मुंबई : (Maharashtra Railway Ashwini Vaishnav) केंद्र सरकारने २०२६-२७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला तब्बल २३,९२६ कोटींची विक्रमी तरतूद केली असून, देशातील सर्वाधिक निधी महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रासाठी रेल्वे प्रकल्पांसाठी सरासरी १,१७१ कोटी इतकी वार्षिक तरतूद केली जात होती. त्याच्या तुलनेत यंदाची तरतूद २० पटांहून अधिक असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्राला प्राधान्य देत राज्यभरात नव्या रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, तिसरी-चौथी रेल्वेलाइन, उपनगरीय रेल्वे क्षमता वाढ आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
१२ वर्षांत २,५८५ किमी नवीन रेल्वेमार्ग
२०१४ ते २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात २,५८५ किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग सुरू करण्यात आले असून, सरासरी दरवर्षी २१५.४ किमी मार्ग कार्यान्वित झाला आहे. यूपीए सरकारच्या २००९-१४ कालावधीत ही सरासरी केवळ ५८.४ किमी होती. म्हणजेच नवीन रेल्वेमार्ग उभारणीचा वेग जवळपास चारपट वाढल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.
राज्यात ५२ प्रकल्पांवर काम
१ एप्रिल २०२६ पर्यंत महाराष्ट्रात ५२ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यात १३ नवीन रेल्वेमार्ग, दोन गेज रूपांतरण आणि ३७ दुहेरीकरण/बहुपदरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण लांबी ५,९५६ किमी असून त्यांचा अंदाजित खर्च ₹१.४२ लाख कोटींहून अधिक आहे. यापैकी १,५९८ किमी काम पूर्ण झाले असून आतापर्यंत ₹३४,७८२ कोटींचा खर्च करण्यात आला आहे.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
अनेक नवीन रेल्वेमार्गांना गती
राज्यात सुरू असलेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये अहिल्यानगर–परळी वैजनाथ, बारामती–लोणंद, वर्धा–नांदेड, इंदूर–मनमाड, वडसा–गडचिरोली, जालना–जळगाव, सोलापूर–तुळजापूर–उस्मानाबाद या नव्या रेल्वेमार्गांचा समावेश आहे. तसेच वर्धा–नागपूर, वर्धा–बल्लारशाह, इटारसी–नागपूर, कल्याण–कसारा, कसारा–मनमाड, गोंदिया–डोंगरगड यांसारख्या मार्गांवर तिसरी व चौथी रेल्वेलाइन टाकण्याची कामेही सुरू आहेत.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
मुंबई उपनगरीय रेल्वे क्षमतेत मोठी वाढ
मुंबईतील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन MUTP-I, II, III आणि IIIA अंतर्गत अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. मुंबई सेंट्रल–बोरिवली सहावी लाइन, हार्बर लाईनचा गोरेगाव–बोरिवली विस्तार, विरार–डहाणू तिसरी-चौथी लाइन, पनवेल–कर्जत उपनगरीय कॉरिडॉर, ऐरोली–कळवा एलिव्हेटेड लिंक, बोरिवली–विरार पाचवी-सहावी लाइन यांसारखे प्रकल्प यामध्ये समाविष्ट आहेत. तसेच १५ डब्यांच्या लोकलसाठी ३४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्तार करण्यात येत आहे.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग
मुंबई-अहमदाबाद ५०८ किमी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. प्रकल्पासाठी आवश्यक संपूर्ण जमीन संपादित करण्यात आली असून सर्व वैधानिक मंजुऱ्याही प्राप्त झाल्या आहेत. आतापर्यंत ४५२ किमी पिलर्स, ३५६ किमी गर्डर्स, २०९ किमी ट्रॅक बेड आणि १९० किमी ओएचई मस्तूल उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील ठाणे, विरार, बोईसर आणि बीकेसी स्थानकांवरही काम वेगाने सुरू आहे.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
मुंबई–पुणे हायस्पीड रेल्वेचाही मार्ग मोकळा
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये मुंबई–पुणेसह देशातील सात नवीन उच्च-गती रेल्वे मार्गांची घोषणा करण्यात आली आहे. या मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), तांत्रिक व्यवहार्यता आणि आर्थिक उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
मालवाहतूक क्षमतेलाही बळ
पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (DFC) पूर्णपणे कार्यान्वित झाले असून, आता डंकुनी–सुरत नवीन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरची घोषणाही करण्यात आली आहे. या कॉरिडॉरमुळे महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील उद्योग, बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.(Maharashtra Railway Ashwini Vaishnav)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.