अवघा रंग एक झाला!

    23-Jul-2026
 
 
Warkari Sampradaya
 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात वारकरी संप्रदायाचे स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. विठ्ठलभक्तीच्या पायावर उभ्या राहिलेल्या या परंपरेने अध्यात्मा-बरोबरच समाजाला समतेची, बंधुभावाची आणि मानवतेची शिकवण दिली. संतांच्या अभंगातून आणि वारकर्‍यांच्या आचरणातून व्यक्त होणारे हे तत्त्वज्ञान लोकजीवनाशी इतके एकरूप झाले आहे की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामूहिक चेतनेचा अविभाज्य भाग झाला. अशा वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा, परंपरांचा मागोवा घेणारा लेख...
 
हिंदू धर्म - संस्कृतीचे प्रधान अधिष्ठान म्हणजे भारतीय संप्रदाय! हिंदू धर्म म्हणजे सूत्र (दोरा) असून, सर्व संप्रदाय त्यात ओवलेले मणी आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या काळापासूनच अनेक संप्रदायांनी भारताची माती, प्रकृती, संस्कृती आणि सरस्वती समृद्ध केली आहे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून भारतावर अनंत आक्रमणे झाली. हिंदू धर्म व संस्कृतीचा समूळ उच्छेद करण्याचे अखंड प्रयत्नही केले गेले. तरीही भारतातील हिंदू धर्माची परंपरा अक्षुण्ण राहिली. याचे फार मोठे श्रेय संप्रदाय आणि संप्रदायातील आचार्य-संतांकडे जाते. भारतीय संप्रदायांनी ज्ञान-भक्तीचा कल्लोळ करून, सांस्कृतिक संघटन बळकट केले. भाषाशुद्धीचा अपूर्व प्रयोग भजन-अभंग-पदातून केला. भारतीय विविधतेतील एकात्मता, सामान्यांच्या प्रत्ययाला आणून दिली. आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या हिंदूंच्या भावजीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. मानवी जीवनाला भक्तीचे अधिष्ठान दिले. नीतीचा, सदाचाराचा, शुद्धाचाराचा मार्ग जनांपुढे विस्तारित केला. सगुण-निर्गुण, हरि-हर यांचा संगम केला. एकान्त-लोकान्ताचा समन्वय घडविला. परमार्थ-परमोपकाराचा मंत्र जपला. प्रभु रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण या सगुण अवतारांना शिरोधार्य केले. मतामतांच्या गोंधळातून सार वेचून काढले. श्रद्धा, विश्वास, आचार, तत्त्वज्ञान, उपासना, स्थाने, विभूती, वाङ्मय, आचार्य, संत इत्यादींचे संक्रमण पिढ्यान्पिढ्या केले. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान फार मोठे आहे.

वारकरी संप्रदाय - महाराष्ट्रातील सर्व संप्रदायांमध्ये संख्येने निःसंशय मोठा, प्रधान आणि लोकप्रिय असा वारकरी संप्रदाय, हा महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशातही प्रचलित असलेल्या या संप्रदायाला ‘भागवत धर्म’ वा ‘माळकरी पंथ’ म्हणतात. या भक्तिपंथाचे मूळ स्वरूप हिंदू किंवा वैदिक धर्माचेच तत्त्वज्ञान प्रतिपादन करणारे आहे.
 
थोर संतांची परंपरा - वारकरी संप्रदायाचे भाग्य असे की, ज्ञानदेवांसारख्या विभूतिमत्त्वाने याच भागवत धर्माला शिरोधार्य केले. नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची ध्वजा गंगा सिंधूच्या खोर्‍यात नाचविली. एकनाथांसारखे क्रांतदर्श महात्मे या संप्रदायाला लाभले. समाजातील जातिभेद नाहीसे करण्यासाठी नाथांनी केलेल्या क्रांतीला तोड नाही. आपल्या अभ्यासाने, चिकाटीने आणि श्रद्धेने नराचा नारायण होता येते, हे तुकारामांनी सिद्ध केले. समर्थ रामदासही विठ्ठलाचे परमभक्तच. देह थकेतोपर्यंत ते पंढरीची वारी करत होते. परंतु, रामदासी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी धर्मकारण आणि राष्ट्रकारणाचा अभूतपूर्व समन्वय घडवला. वारकरी संप्रदायाला फार फार उत्तुंग कर्तृत्वाचे संत लाभले.
 
सुलभ मार्ग - या संप्रदायाने गृहस्थाश्रमींना आत्मोद्धाराचा सुलभ मार्ग दाखवला. देहदंड अथवा कोणतीही कठोर उपासना न करता, परमेश्वराला आत्मसात करण्याचा मध्यम मार्गच या संप्रदायाने स्वीकारला. ज्ञानदेव महाराज आणि त्यांची भावंडे नाथपंथी होती. एकनाथ महाराज नाथ आणि दत्त सांप्रदायिक होते. शिवाय, त्यांच्या घराण्यात सूर्य उपासनाही होतीच. समर्थ रामदासांच्याही घराण्यात सूर्योपासना असल्याचे इतिहास सांगतो. असे असूनही, या सर्वांनाच वारकरी संप्रदायाला आलिंगन द्यावेसे वाटले. यातच त्या पंथाची थोरवी निःसंशय प्रस्थापित होते. वारकरी संप्रदायाची प्रकृती समन्वयात्मक असल्यानेच, हा संप्रदाय रुजला, वाढला आणि लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचला. हा संप्रदाय महाराष्ट्रातील असला, तरी त्याचे स्वरूप विश्वात्मक भावाचे आहे. कारण वारकरी संप्रदायाची बैठकच अद्वैत तत्त्वज्ञानाची आहे.

कालखंड - इतिहासात नेमक्या कोणत्या कालखंडात वारकरी संप्रदाय निर्माण झाला, हे सांगणे कठीण. ‘पद्मपुराण’, ‘स्कंदपुराण’, ‘श्रीकर भाष्य’, आदि शंकराचार्यांची स्तोत्रे आदि ग्रंथांमधून, पंढरीच्या पांडुरंगाचा उल्लेख आढळतो. पुंडलीक कुक्कुटस्वामीच्या दर्शनाने पावन झाला आणि मातापित्यांच्या सेवेत रममाण झाला. पुढे भगवान श्रीकृष्णावर रुसून रुक्मिणी लोहदंडक्षेत्री म्हणजेच उत्तरकालीन पंढरपुरात दिंडीरवनात आली. अर्थातच, भगवंतही तिच्या मागोमाग आले आणि पुंडलिकाला वर देऊन तिथेच स्थिरावले. शंकराचार्यांनी ‘पांडुरङ्गाष्टकम्’ हे प्रसिद्ध स्तोत्र लिहिले आहे. भारतीय परंपरेनुसार शंकराचार्यांचा कालखंड इ.स. पूर्व मानला जातो. पांडुरंगाची प्रसिद्धी त्या काळीही होती. एखादा संप्रदाय काही वर्षांत नावारूपाला येत नाही. त्यासाठी काही दशके, काही शतके जावी लागतात. अर्थ असा की, सहाव्या शतकात लोकप्रिय असलेला वारकरी संप्रदाय आणि पंढरीचा विठ्ठलाची परंपरा, तिसर्‍या-चौथ्या शतकापासूनच असलीच पाहिजे.
 
वारकरी संप्रदायाला ‘भागवत संप्रदाय’ म्हणतात, कारण हा वैष्णव संप्रदाय आहे. या पंथाचे उपास्य दैवत पांडुरंग हा श्रीकृष्णाचे बालरूप आहे. पंढरपुरास ‘दक्षिणद्वारका’ असे जे म्हणतात, तेही याचेच सुस्पष्ट निदर्शक.
 
संप्रदायाची लक्षणे - वारी करणारा भक्त तुळशीची माळ आपल्या गळ्यात आजन्म घालतो. त्यामुळे हा संप्रदाय ‘माळकरी पंथ’ असाही ओळखला जातो. पंढरीची नित्य वारी, गळ्यात धारण केलेली तुळशीची माळ, संप्रदायाला प्रमाण असलेल्या ग्रंथांचे नित्य वाचन आणि पठण, नामस्मरण आणि नामसंकीर्तन, पंढरीश हेच हृदयात स्थित झालेले दैवत आणि सहिष्णुतायुक्त सदाचार ही वारकरी संप्रदायाचीही व्यवच्छेदक लक्षणे. वारकरी संप्रदायात एकूण चार उपसंप्रदाय आहेत. हे चार उपसंप्रदाय आनंद, चैतन्य, प्रकाश, स्वरूप या नावाने ज्ञात आहेत. पंढरीची वारी करणारा तो वारकरी. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी अशा पंढरपूरच्या चार प्रमुख वार्‍या होत. त्यांपैकी ‘आषाढी वारी’ विशेष प्रिय आहे. वारकरी हा शब्द म्हणजे ‘वारी करी’ याचा अपभ्रंश असल्याचे असे दिसते. ज्ञानदेवांनी स्वतःला आणि अन्य भक्तांनाही ‘वारीकर’ म्हटले आहे. ‘कायावाचामनें जिवें सर्वस्वें उदार| बापरखुमादेविवरा विठ्ठलाचा वारिकर॥’
 
पंढरी व आळंदीची वारी - पंढरीची वारी ही देवाची वारी, तर आळंदीची वारी ही संतांची वारी होय. पंढरीची वारी म्हणजे शारीरिक, मानसिक, वाचिक असे त्रिविध तपच आहे. वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र ‘रामकृष्णहरि’. राम आणि कृष्ण या अवतारांमध्येच भारतीय संस्कृतीचे अवघे सार आहे. ‘हरि’ हा शब्दही मोठा आशयगर्भ असा आहे. भक्तांच्या चित्ताचे हरण करणारा, भक्तांची दुःखे हरून नाहीशी करणारा तो हरि.
 
एकादशी - भागवत धर्मामध्ये एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्व आहे. त्या व्रताची महती समर्थांनी पुनःपुन्हा गायली आहे,
 
तुळशीची माळ - वारकर्‍यांची मुख्य खूण म्हणजे गळ्यातील तुळशी माळ. विठ्ठलालाही तुळशी माळ अत्यंत प्रिय असल्याने, एकविध भावाचे प्रतीक म्हणून वारकरी ही माळ धारण करतो.
 
चंद्रभागा माहात्म्य - पंढरपूर क्षेत्रातील चंद्रभागेला सर्वच वारकरी गंगा मानतात. नामदेव महाराज म्हणतात, ‘चंद्रभागेसी करितां स्नान| तुझे दोष पळती रानोरान॥’
 
अबीर बुक्का - देवपूजेत देवाला वाहावयाची सुगंधी भुकटी म्हणजे अबीर वा बुक्का. माळ आणि मुद्रा ही वारकर्‍यांची भूषणे.
सदाचार - माळ घालताना, वारकरी खालील नियम पाळण्याची शपथ घेतो.
 
१) खरे बोलणे.
 
२) परस्त्रीला रुक्मिणी मातोश्रीप्रमाणे मानणे.
 
३) काही अपराध घडल्यास, भगवंताची क्षमा करण्याबद्दल कळकळीने प्रार्थना करणे.
 
४) शाकाहार सेवन करणे.
 
५) वर्षातून निदान एक पंढरीची वारी व आळंदीची वारी करणे, एकादशी व्रत करणे.
 
६) नित्य नियम म्हणून ‘रामकृष्णहरि’ मंत्राचा १०८ वेळा माळेचे मणी ओढून जप करणे.
 
७) ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचे नियमित वाचन व हरिपाठाचे अभंग म्हणणे.
 
८) प्रपंचातील नित्य कामे श्रीविठ्ठलस्मरणात प्रामाणिकपणे पार पाडणे.
 
नामस्मरण - वारकरी संप्रदायात नामस्मरण हे परमात्मप्रेमाच्या उदयांचे व विकासाचे एकमेव साधन आहे.
 
सत्संगती - वारकरी संप्रदायात संतांच्या संगतीला फारच महत्त्व आहे.
 
भजन - वारकरी संप्रदायात सकाळी, दुपारी व संध्याकाळ, असे तीनवेळा भजन करण्याची रीत आहे.
 
दिंडीनृत्य - महाराष्ट्रातील वारकरी आषाढी व कार्तिकी एकादशीला, संतांच्या किंवा देवाच्या पालखीपुढे भजन करीत व नाचतात; त्यास ‘दिंडी’ म्हणतात.
 
पालखी - वारकरी संप्रदायातील लोक आषाढी व कार्तिकी एकादशीस पंढरपूरला जातात. त्यावेळी ते आपल्याबरोबर संतांच्या पादुकांच्या पालख्या वाहतात. त्यांच्याबरोबर भजन-कीर्तन करीत हजारो वारकरी पंढरपूरला जातात.
 
रिंगणे - माऊलींच्या पालखीची एकूण सहा रिंगणे आषाढी वारीत होतात. रिंगणाची रचना अत्यंत शिस्तबद्ध असते. मध्यभागी छोट्या वर्तुळात पालखी रथ उभा असतो. त्याभोवती वर्तुळात पताकांच्या रांगा वैभवाने उभ्या असतात. त्याभोवतीच्या गोलात दोन्ही अश्वांचा प्रदक्षिणा मार्ग असतो. त्याही बाहेरच्या गोलात असंख्य भक्त असतात. बाहेरच्या शेवटच्या वर्तुळात दिंड्यांची रांग असते. या पाच वर्तुळांचे मिळून रिंगण होते.
 
चोपदार सर्व दिंड्यांना गोलाकार करतात. त्यांचे भजन, तसेच फुगड्या, हमामा, झिम्मा इत्यादी खेळ चालू असतात. पताका धारण करणारे वारकरी पालखीला, पादुकांना वंदन करून वर्तुळात शस्तीने उभे राहतात. दोन्ही अश्व रिंगणात येतात, त्यावेळी आनंदाचा कल्लोळ होतो. प्रथम पालखीचे दर्शन झाल्यावर अश्व गोलाकार धावतात. त्यात मोकळ्या अश्वावर साक्षात ज्ञानेश्वर माऊली वा पांडुरंग आरूढ आहे, अशी श्रद्धा आहे. दुसर्‍या अश्वावर चोपदार असतो. चोपदाराच्या अश्वाला देवाच्या अश्वाने मागे टाकून प्रदक्षिणा पूर्ण केली की, रिंगण पूर्ण होते. त्यानंतर असंख्य मृदंगांचा घोष आकाशाला व्यापून टाकतो.
 
प्रमुख फड - वारकर्‍यांचा आचार पाळणारे आणि पंढरीशाला भजणारे वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत ते पसरले आहेत. या वारकरी प्रमुख आणि त्यांच्या शिष्य मंडळींचा एकत्रित, संघटित, शिस्तबद्ध आणि सदाचारी समुदाय म्हणजे ‘फड’.
 
आळंदीहून निघणारी ज्ञानोबांची दिंडी सर्वांत प्रभावी आहे. आळंदीहून येणारी ही दिंडी हैबतबाबांची असून, वारीची सात्त्विक परंपरा दृढमूल करण्याचे श्रेय आधुनिक काळात हैबतबाबांचेच. संत नामदेवांचा फड, वासकर फड, देहूकरांचा फड, आजरेकरांचा फड, बेलापूरकरांचा फड, ठाकूरबोवांचा फड हे प्रमुख फड आहेत.
 
अशा प्रकारे अनेक फड-दिंड्यांच्या माध्यमातून, पिढ्यान्पिढ्या वारी करत लक्षावधी वारकरी पंढरपुरास जात आहेत. पायात काही न घालता, पांडुरंगाचे नाव घेत, उन्हा-पावसाची पर्वा न करता, वारीतून चालणार्‍या लक्षावधी वारकर्‍यांना पाहिले, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचेच दर्शन होते!

- गुरुदेव शंकर अभ्यंकर
(लेखक नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, लेखक आणि आध्यात्मिक विचारवंत आहेत.)




संबंधित मजकूर