मुंबई : (Myanmar Jagannath Rath Yatra) म्यानमारमधील 'माउंगडॉ' या शहरात रथयात्रेला नुकतीच उत्साहात आणि थाटामाटात सुरूवात झाली. रखाईन/अराकान राज्यातील विविध भागांतील हजारो हिंदू कुटुंबे या धार्मिक उत्सवादरम्यान जगन्नाथाची प्रार्थना करण्यासाठी माउंगडॉ भागात एकत्र आली होती. अराकान सैन्य नियंत्रित भागात या ९ दिवसांच्या पवित्र धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांत अराकान सैन्याच्या योद्ध्यांनी सत्ताधारी लष्करी जंटापासून मुक्त केलेल्या रखाईनमधील १४ शहरांपैकी माउंगडॉ हे एक शहर आहे.
"जगन्नाथ रथयात्रा हा जगभरात साजरा केला जाणारा अत्यंत लोकप्रिय धार्मिक उत्सव आहे, ज्याचा सर्वात भव्य सोहळा भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशातील पुरी या मंदिराजवळ होतो. मुख्य मंदिरातील प्रमुख देवतांमध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा समावेश आहे. सजवलेले रथ हजारो भक्तांकडून ईश्वराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ओढले जातात, तेव्हा लाखो लोक या क्षणाचे साक्षीदार बनतात," असे नारिंजराच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.(Myanmar Jagannath Rath Yatra)
पुरीची जगप्रसिद्ध रथयात्रा हा आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरा केला जाणारा सर्वात जुना आणि सर्वात मोठा हिंदू रथोत्सव मानला जातो. हा सण जगन्नाथ महाप्रभू यांच्यासह त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि लहान बहीण सुभद्रा यांच्याशी संबंधित आहे. जिथे तीन मोठे आणि रंगीबेरंगी लाकडी रथ त्यांच्या मूर्तींना जगन्नाथ मंदिरापासून गुंडीचा मंदिरापर्यंत घेऊन जातात, जिथे त्या मावशीच्या घरी एक आठवडा राहतात आणि नंतर पुन्हा आपल्या निवासस्थानी परततात.(Myanmar Jagannath Rath Yatra)
"म्यानमारमधील हिंदू समुदाय, विशेषतः रखाईनच्या माउंगडॉ टाउनशिपमधील, ही परंपरा पुढे चालू ठेवत आहे. यंदा या समुदायाचा २४ वा रथयात्रा उत्सव आहे. अराकान पीपल्स रिव्होल्यूशनरी गव्हर्नमेंटच्या अंतर्गत, रखाईन राज्यात राहणाऱ्या अल्पसंख्याक वांशिक गटांच्या धार्मिक सणांना प्रोत्साहन दिले जात आहे. अशा पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याने त्यांच्या वारशाचे जतन होण्यास मदत होते, तसेच विविध समुदायांमध्ये परस्पर आदर आणि समजूतदारपणा वाढतो, असे स्थानिक लोक सांगतात," असे या अहवालात म्हटले आहे. तसेच पूर्वीच्या बर्मा (म्यानमार) प्रशासनाने या उत्सवांवर बंदी घातली होती, परंतु आता युनायटेड लीग ऑफ अराकान प्रशासनाने रथयात्रा मिरवणूक, धार्मिक प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभागींना विनामूल्य अन्नदानाची सोय असलेल्या या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे.(Myanmar Jagannath Rath Yatra)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक