॥गीतासार भाग २३॥

    23-Jul-2026


Pandava Kaurava Akshauhini 
 
कौरव पांडव सेनेची अक्षौहिणी संख्या

पांडव म्हणजे सद्वृत्ती पक्ष आणि कौरव म्हणजे असद्वृत्ती पक्ष, हे आपण पाहिलेच आहे. कौरव सेना ११ अक्षौहिणी व पांडव सेना सात अक्षौहिणी सांगितली आहे. दोन्ही सैन्ये मिळून गीतेच्या अध्यायासारखे १८ अक्षौहिणी सैन्य बनते. सर्व प्रदेशांत सैन्याचे अनेक विभाग करून वेगवेगळ्या स्थानी युद्ध केले जाते; एकाच स्थानी नव्हे! काय १८ अक्षौहिणी संख्या युद्धभूमीच्या तुकड्यावर एकत्र येऊ शकते? आणि या सर्व सेनेला एकत्र घेऊन कोणी युद्ध का करेल? ‘अक्षौहिणी’ शब्दाचा व्यास आशय निराळा आहे.
 
अक्षौहिणी म्हणजे ‘अक्ष + अह + इनि.’ आता ‘अक्ष’ म्हणजेच मूळ आधार (Axis), ज्याच्यावर बैलगाडी अथवा घोडागाडीचे चाक फिरते. मानव पिंड ज्या मूळ आधारावर (मूलाधारावर) स्थित आहे, त्याला ‘व्यास अक्ष’ म्हणतात. ‘अह’ म्हणजे गतिमानता, जीवनयात्रा. ‘इनि’ म्हणजे अवस्था हे तीन उपशब्द मिळून, ‘अक्षौहिणी’ शब्द बनला आहे. ज्याचा व्यास आशय आहे साधक पिंडाची घटनेद्वारे साधक आपले जीवन गतिमान करतो. पंचज्ञानेंद्रिये, मन आणि श्रेष्ठ बुद्धी मिळून पांडवांची धारणा सेना म्हणजेच सात अक्षौहिणी संख्या दाखविली आहे. कौरवांची सेना ११ अक्षौहिणी दाखविली आहे. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये आणि एक असंस्कारित आडमुठे (दुः) मन मिळून, कौरवांची ११ अक्षौहिणी संख्या होते. कौरव सेनेत श्रेष्ठ संतुलित बुद्धी नाही, त्यामुळे संख्येने अधिक राहूनही कौरव वृत्तियुद्धात पराभूत होतात. ही १८ अक्षौहिणी सेना, धर्मक्षेत्रावर व कुरुक्षेत्रावर वृत्तियुद्धासाठी एकवटते, जी प्रत्येक साधकाच्या क्षेत्रात सदासर्वदा संघर्ष करीत असते.
 
गीतेतील व्यक्तींची नावे
 
गीतेत साधारणतः धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांची नावे आली असली, तरी महाभारतात न आलेली बरीच नावे गीतेने वृत्तियुद्धाकरिता वापरली आहेत. त्या नावांचा साधारण आशय साधारणतः ऐतिहासिक व्यक्तिनिहाय वाटत असला, तरी अधिक खोल विचार केल्यास गीतेतली सर्व नावे व्यासांनी आपल्या आध्यात्मिक वृत्तियुद्धाकरिता वापरली आहेत. पहिल्या अध्यायात संजय धृतराष्ट्राला युद्धभूमिवरील वर्णन करण्यास सुरूवात करतो. वृत्तियुद्ध सुरू होण्यापूर्वी प्रथम दुर्योधन गुरू द्रोणाचार्यांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागताना, पांडव पक्षातील आणि स्वकीय कौरव पक्षातील ज्या व्यक्तींची नावे सांगतो. त्या नावात अवस्थावृत्तींना आवश्यक अशीच वृत्तिनामेच वर्णन करतो. उदाहरणार्थ, पांडव पक्षातील, म्हणजे सद्वृत्ती पक्षातील युद्धहेतूने प्रेरित झालेल्या व्यक्तींची नावे संजय सांगतो. वरील सर्व नामयोजनेवरून, वेदव्यासांची सूक्ष्मबुद्धी आणि योगशास्त्रातील सखोल व्यासंग आणि अनुभव लक्षात येऊ शकेल. शत-शत वृत्तिअवस्थांना नावे द्यावीत, भगवान वेदव्यासांनीच!
 
पांडव सेनेचे प्रमुख वीर
 
पांडव पक्षातील वीरांची जंत्री अशी द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न, युयुधान, सात्यकी, विराट, द्रुपद, धृष्टकेतु, चेकितान, बलवान काशिराज, पुरूजित, कुंतिभोज, नरपुंगव शैब्य, युधामन्यू, बलवान उत्तमौज, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र.
 
धृष्टद्युम्न
 
धृष्टद्युम्न हा द्रुपद राजाचा पुत्र दाखविला असून, त्यानेच पांडव सेनेची युद्धाच्या पहिल्या दिवशी व्यूहरचना केली होती. द्रौपदी आणि धृष्टद्युम्न सख्खे(जुळे) बहीण-भाऊ होत. द्रुपदाने एक यज्ञ केला असता, त्या यज्ञज्वालांमधून द्रुपदाला एक पुत्र प्राप्त झाला. कोणत्याच मानवाची अथवा साध्या जीवाची प्राप्ती, यज्ञातून होत नसते. यावरून ‘यज्ञ’ म्हणजे वृत्तितपस्या केल्यावर, त्या तपनातून अथवा ज्वालांमधून प्राप्त होणारा पुरुषार्थ, म्हणजेच वेदव्यासांच्या दृष्टीने पुत्र धृष्टद्युम्न होय! ‘यज्ञ’ म्हणजे अग्नी भडकावून त्यात काही कथित मंत्र पुटपुटून आहुती देणे नसून, तपस्येद्वारे मन-बुद्धीला अधिक सूक्ष्मग्राही बनविणे होय. म्हणूनच गीतेत यज्ञाचे स्वरूप खालीलप्रमाणे सांगितले आहे.

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नी ब्रह्मणा हुतम्|
ब्रह्मैव तेन गन्तव्यम्ब्रह्मकर्मसमाधिना॥श्लो.२४,अ.४॥
 
ब्रह्म हवीनेच ब्रह्माला अर्पण करायचे. अग्नीही ब्रह्म असून, त्यात आहुतीसुद्धा ब्रह्माच्याच द्यायच्या असतात. या आहुती ब्रह्मालाच जात असून, कर्मसुद्धा ब्रह्मच आहे. असल्याच तपस्यापूत जीवनाला ‘यज्ञ’ म्हणतात. खर्‍या यज्ञाची ही कल्पना आणि क्षमता नंतरच्या काळात नष्ट होऊन, अग्नी प्रज्वलित करून त्यात इतर वस्तूंद्वारे आहुती देऊन ब्रह्मकर्म केल्याचा आविर्भाव आणला गेला. मूळ कल्पना जाऊन त्याऐवजी नाट्य आणि कर्मावडंबर उत्पन्न झाले. असल्या अवडंबराचाच उपनिषदांनी आणि बुद्धांनी विरोध केला होता. ‘यज्ञ’ म्हणजे साधनेकरिता करायची तपस्या होय!
 
या यज्ञातून द्रुपदाला धृष्टद्युम्नाची प्राप्ती झाली. द्रुपदाचा आशय आपण मागे पाहिला आहेच. ‘द्रु-पद’ म्हणजे द्रुत गतीने उच्च पदी विराजमान होतो, असा यशस्वी साधक होय. ‘द्रु+पद’ उपशब्द मिळून ‘द्रुपद’ शब्द झाला. या द्रुपदाचीच पुत्री द्रौपदी, जी धृष्टद्युम्नाची बहीण दाखविली आहे. आता धृष्टद्युम्न कोण? ती व्यासांची कल्पना पाहावी लागेल. ‘धृ’ धातूपासून ‘धृष्ट’ शब्द तयार झाला असून, ‘धृष्ट’ म्हणजे ज्याने इष्ट धारणा केली, अशी साधकावस्था होय. ‘द्युम्न’ शब्दात ‘द्यु’ शब्दच महत्त्वाचा आहे. ‘द्यु’ म्हणजे, सृष्टीच्या उत्क्रांतीची अवस्था होय. मरणानंतर याच ‘द्यु’ लोकाला भीष्म निघून गेले, अशी कथा महाभारतात आहे. हा ‘द्यु’ लोक म्हणजे, धूम्रवर्णाद्वारे अनुभवाला येणारे, प्रकाश वेगापेक्षाही भयानक वेगाने अस्तित्वात असणारे वायुतत्त्व होय.
 
वायुतत्त्व
 
पंचतत्त्वातील वायुतत्त्व दुसरे असून, ते विश्वाच्या कोणत्याही स्थळी तत्क्षण गमन करते. असा उच्च साधकांचा अनुभवही असून, आजचे विज्ञानही तसेच मानते. वायुतत्त्वातील वायू म्हणजे हवा नसून, आकाशतत्त्व ज्या अवस्थेत वायुतत्त्वाची विक्राळ गती प्राप्त करते, त्यास ‘वायुतत्त्व’ म्हणतात. वायू म्हणजे विक्राळ गती, जी प्रकाश गतीपेक्षा कित्येक पट अधिक असते. प्रकाशाची गती एका सेकंदास तीन लाख किमी आहे. सार्‍या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्यास, प्रकाशास ३५० कोटी वर्षे लागतील. प्रकाशाने एका वर्षांत केलेल्या प्रवासास ‘एक प्रकाशवर्ष’ म्हणतात. प्रकाश दर सेकंदास, तीन लाख किमी प्रवास करतो. त्यामुळे एका वर्षात प्रकाश ३,००,०००x६०x६०x२४x३६५ किमी प्रवास करेल. एवढे अंतर कापण्यास प्रकाशास एक वर्ष लागते. हेच एक प्रकाशवर्ष होय.
 
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७




संबंधित मजकूर