पाटण्यातही विद्यार्थी आंदोलन हिंसक वळणावर; ५०० अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल, ४० हून अधिक जण ताब्यात

    23-Jul-2026   


Student Protest Patna Violence

 

मुंबई : (Student Protest Patna Violence) दिल्लीच्या धर्तीवर बिहारच्या पाटणा येथे बुधवारी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ, दगडफेक आणि हिंसाचार घडला. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आयसा (एआयएसआ) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने पोलिसांवर तसेच काही पत्रकारांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पाटणा पोलिसांनी उशिरा रात्री मोठी कारवाई करत कोतवाली, गांधी मैदान आणि सचिवालय पोलीस ठाण्यांत ५०० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आतापर्यंत ४० हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. (Student Protest Patna Violence)


पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंच्या आधारे उपद्रवात सहभागी झालेल्यांची ओळख पटवली जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. हिंसाचारानंतर पटणा पोलिसांनी गांधी मैदान, कदमकुआँ, बहादुरपूर, बोरिंग रोड आणि बुद्धा कॉलनी या भागांत सघन छापेमारी केली. याशिवाय, या आंदोलनामागे कोणाचा सहभाग होता, त्याचे नियोजन कोणी केले आणि हिंसाचार घडवून आणण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत होती, याचाही तपास सुरू आहे. पोलिसांचे सायबर सेल काही यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सच्या भूमिकेचाही तपास करत आहेत. (Student Protest Patna Violence)

डाकबंगला चौकापासून बेली रोडपर्यंत आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हिंसाचारात पटणा आयजी यांच्या एस्कॉर्ट वाहनाची, सिटी मॅजिस्ट्रेट संजय कुमार यांच्या वाहनाची तसेच अनेक पोलिस वाहनांची तोडफोड करण्यात आली. याचवेळी भागलपूरचे भाजप आमदार रोहित पांडे यांच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या वाहनाला उलथवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यांच्याशी मारहाण झाल्याचाही आरोप आहे. तसेच भाजप आमदार विनय बिहारी आणि पक्षनेते अजय सिंह यांच्या वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. (Student Protest Patna Violence)

राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू

या घटनेनंतर बिहारच्या राजकीय वर्तुळातही वातावरण तापले आहे. भाजप नेत्यांनी आरोप केला की, दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनाच्या निषेधार्थ पटण्यात काढण्यात आलेल्या भाजपच्या पदयात्रेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कट रचून दगडफेक आणि लाठीहल्ला करत शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पटणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Student Protest Patna Violence)
  
 

 





ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर