डेंग्यू, मलेरिया, फ्लू हे पूर्वी पावसाळ्यात डोके वर काढणारे आजार हल्ली वर्षभरात कधीही उद्भवतात. यांपैकी डेंग्यूच्या आजारावरील ‘क्यूडेंगा’ या लसीला नुकतीच भारतात मंजुरी मिळाली. त्यानिमित्ताने डेंग्यूच्या प्रादुर्भावाचा धोका आणि लसीकरण कार्यक्रम राबविताना विकेंद्रित दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
एक मच्छर आदमी को...’ हा ‘यशवंत’ (१९९६) चित्रपटातील नाना पाटेकरचा सुप्रसिद्ध संवाद. आता त्या संवादातील ‘फिल्मीपणा’ जरी बाजूला ठेवला, तरी डासांमुळे उद्भवणार्या आरोग्याच्या समस्या या भारतासाठी सर्वस्वी गंभीर अशाच. कारण, भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशातील देश असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भावही तुलनेने अधिक. म्हणूनच, जगातील एक तृतीयांश डेंग्यूचे रुग्ण हे एकट्या भारतात आढळतात. त्यामुळेच डेंग्यूवरील नवीन ‘क्यूडेंगा’ ही लस लाखो भारतीयांना जीवनदान देणारी ठरू शकते.
सर्वप्रथम डेंग्यूच्या प्रादुर्भावाची कारणे थोडक्यात समजून घेऊया. डेंग्यूचा प्रादुर्भाव हा ‘एडीस इजिप्ती’ नामक मादी डासाच्या दंशामुळे होतो. हे डास प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. घरामधील कुलर, कुंड्या, फ्रीजच्या खालील ट्रे किंवा घराबाहेर कचर्यात पडलेले डबे, नारळाच्या करवंट्या यांमध्ये साचलेले पाणी ही या डासांच्या उत्त्पत्तीसाठी अत्यंत पोषक ठिकाणे. डेंग्यूच्या तापाची लक्षणे हा डास चावल्यानंतर लगेचच नाही, तर साधारणपणे चार ते दहा दिवसांनी दिसू लागतात. यामध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, सांधे आणि स्नायुदुखी आणि अंगावर पुरळ उठणे ही मुख्य लक्षणे आढळतात. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरात किंवा घराबाहेर पाणी साचू न देणे, स्वच्छता राखणे, पालिकेकडून वेळोवेळी होणारी धूरफवारणी हे काही खबरदारीचे उपाय. पण, आपल्याकडील स्वच्छतेबाबतची एकूणच अनास्था लक्षात घेता, भारतात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक आहे. १९९६ साली डेंग्यूच्या साथीत तब्बल ५४५ रुग्णांना प्राण गमवावे लागले होते, तर अलीकडच्या आकडेवारीवर नजर टाकली असता; २०२४ साली एकूण २ लाख, ३३ हजार डेंग्यूच्या रुग्णांपैकी ३०० जण मृत्युमुखी पडले, २०२५ साली हीच रुग्णसंख्या घटून १ लाख, २२ हजारांवर आली असली; तरी १३० रुग्णांना प्राण गमवावे लागले. २०२६च्या प्रारंभी फेब्रुवारीपर्यंत डेंग्यूची रुग्णसंख्या सात हजारांपर्यंत पोहोचल्याचे अधिकृत आकडेवारी सांगते. त्यामुळे ‘क्यूडेंगा’च्या नवीन लसीमुळे निश्चितच डेंग्यूमुळे होणारे मृत्यू रोखण्यात यश मिळणार आहे.
‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ अर्थात, ‘डीसीजीआय’ने ‘ताकेदा बायोफार्मास्युटिकल’ कंपनीच्या ‘क्यूडेंगा’ या लसीला भारतात नुकतीच मान्यता दिली. यापूर्वी, युरोपियन युनियनसह ब्राझील, अर्जेंटिनासारख्या ४० देशांमध्ये ही लस परिणामकारक ठरली असून, ‘जागतिक आरोग्य संघटने’नेही प्रमाणित केली आहे. ही लस डेंग्यूच्या चारही प्रकारांवर परिणामकारक ठरणार असून, वयवर्षे ४ ते ६० पर्यंत नागरिकांना ही लस घेता येईल. विशेष म्हणजे, डेंग्यूबाधितांनीच ही लस घेतली पाहिजे किंवा लस घेण्यापूर्वी रक्तचाचणी करायला हवी, असेही अजिबात नाही. ‘क्यूडेंगा’ लसीचे दोन डोस उपलब्ध असून, पहिला डोस घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या अंतराने दुसरा डोस नागरिकांना घेता येईल. परंतु, गरोदर महिला आणि ‘इम्युनोरिस्पॉनसिव्ह’ प्रकारची ज्यांची औषधे सुरू आहेत, अशांनी ही लस घेऊ नये, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. या लसीच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून, लसीचे मूल्य आणि एकूणच वितरण कार्यक्रमाविषयी आगामी काळात स्पष्टता येईल.
परंतु, डेंग्यूची लस टोचून घेतली म्हणजे या आजारापासून आजीवन संरक्षणकवच मिळाले, अशा भ्रमात राहण्याचे काहीएक कारण नाही. ही लस १०० टक्के डेंग्यूपासून सुरक्षा प्रदान करणारी नसून, डेंग्यूच्या लक्षणांमध्ये ८० टक्के; तर डेंग्यूमुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचा दर हा ९० टक्क्यांनी कमी होणार आहे. शिवाय, या लसीचा परिणाम साधारण साडेचार वर्षांपर्यंत कायम राहणार असल्याचेही समजते. त्याचबरोबर संबंधित रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवरदेखील लसीची परिणामकारकता अवलंबून आहेच. याचाच अर्थ, ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार असली, तरी डेंग्यूपासून खबरदारीच्या उपाययोजनांना गत्यंतर नाही.
पूर्वी डेंग्यूचा धोका हा मुख्यत्वे मान्सूनच्या कालावधीपुरता मर्यादित होता. परंतु, जागतिक हवामानबदलामुळे कोलमडलेले एकूणच निसर्गचक्र पाहता, डेंग्यू हा आता केवळ पावसाळी आजार राहिलेला नाही. वर्षभरही त्याचा प्रादुर्भाव देशाच्या अगदी कानाकोपर्यांत पाहायला मिळतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे, पावसाळ्यात ठिकठिकाणी लगेच निचरा न झाल्यामुळे साचणारे पाणी आणि उष्ण दिवसांचा कालावधी वाढल्याने डेंग्यूच्या डासांचा प्रजनन कालावधीही वाढला. त्यामुळे नवीन लस बाजारात दाखल होणार असली, तरी डेंग्यूविरोधी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज राहावे लागेल. तसेच, या लसीच्या अनुषंगाने आरोग्यसंबंधित पायाभूत सुविधांमध्येही बदल करणे, हे क्रमप्राप्त. सहसा लसीकरणाचे कार्यक्रम हे राष्ट्रीय स्तरावर एकसमान निश्चित कालावधीत राबविले जातात. परंतु, लसीकरणाचा विचार करताना देशातील सर्वाधिक डेंग्यू रुग्णसंख्या आढळणार्या जिल्ह्यांना प्राधान्यक्रम दिल्यास, त्याचे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील. म्हणजेच, लसीकरणाच्या कार्यक्रमाचे केंद्रीकरण नाही, तर विकेंद्रीकरण करणे ही काळाची गरज म्हणावी लागेल. एकूणच काय, तर डेंग्यूचा सामना करण्यासाठी केवळ ‘क्यूडेंगा’ ही लस हा एकमेव शाश्वत उपाय असू शकत नाही. लसीकरणाच्या कार्यक्रमाबरोबरच गावांपासून ते शहरांतील पर्जन्यजलाचे सुयोग्य व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, त्यानुसार शहर नियोजनात, आराखड्यांमध्ये ठोस बदल, पर्जन्यमापनाची अचूक नोंद, तसेच ठिकठिकाणी डासांच्या घनतेच्या माहितीचे संकलन, यांसारख्या सर्वंकष उपाययोजनांवर स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेषत्वाने भर द्यावा लागेल. सामाजिक जनजागृती, अचूक निदान, जलद वैद्यकीय मदत आणि डासांच्या संख्येवर नियंत्रण या चतु:सूत्रीचा अवलंब केल्यास डेंग्यूचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होण्यास मदत होईल.
पण, ही केवळ सरकारची अथवा प्रशासकीय जबाबदारी न मानता, सर्वसामान्य नागरिकांनीही डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेणे तितकेच क्रमप्राप्त. यामध्ये प्रामुख्याने आपल्या घरात, आसपासच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याबरोबरच, डासांना दूर ठेवण्यासाठी क्रीम, पूर्ण बाह्यांचे कपडे, मच्छरदाणीचा झोपताना वापर यांसारखे उपायही डेंग्यूला दूर ठेवू शकतात. आपले घर-अंगण कितीही स्वच्छ असले, पण आसपासचा परिसर कचर्याचे ढीग, दुर्गंधी आणि सांडपाण्याने दूषित असेल, तरी डेंग्यूच्या प्रादुर्भावाची शक्यताही साहजिकच वाढते. त्यामुळे डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी स्वत:च्या, आपल्या कुटुंबाच्या आरोग्यरक्षणासाठी आपला परिसरही स्वच्छ राखणे, याबाबत सजगता ही दाखवायलाच हवी!