॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ३३॥

    23-Jul-2026


Saundarya Lahari Bhashya

जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते
तिरस्कुर्व-न्नेतत् स्वमपि वपु-रीश-स्तिरयति|
सदा पूर्वः सर्वं तदिद मनुगृह्णाति च शिव-
स्तवाज्ञा मलम्ब्य क्षणचलितयो र्भ्रूलतिकयोः॥२४॥
आपण मागील लेखापासून पुढे निरूपण करत आहोत. हे श्री ललिता सहस्रनामातील याच श्लोकाचा विस्तार मांडणारे निरूपण आहे.

नाम क्रमांक २६८ : संहारिणी
 
श्री ललिता देवी संहार घडवते. भौतिक पातळीवर होणारा नाश, या अर्थाने इथे ‘संहार’ हा शब्द वापरला आहे. सामान्यतः आपण संहार म्हणजे मृत्यू समजतो आणि ते सत्यही आहे. परंतु, मृत्यू हा फक्त देहाचा होतो. आत्मा या पातळीवर विचार केल्यास, इथे संहार घडत नसून आत्मा एका जीर्ण देहरूपी वस्त्राचा त्याग करून, नवीन वस्त्र धारण करतो. अर्थात, जीर्ण देह या पातळीवर संहार आहे. परंतु, नूतन देह धारण करणे, हे सृजनसुद्धा पाठोपाठ होणारच आहे. अर्थात, एकाचा संहार हा दुसर्‍याचे सृजन ठरतो आणि ही क्रिया आवर्तन स्वरूपात, संपूर्ण सृष्टीमध्ये अव्याहत चालू राहते.
 
संहार हा सृष्टीमध्ये अत्यंत आवश्यकच आहे. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय या अव्याहत चालणार्‍या क्रिया असून, एका क्रियेतूनच दुसरीचा मार्ग प्रशस्त होतो. मानवी देहातील पेशीदेखील नित्य जन्माला येतात आणि जुन्या पेशी नष्ट होतात. संपूर्ण सृष्टीचक्र हे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या सूत्रानेच बद्ध असते. एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यावर, त्याचे कलेवर हे दुसर्‍या प्राण्यासाठी अन्न असते. सिंह जंगलात हरिणाचा संहार करतो. पण हरिणाचा मृतदेह हा सिंहाच्या कुटुंबासाठी, तरसासाठी अन्न आहे, गिधाडांसाठी अन्न आहे, कित्येक सूक्ष्म कीटकांसाठी अन्न आहे. मात्र, हे सगळे जीव हरिणाप्रमाणे जीवात्मेच आहेत, त्यांच्यासाठी हरिणाचा मृत्यू हा वरदानच आहे, अन्न आहे.
 
हरिणाचा आत्मा त्याचा हा देह त्यागून, पुढे अन्य देह धारण करून जन्माला येणार आहे. तिथे त्याच्या पूर्वस्मृतीमध्ये हा मृत्यू निश्चितच नसेल. सृष्टीमध्ये या तीन क्रिया वर्तुळाकार सतत चालूच असतात. या तिन्ही क्रिया परस्परांवर अवलंबून, परस्परांना पूरक आणि परस्परांना साहाय्यकारी असतात. सृष्टीमध्ये हे अव्याहतपणे चालूच राहणार आहे. या तिन्ही क्रिया घडण्यासाठी, कारक असणारी चेतना म्हणजे श्री ललिता देवी. ती ही तिन्ही कार्ये अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांमार्फत करवून घेत आहे.
 
नाम क्रमांक २६९ : रुद्ररूपा
 
एखाद्या जीवाच्या मृत्यूला कारण होताना, श्री ललिता देवी रुद्र रूप धारण करते. रुद्र हा मृत्यूदेव मानला जात नाही; कारण ‘रुद्र’ अर्थात दुःखांचा नाश करणारा. जीवनाच्या अंतिम टप्प्यात वृद्धावस्थेने जर्जर देह, हा व्याधींनी ग्रस्त असतो. या वेदनांचा, या दुःखाचा अंत करणे केवळ मृत्यूलाच शय असते. म्हणूनच या यातनांचा नाश करून, जीवात्म्याला पुढील जन्माच्या दिशेने जो प्रेरित करतो, तो रुद्र.
 
भावार्थ : सामान्य जीवासंदर्भात ‘रु’चा अर्थ अशा वेदना किंवा यातना, ज्यांचा उद्भव आपल्या ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा अयोग्य वापर केल्याने निर्माण झालेला आहे. ‘द्र’ म्हणजे जो या वेदनांना आणि यातनांना दूर लोटतो किंवा त्यांचा नाश करतो.
 
रुद्र या नावाचा एक वेगळा अर्थसुद्धा आहे. रुद्र म्हणजे रुदन करत फिरणे, अर्थात रडत भ्रमण करणे. रुद्र म्हणजे प्राण किंवा प्राणशक्ती. प्राण हा एक वायू आहे. एखादे बालक ज्यावेळी जन्माला येते, त्यावेळी ते प्रथम श्वास घेते, अर्थात आपल्या देहात प्राण शोषून घेते आणि त्यानंतर ते रुदन करू लागते. रुद्राचे अर्थात प्राणवायूचे हे रुदन, जन्माचे निदर्शक आहे. रुद्राचे कार्य म्हणजे, ॐकाराच्या माध्यमातून जीवात्म्याचे वैश्विक चेतनेशी ऐय साधणे.
 
सूक्ष्मरूपाने रुद्र या सर्व दुष्ट शक्तींचा नाश करतो. स्थूलरूपाने आपण रुद्राला ‘शिव’ म्हणून ओळखतो. शिव हा परिपूर्ण ईश्वरस्वरूप असून, तो जीवात्म्याच्या पूर्णत्वाला पोहोचण्याच्या मार्गातील प्रत्येक अडथळ्याचा नाश करतो. परंतु, त्याच्या उपासक जीवात्म्यासाठी तो करुणानिधी आणि वरदायी आहे. शिवाचा ‘महामृत्युंजय मंत्र’ या रुद्र रूपाचे अत्यंत सुंदर वर्णन करतो.
 
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्|
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
 
या मंत्राचा रुद्र या नामाभिधानाच्या दृष्टिकोनातून अर्थ खालीलप्रमाणे :
हे तिन्ही लोकांचा स्वामी असलेल्या परमेश्वरा, माझ्या मनोवांच्छित कामनांची पूर्तता करणार्‍या परमेश्वरा, मला पूर्णत्व आणि शक्ती प्रदान करणार्‍या ईश्वरा, माझे तुझ्याकडे एकच मागणे आहे. मला मृत्यूच्या बंधनातून एखाद्या पूर्ण पिकलेल्या काकडीप्रमाणे मुक्त कर. पिकलेली काकडी जर झाडाला लगडलेली असेल, तर ती आपोआप गळून पडते आणि जमिनीवर पडल्यावर तिचा मगज, बिया आणि वरील कवच हे वेगवेगळे होते. इथे काकडीचे कवच म्हणजे जीवात्म्याचा भौतिक देह आहे आणि आतील मगज आणि बिया म्हणजे आत्मा आहे. अर्थात, हे रुद्रा, मला पूर्ण पक्व होऊन मृत्यू प्राप्त होवो, मला अपमृत्यू नको आहे आणि ज्यावेळी मृत्यू येईल, त्यावेळी पक्व फळ गळून पडावे इतका सहज, वेदनाहीन मृत्यू यावा. माझ्या आत्म्याला देहाचे आणि त्या देहातील वासनांचे कोणतेही बंधन किंवा मोह उर्वरित राहू नये, माझा आत्मा देहापासून सहजगत्या विलग होऊन, पुढील प्रवासाला उद्युक्त व्हावा.
 
उत्पत्ति स्थिती आणि संहार या तीन अवस्थांचे अनुक्रमे असणारे ईश्वरी तत्त्व आणि त्यांचे कार्य आपण आत्तापर्यंत पाहिले आहे. अन्य दोन तत्त्वे, त्यांची ईश्वरी रूपे आणि कार्य यांचे निरूपण याच लेखमालेतील पुढील भागात, आपल्याला वाचण्यास मिळेल.

सुजीत भोगले




संबंधित मजकूर