भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या विद्युतीकरणाला वेग

 
Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification
 
मुंबई, (Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील नागरी बांधकाम आणि ट्रॅकची कामे वेगाने सुरू असतानाच देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वेसाठी अत्याधुनिक विद्युतीकरणाचे कामही निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. ५०८ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर प्रथमच प्रगत 2×25 केव्ही ओव्हरहेड ट्रॅक्शन प्रणाली बसविण्यात येत असून, ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी अखंड आणि स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करणारी ही अत्याधुनिक प्रणाली भारतात प्रथमच वापरली जात आहे.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
राष्ट्रीय वीज ग्रीडमधून वीज विशेष ग्रीड सबस्टेशनमार्फत मार्गिकेवरील १४ ट्रॅक्शन सबस्टेशनपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यापैकी पाच सबस्टेशन महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि ठाणे डेपो येथे तर नऊ गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, महेमदाबाद, अहमदाबाद आणि साबरमती डेपो याठिकाणी उभारण्यात येत आहेत. या प्रणालीमुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात प्रवेश करताना वीजपुरवठ्यातील बदल प्रवाशांना जाणवणारही नाही.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
याशिवाय, मार्गिकेवर ३१ स्विचिंग पोस्ट्स उभारण्यात येणार असून, त्याद्वारे वीजपुरवठा अखंड राखणे तसेच बिघाड झाल्यास संबंधित विभाग त्वरित वेगळा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बुलेट ट्रेनव्यतिरिक्त स्थानके, सिग्नलिंग प्रणाली, देखभाल केंद्रे आणि अन्य सुविधांसाठी १६ वितरण सबस्टेशन उभारले जात आहेत.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
२२ हजार पोलादी खांबाचा आधार
 
बुलेट ट्रेनसाठी उभारल्या जाणाऱ्या ओव्हरहेड विद्युत जाळ्यासाठी सुमारे २२ हजार पोलादी खांब आणि २५ हजार ७०० हून अधिक कॅन्टिलिव्हर असेंब्लीज बसविल्या जाणार आहेत. सुमारे १,१२५ ट्रॅक किलोमीटर (डेपो सहित) क्षेत्रात पसरलेल्या या जाळ्यात १०.५ ते १४.५ मीटर उंचीची खांब वापरण्यात येणार असून भारतात प्रथमच कंपाउंड कॅटेनरी प्रणालीचा वापर केला जात आहे. ही प्रणाली अशा प्रकारे विकसित करण्यात आली आहे की, ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनचा पॅन्टोग्राफ कोणत्याही ठिणग्या किंवा वीजपुरवठ्यातील अडथळ्यांशिवाय सातत्याने वीज घेऊ शकेल.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
'मेक इन इंडिया'ला बळ
 
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्युत पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर स्वदेशीकरण करण्यात आले आहे. ट्रान्सफॉर्मर, ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन मस्तूलांवरील क्रॉस आर्म्स, ग्राउंड वायर, प्रोटेक्शन वायर, फीडर वायर तसेच ट्रॅक्शन पॉवर प्रणालीतील अनेक महत्त्वाचे घटक आता भारतातच तयार होत आहेत. यामुळे भारतीय उद्योगांना अत्याधुनिक उच्च-गती रेल्वे तंत्रज्ञान मिळत असून, विशेष कौशल्याधारित रोजगारनिर्मिती, आयातीवरील अवलंबित्वात घट आणि भविष्यातील उच्च-गती रेल्वे प्रकल्पांसाठी देशांतर्गत उत्पादनक्षम परिसंस्था विकसित होण्यास मदत होणार आहे.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
भूकंपाची पूर्वसूचना देणारी स्मार्ट प्रणाली
 
प्रकल्पात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, प्रत्येक ट्रॅक्शन सबस्टेशनवर सिस्मोमीटर आधारित भूकंप पूर्वसूचना प्रणाली बसविण्यात येत आहे. भूकंपीय हालचालींचा वेध घेऊन काही सेकंदांत संरक्षणात्मक उपाययोजना सुरू करण्याची क्षमता या प्रणालीत असेल. त्यामुळे आवश्यकतेनुसार बुलेट ट्रेन तातडीने थांबविता येईल. एकूण २८ सिस्मोमीटर बसविण्यात येणार असून, त्यापैकी १२ महाराष्ट्रात आणि १६ गुजरातमध्ये स्थापित केले जाणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, खेडा, रत्नागिरी, लातूर आणि पांगरी परिसरात ही उपकरणे बसविली जातील.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
केंद्रीकृत नियंत्रणातून रिअल-टाइम देखरेख
 
संपूर्ण विद्युत जाळ्यावर केंद्रीकृत नियंत्रण केंद्रातून रिअल-टाइम देखरेख ठेवली जाणार आहे. स्वयंचलित संरक्षण प्रणाली सेकंदाच्या अंशात प्रतिसाद देऊन वीजपुरवठा आणि ट्रेन संचालन सुरक्षित व विश्वासार्ह ठेवणार आहेत.(Mumbai Ahmedabad Bullet Train Electrification)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर