पंढरीच्या वारीचा सामाजिक आशय...

    24-Jul-2026
 
 
Pandharpur Wari
 
उद्या देवशयनी आषाढी एकादशी... त्यानिमित्ताने लाखोंच्या संख्येने विठूनामाचा गजर करीत, आपले माहेर असलेल्या पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटात वारकर्‍यांचा मेळाही अखेरीस विसावला. भक्तिसागराच्या वारीत शेकडो किलोमीटर पायी चालल्यानंतरही शारीरिक वेदनेची भ्रांत नसलेल्या वारकर्‍यांना, आता आस आहे ती फक्त त्यांच्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची! अशा या महाराष्ट्रातील महासोहळा असलेल्या वारीचा सामाजिक आशय उलगडणारा हा लेख...
 
आषाढी एकादशी जवळ आली की, वारकरीच नव्हे; तर समस्त भाविक मंडळींना वारीचे वेध लागतात. हल्लीच्या भाषेत ‘वारी फिव्हर’! वर्तमानपत्र, दूरदर्शन आणि समाजमाध्यमांतून यासंबंधी माहितीचा जणू पूरच वाहात असतो. या वारीचा एकूणच समाजमनावर खोलवर परिणाम पाहायला मिळतो. केवळ आज नाही, तर पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि मानसिकता यातून हा परिणाम दृढ झाला आहे. तेव्हा, आपण या वारीच्या सामाजिक आशयाचा विचार करू.
 
वारकरी आहे असे म्हटल्यावर त्या माणसाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच बदलून जातो. तुळशी माळ गळ्यात आहे म्हणजे हा माणूस सज्जनच आहे, याची खात्री! निष्कलंक चारित्र्याची व्यक्ती आहे, असा सहजभाव मनात उत्पन्न होतो. वारीच्या संकल्पनेने समाजात जे स्थान निर्माण केले, अनेक संतांच्या मांदियाळीने जी श्रद्धा जागवली आणि समाजाने जी श्रद्धेने जपली त्याचेच हे फलित आहे, असे म्हणता येईल.
 
या मांदियाळीतील सर्व संतांचे अभंग हे सर्वदूर लोकप्रिय. याच माळेतील संत नामदेव यांनी तर भारतभर भ्रमण केले; भागवत धर्माची पताका, भक्तीचा संदेश सर्व देशभर पसरविला. याच संत नामदेवांच्या काही ‘दोह्यां’चा समावेश पवित्र ‘गुरू ग्रंथ साहिब’ यामध्येही केला गेला आहे. या संतांच्या अभंगांनी फार मोठे सामाजिक आणि आध्यात्मिक काम केले. विशेष म्हणजे, या संतांपैकी अनेक संत बहुजन समाजातून आले होते आणि त्यांना सर्व समाज आजही पूज्य मानतो. अध्यात्मात परमेश्वराकडे जाण्याचे जे मार्ग आहेत, त्यात या कलियुगात सर्वांना झेपणारा असा सहज मार्ग म्हणजे भक्तिमार्ग. याची गोडी सर्व समाजाला लावण्याचे काम या विठ्ठलभक्त संतांनी केले आहे. त्याचबरोबर या अभंगांमध्ये आध्यात्मिक साधना करणार्‍यांसाठीसुद्धा मार्गदर्शन आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे- ‘मोगरा फुलला...’ त्यातील एक ओळ आहे, ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...’ म्हटले तर मोगर्‍याच्या झाडाचे आणि भक्तीचे वर्णन... परंतु, यातील आध्यात्मिक अर्थही फार गूढ आणि गहन आहे. सर्व अभंगांमध्ये जसा सोपा भक्तिरस आहे, तसा आध्यात्मिक उपदेशही आहे. ज्याला जसा भावेल, तसा त्याने घ्यावा.
 
याच पांडुरंगाच्या वारीने अवघा महाराष्ट्र जोडला. वारीत सर्व ठिकाणांहून भक्त येतात, एकमेकांत एकत्वाच्या भावनेने मिसळून जातात आणि या चराचरांत तोच सामावला आहे याची अनुभूती घेतात. भेदभाव, आसक्ती, असूया सर्वकाही विठूच्या चरणांशी गळून पडते आणि शिल्लक राहतो तो एक विशुद्ध माणूस! अंतःकरणात प्रेम आणि भक्तिभाव यापेक्षा अन्य काही शिल्लकच राहात नाही. याचबरोबर ‘या प्रदेशातील सर्वजण माझेच आहेत,’ हा भावही जागृत होतो आणि याच मानसिकतेचा स्वाभाविक उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राष्ट्रउभारणीच्या कामात झाला. या भूमीवर, माझ्या माणसांवरील आक्रमण, माझ्या धर्मावरील आक्रमण हे मीच परतवून लावायला हवे, ही मानसिकता या सर्व संतांनी निर्माण केली. ‘नाठाळाचे माथी हाणू काठी...’ ही शिकवण या भागवत धर्मानेच तर दिली आहे.
 
विठुरायाची वारी हा विलक्षण अनुभव आहे, हे यात सहभागी होणारी मंडळी सांगतात. आपल्यापैकी बरीचशी मंडळी यात सहभागी होऊ शकत नाहीत. मात्र, हल्ली एक दिवस तरी वारी अनुभवावी, असा प्रघात सुरू झाला आहे. माझ्या माहितीतील बरेच जण याचा अनुभव दरवर्षी घेतात. शहरी भागातील मंडळींचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढलेला दिसून येतो आहे, ही एक चांगली बाब. विशेषतः तरुण-तरुणींचा यात वाढता सहभाग दिसून येतो. आपल्याकडे वारीत सहभागी होऊन आलेल्या वारकर्‍याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. हा नमस्कार त्या माणसाला नाही; तर ज्या भक्तिभावाने त्यांनी वारी पूर्ण केली, त्या भक्तिभावाला आणि त्या विठुमाऊलीला, ज्याने ही वारी पूर्ण करून घेतली.
 
आजही या भक्तिभावाची अत्यंत जरुरी आहे. समाज एक राहण्याची, समाजातील भेदभाव दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि यासाठी वारी, वारकरी प्रवृत्ती यांचा अंगीकार करण्याची आवश्यकताही! याचबरोबर आणखीन एका गोष्टीची आवश्यकता आहे, ती म्हणजे आपला भोळसटपणा दूर करण्याची! अवघा वारकरी हा भक्तिभावाने रंगलेला असतो, अत्यंत साधा आणि भोळा असतो आणि याचाच फायदा घेऊन आज काही माणसे, संस्था या बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचवर्षी आपण पाहिले की, एक मुस्लीम वारकर्‍यांना गोळा करून तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक भाग असे सांगून, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे’ म्हणजे, ‘अल्ला हेच सर्वस्व’ असे भजन त्यांच्याकडून करून घेत होता. आपली भोळी वारकरी मंडळी ते म्हणत होती. मात्र, तो अभंग तुकाराम महाराजांनी इस्लामी मानसिकतेवर आसूड ओढण्यासाठी लिहिला आहे, याचा विसर आपल्याला पडतो. काही इस्लामी वारकर्‍यांच्या विश्रांतीस्थळावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज कसे सेक्युलर होते, त्यांनी इस्लामला कशी मदत केली वगैरे प्रवचने देत असतात. ‘विद्रोही कीर्तन’ नावाचा प्रकार सुरू झाला आहे, डावी आणि नक्षली मंडळी वारकरी बनून वारीत शिरत आहेत. ‘संविधान वारी’ असे गोंडस नाव देऊन बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. समरसता जागविणार्‍या वारकरी मंडळींना ‘समरसता वारी’ या गोंडस नावाखाली हिंदू समाजात कशी विषमता आहे, हे सांगितले जात आहे. नुकतेच शरद पवार यांचे वारकर्‍यांवरून केलेले वक्तव्य आणि त्यावरून त्यांचाच एक चेला याने काही सन्माननीय वारकरी मंडळींबद्दल केलेले निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य आपण सर्वांनी वाचले आणि ऐकलेही असेल. अगदी कालपरवाच जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले गेले. वारकरी मंडळींनी या प्रकाराची योग्य दखल लगोलग घेतली आणि निषेधही व्यक्त केला. आपण हे सर्व डोळसपणे समजून घेण्याची आज गरज आहे. मंडळी, वारीमधील हे प्रकार ही केवळ एक झलक आहे. सर्वच ठिकाणी असे उद्योग सुरू आहेत. ‘भले तो देऊ कासेची लंगोटी’ हा आपला मूळ स्वभाव आहेच. पण, त्यापुढील महत्त्वाचे म्हणजे ‘नाठाळाचे माथी हाणू काठी’ हेही अमलात आणले पाहिजे.
 
मंडळी, एक स्पष्टीकरण- भागवत धर्म हा काही रूढ अर्थाने वेगळा धर्म नाही बरे का! यात धर्म म्हणजे एक उपासनापद्धती याच अर्थाने घेतला पाहिजे.
 
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल|
 
- अरविंद जोशी




संबंधित मजकूर