन सेंटर,पुणे) संशोधक अपर्णा सुरेशचंद्र कलावते, श्रेया अतिश कवोडिया आणि रिया संदीप फोंडके यांनी केली आहे. यासंबंधीचा संशोधन अहवाल जर्नल आॅफ एॅटोमाॅलाॅजी रिसर्च या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहेत.

संशोधनादरम्यान २०२५ मध्ये तानसा अभयारण्यातील वन विश्रामगृह परिसरात या भुंग्याचा एक नर नमुना संकलित करण्यात आला. त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून आंतरराष्ट्रीय वर्गीकरण निकषांच्या आधारे ओळख निश्चित करण्यात आली असून हा नमुना झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहात जतन करण्यात आला आहे. पॅराजिम्नोप्लुरस सिन्यूएटस ही प्रजाती यापूर्वी महाराष्ट्रातून ज्ञात होती. मात्र तिची पॅराजिम्नोप्लुरस सिन्यूएटस सिन्यूएटस ही उपप्रजात महाराष्ट्रात कधीही नोंदविली गेली नव्हती. यापूर्वी या उपप्रजातीच्या नोंदी केरळ, छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून झाल्या होत्या. आता तानसा अभयारण्यातील या नोंदीमुळे महाराष्ट्राचाही या वितरणात समावेश झाला आहे.

कसा दिसतो भुंगा?
संशोधनानुसार हा भुंगा सुमारे २१ मिमी लांबीचा, काळसर आणि किंचित चमकदार शरीराचा आहे. डोक्याचा पुढील भाग दुभंगलेला, पुढच्या पायांवर मजबूत दातांसारखी रचना आणि मागील पाय वाकलेले असल्यामुळे शेणाचा गोळा ढकलण्यासाठी तो विशेष अनुकूल बनलेला आहे. ही वैशिष्ट्ये त्याची अचूक ओळख पटविण्यास उपयुक्त ठरतात. संशोधकांच्या मते, महाराष्ट्रातील ही पहिली नोंद केवळ एका नवीन उपप्रजातीची भर नाही, तर पश्चिम घाटातील संरक्षित वनक्षेत्रांमध्ये अजूनही अनेक कीटक प्रजातींचा पुरेसा अभ्यास झालेला नसल्याचे ती दर्शविते. त्यामुळे भविष्यात अशा क्षेत्रांमध्ये अधिक व्यापक सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.




संबंधित मजकूर