असुरीशक्ती विरुद्ध सज्जनशक्ती!

    23-Jul-2026

 
Jantar Mantar protest
 
अराजकतावाद्यांना सज्जनशक्तीने एकवटून उत्तर दिले पाहिजे. ते विध्वंसक मोर्चे काढू शकतात, तर आपण संरक्षक मोर्चे काढू शकतो. या असुरीशक्ती अराजक निर्माण करण्याच्या दिशेने सर्व दुष्टशक्तींचे साहाय्य घेऊन उभ्या राहात आहेत. त्यांना सज्जनशक्तीने दैवीशक्तीच्या आधारे रोखले पाहिजे, त्यांचा प्रतिकार केला पाहिजे.
 
दिल्लीत तीन ठिकाणी आंदोलने झाली- एक जंतरमंतर, दुसरे पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर आणि तिसरे लोकसभा. दाखविण्याचा सर्व ठिकाणी एकच विषय तो म्हणजे, अयोध्या मंदिरातील दानचोरी आणि ‘नीट’ पेपरफुटी प्रकरण व शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. तिन्ही व्यासपीठांवर विषय एकच होता. तीन ठिकाणचे हिरो वेगवेगळे आहेत. जंतरमंतरचे हिरो सोनम वांगचूक, पंतप्रधान निवास स्थानाबाहेरचे हिरो राहुल गांधी आणि संसदेत अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी!
 
आपल्याकडे एक म्हण आहे, ‘दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे.’ दाखवायचे दात आपण पाहिले, खाण्याचे दात विद्यार्थ्यांना हिंसक करून ज्याप्रमाणे बांगलादेशात राजकीय परिवर्तन घडवून आणले गेले, नेपाळमध्ये त्याचाच कित्ता गिरविला गेला, तो प्रयोग दिल्लीतही करावा. परंतु, दिल्ली म्हणजे ढाका नव्हे आणि दिल्ली म्हणजे काठमांडूदेखील नव्हे. दिल्लीपासून दोन्ही शहरांचे अंतर हजारो किलोमीटरचे आहे, ते भौगोलिक अंतर आहे. सांस्कृतिक अंतर पाच-दहा हजार वर्षांचे आहे.
 
या आंदोलनाच्या रंजित, अतिरंजित, प्रक्षोभक बातम्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर सतत येत राहिल्या. देशात एक पत्रकारांची जमात आहे, जिचे काम नकारात्मक पत्रकारिता करीत राहणे हे जसे आहे, तसे मोदी प्रशासनाविरोधात जेवढे विष ओकता येईल, तेवढे ओकत राहणे आहे. अशा प्रचाराचा काही ना काही परिणाम होतो. भाजपचे समर्थक, मोदी यांना मनापासून पसंत करणारे अशा बातम्यांनी अस्वस्थ होतात. त्यांच्या मनात शंका निर्माण होते की, केंद्रातील मोदी शासन संकटात येणार का? बांगलादेश, नेपाळची पुनरावृत्ती करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यांना यश येईल का? आल्यास देशाचे काय होईल? अराजक निर्माण झाल्यास काय होईल? अशा असंख्य शंका सर्वांच्या मनात असतात.
 
शंकांचे असे असते की, जेव्हा अतिप्रेम निर्माण होते, तेव्हा त्या प्रेमापोटी मन शंकाकुल होते. प्रत्येक मातेला आपल्या अपत्याची अनेकवेळा नको ती चिंता वाटू लागते. चिंता करण्याचे तसे काही चिंताजनक कारण नसते. परंतु, आईचा स्वभाव चिंता करण्याचाच असतो. साध्या सर्दी-पडश्याने मूल आजारी पडले, तर अनेक शंकांचे ढग तिच्या मनात गोळा व्हायला लागतात. मोदी शासनाचे स्थैर्य, त्यांची देशातील प्रतिमा याच्याविषयी प्रचंड प्रेम असणार्‍यांच्या मनात जंतरमंतरच्या आंदोलनाने शंका उत्पन्न होणे स्वाभाविकच. प्रेमातून निर्माण झालेल्या या शंका आहेत. हे प्रेमच मोदी शासनाची शक्ती आहे.
 
प्रेम बाजूला ठेवून थोडा वस्तुनिष्ठ विचार आपल्याला केला पाहिजे. आंदोलनाचे काय होईल, मोदी प्रशासनाचे काय होईल वगैरे चिंता क्षणभर बाजूला ठेवून, एका विषयाचा विचार करूया. तो म्हणजे जंतरमंतर, पंतप्रधान निवासस्थान आणि लोकसभेतील गोंधळी कोण आहेत? जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके आहेत. सोनम वांगचूक आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत उद्धव ठाकरे पोहोचले, मनोज जरांगे पाटील पोहोचले; शेतकरी संघटना, विविध विद्यार्थी संघटना अशी सर्व मंडळी जंतरमंतरवर मोदी शासनाला छुमंतर करण्यासाठी गोळा झाली.
 
या सर्वांची राजकीय विश्वासार्हता काय? लडाखमधील आंदोलनातील एक आरोपी म्हणून सोनम वांगचूक तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. विदेशातील त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहू शकता. अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात आलेले आहेत. राहुल गांधी जेवढा काळ देशात राहतात, तेवढा काळ ते विदेशात जातात. जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍यांना मनसोक्त खाऊ घातले गेले. बर्गर, बिर्याणी यांचा मुबलक पुरवठा झाला. या सगळ्यासाठी पैसा कुठून आला? या प्रश्नाचा शोध ज्याचा त्याने घेतला पाहिजे.
 
विदेशातून आलेला दीपके, विदेशाशी संबंध असलेला वांगचूक आणि विदेशवार्‍या करणारे राहुल कोणती राजकीय विषयसूची भारतात आणू इच्छितात किंवा भारतावर लादू इच्छितात? ही विषयसूची एका वाक्यात सांगायची, तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले शासन आंदोलन करून उलथून पाडून, अराजकसदृश्य परिस्थिती देशात निर्माण करून विदेशी शक्तींना पाहिजे त्याप्रमाणे देशाची धोरणे आखणारे सरकार आणणे! हा आंदोलनात व्यक्त न झालेला अजेंडा आहे. विद्यार्थ्यांचे हित, दानचोरी हे सर्व मुखवटे आहेत.
 
‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटला, तो सरकारने फोडला नाही. केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी फोडला नाही. पेपर तयार करणार्‍यांनीच तो फोडला. ते सर्व आज तुरुंगात आहेत. न्याय हवा असेल, तर तुरुंगात असणार्‍यांच्या विरुद्ध जोरदार आंदोलन करून त्यांना दीर्घ मुदतीच्या कारावासाच्या शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे. ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असे आंदोलन करून काहीच उपयोग नाही. ‘नीट’ परीक्षा पुन्हा झाली, ती सुरळीत पार पडली आहे. भविष्यात शासन अत्यंत सावध राहून पेपर फुटणार नाही, याची नक्कीच काळजी घेईल, याबद्दल शंका बाळगण्याचेही कारण नाही.
 
कोणीही उठावे, आंदोलन करावे आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, हे प्रकार बंद झाले पाहिजेत. ते अत्यंत धोकादायक आहेत. अशाने शासन चालणे अशक्य होईल आणि शासन चालले नाही, तर अराजक निर्माण झाल्याशिवाय काही होणार नाही. ‘असंविधानिक मार्गाने आंदोलन हे अराजकाचे व्याकरण आहे,’ असे बाबासाहेब सांगून गेले. या व्याकरणाचे धडे जंतरमंतरवर गिरवले गेले.
 
अयोध्येतील रामाचा पुळका या आंदोलनकारांना येणे, हे हास्यास्पद. कारण, रामाचा जन्मदाखला यांनीच मागितला होता. जन्मस्थानावर राम मंदिर कधी नव्हतेच, असे हेच म्हणत होते. हेच सांगत होते की, राम मंदिराच्या ऐवजी हॉस्पिटल किंवा शाळा बांधली पाहिजे. हेच बोंबलत होते की, रामाचे नाव देशात सांप्रदायिकता वाढवित चालले आहे. ते आज रामभक्त झाले आहेत, काय चमत्कार आहे!
 
राहुल गांधी यांना कधी एकदा पंतप्रधान होतो, अशी घाई झालेली आहे. ज्यांचे काही ना काही कारणामुळे लग्न जुळत नाही, असे स्त्री-पुरुष असतात. एका विशिष्ट वयानंतर लग्नासाठी ते इतके उतावीळ होतात की, कधी एकदा माझे लग्न होईल, या एकाच विचाराने ते पछाडलेले राहतात आणि मग कोणतीही मुलगी चालेल, कोणताही मुलगा चालेल, या स्थितीला ते जातात. राहुल गांधींचे तसेच झाले आहे. कधी केजरीवाल चालेल, कधी वांगचूक चालेल, उद्धव तर आहेतच, ममतादेखील चालली असती; पण मला पंतप्रधानपदी बसू द्या! मी पंतप्रधान झालो नाही, तर माझ्या पणजोबांचा आत्मा स्वर्गात तळमळत राहील.
 
आपल्या देशात समाज ढवळून काढणारी आंदोलने झाली नाहीत, असे नाही. अतिशय शांतपणे झालेले आचार्य विनोबांचे ‘भूदान आंदोलन’ हे क्रांतिकारक आंदोलन होते. १९७४ साली जयप्रकाश नारायण यांनी समग्र क्रांतीचे आंदोलन सुरू केले. हे आंदोलनदेखील समाजाचा कानाकोपरा ढवळून काढणारे झाले. २०११ साली अण्णा हजारेंनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले, सारा देश ढवळून निघाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आंध्र प्रदेशच्या निर्मितीचे आंदोलन, गुजरातचे भाषिक आंदोलन ही सर्व आंदोलने ते-ते प्रदेश ढवळून काढणारी आंदोलने ठरली.
 
मात्र, जंतरमंतर, लोकसभा येथे चाललेले आंदोलन गाडल्या गेलेल्या भूतांमध्ये प्राण भरून त्यांना उभे करण्याचे आंदोलन आहे. लोकशाहीनिष्ठ जनतेचा या आंदोलनाला शून्य पाठिंबा आहे. वर जी नावे दिलेली आहेत, ती समाजाने ओवाळून टाकलेली नावे आहेत. त्यांच्या मागे खर्‍या अर्थाने ‘जन’ नाही, ‘समर्थन’ही नाही. हे स्वनाम-धन्यतेने फुगलेले फुगे आहेत. एखादी टाचणी लागली असता ते कधी फुटतील, सांगता येणार नाही.
 
तरीही, या आंदोलनाचा हलक्यात विचार करता कामा नये. ब्रह्मदेशाची एक लोककथा अशी आहे की, मधाच्या थेंबामुळे राज्य गमावले. राजवाड्यातून मधाचा थेंब खाली पडतो आणि तो भांडणांची मालिका कशी सुरू करतो, अशी ही कथा. एक छोटी ठिणगी भयंकारी अग्नी बनू शकते. ती न बनू देण्याचे सामर्थ्य देशाच्या सज्जनशक्तीत आहे. या सज्जनशक्तीने सदैव जागृत राहायला पाहिजे. येणारा काळ हा सदैव जागृत राहण्याचाच काळ आहे. कारण, सर्व असुरीशक्ती आपल्या मायावी सामर्थ्याने हल्ला करण्यास एकवटत जाणार, त्यांना कायमचे गाडून टाकण्याचे सामर्थ्य सज्जनशक्तीत असते. तसा आपल्या देशाचा इतिहास आहे. सगळ्या असुरीशक्ती कुरुक्षेत्रात कौरवसेनेच्या रूपाने एकत्र झाल्या होत्या. एकटा श्रीकृष्ण त्यांना पुरून उरला. कारण, ते सात्त्विक शक्तीचे रूप होते.
 
या सर्व अराजकतावाद्यांना या सज्जनशक्तीने एकवटून उत्तर दिले पाहिजे. ते विध्वंसक मोर्चे काढू शकतात, तर आपण संरक्षक मोर्चे काढू शकतो. या असुरीशक्ती अराजक निर्माण करण्याच्या दिशेने सर्व दुष्टशक्तींचे साहाय्य घेऊन उभ्या राहात आहेत. त्यांना सज्जनशक्तीने दैवीशक्तीच्या आधारे रोखले पाहिजे, त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. सामर्थ्ये अनेक प्रकारची असतात; परंतु आपली मान्यता अशी आहे की, सर्व सामर्थ्यात चारित्र्यबलाचे सामर्थ्य हे अजेयी असते, ती शक्ती देशात आहे, दिल्लीतही आहे. तिने हे आव्हान स्वीकारले पाहिजे, असे वाटते.
 
रमेश पतंगे
९८६९२०६१०१




संबंधित मजकूर