'स्पिशीज रिकग्निशन मॉडेल'द्वारे फोटोतील वन्यजीवांची ओळख पटवा !

    24-Jul-2026

Species Recognition Model



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मध्य भारतातील जंगलांमध्ये कॅमेरा ट्रॅपद्वारे टिपल्या जाणाऱ्या लाखो छायाचित्रांमधील वन्यजीवांची ओळख आता काही मिनिटांत शक्य होणार आहे (Species Recognition Model). यासाठी वाइल्डलाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट (डब्लूसीटी) आणि अॅडॅक्स डेटा सायन्स यांनी स्पिशीज रिकग्निशन मॉडेल विकसित केले आहे (Species Recognition Model). हे माॅडेल ९७ टक्के अचूकतेने ४० वन्यजीव वर्गांची ओळख पटविणारे मुक्त-स्रोत पद्धतीने उपलब्ध असणारे सॉफ्टवेअर आहे (Species Recognition Model). हे साॅफ्टेवअर संशोधक, वनाधिकारी आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असून इंटरनेटशिवायही संगणकावर चालविता येते. (Species Recognition Model)
 
वन्यजीव संशोधनात कॅमेरा ट्रॅप हे अत्यंत प्रभावी साधन मानले जाते. जंगलातील प्राण्यांची उपस्थिती, वर्तन, अधिवासाचा वापर आणि लोकसंख्येतील बदल यांचा अभ्यास करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र हजारो नव्हे तर लाखो छायाचित्रांची हाताने तपासणी करून प्रत्येक प्रजातीची ओळख पटविणे हे अत्यंत वेळखाऊ, खर्चिक आणि मनुष्यबळाची गरज असलेले काम आहे. विशेषतः लहान संशोधन संस्था, महाविद्यालये आणि स्वतंत्र संशोधकांसाठी ही मोठी अडचण ठरते. हीच समस्या लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवीन मॉडेल हे कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करून कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांतील प्रजातींची स्वयंचलित ओळख करून देते. या मॉडेलची ९७.३ टक्के अचूकता वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक मानकांनुसार असल्याचे डब्लूसीटीने स्पष्ट केले आहे.
 
या मॉडेलच्या निर्मितीसाठी ११ लाखांहून अधिक कॅमेरा ट्रॅप छायाचित्रांचा वापर करण्यात आला. ही छायाचित्रे मध्य भारतातील १० हजारांहून अधिक स्वतंत्र ठिकाणांवरून अनेक वर्षांच्या नियोजित सर्वेक्षणातून संकलित करण्यात आली होती. विशेषतः मध्य भारतातील वनक्षेत्र लक्षात घेऊन हे मॉडेल प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे त्या प्रदेशातील प्राण्यांची शारीरिक वैशिष्ट्ये आणि जंगलाची पार्श्वभूमी यांचा अचूक अभ्यास करून मॉडेल अधिक विश्वासार्ह परिणाम देते. या मॉडेलचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एका छायाचित्रात अनेक प्राणी किंवा अनेक प्रजाती असल्या तरी त्यांची स्वतंत्रपणे ओळख करण्याची क्षमता. त्यामुळे गवा, साळींदर किंवा इतर प्राणी एकाच फ्रेममध्ये असतानाही त्यांचे अचूक वर्गीकरण करता येते. याविषयी डब्लूसीटीच्या आदित्य जोशी यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर स्पिशीज रिकग्निशन मॉडेल्स उपलब्ध असले तरी विशिष्ट प्रदेशातील स्थानिक छायाचित्रांवर आधारित ए-आयला प्रशिक्षित केल्यास त्याची अचूकता लक्षणीयरीत्या वाढते. स्थानिक अधिवास, प्रकाश, वनस्पती आणि प्राण्यांच्या स्वरूपातील प्रादेशिक बदल लक्षात घेतल्यामुळे कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांमधून अधिक अचूक ओळख पटविणे शक्य होते.
Link to download the software: https://addaxdatascience.com/addaxai/
कॅमेरा ट्रॅपमधून मिळणाऱ्या प्रचंड डेटाचे जलद आणि प्रभावी वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी हे माॅडेल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी, संशोधक आणि वनाधिकारी कमी वेळेत, कमी खर्चात आणि अधिक विश्वासार्ह पद्धतीने डेटा विश्लेषण करू शकतील. परिणामी वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी अधिक प्रभावी निर्णय घेणे शक्य होईल. भविष्यात अशाच प्रकारची प्रादेशिक मॉडेल्स देशातील इतर जंगलांसाठी विकसित करण्याचा मार्गही या उपक्रमामुळे खुला होण्याची शक्यता आहे. - डाॅ. अनिष अंधेरिया, अध्यक्ष, डब्लूसीटी





संबंधित मजकूर