मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातून प्रथमच 'सरगॅसम न्युडिब्रँच' (Scyllaea pelagica) या समुद्री गोगलगायीच्या प्रजातीची नोंद झाली आहे (sea slug). ही नोंद वसई येथील भूईगाव किनाऱ्यावरुन सागरी निरीक्षक दत्ता पेडणेकर यांनी केली आहे. सरगॅसम या समुद्रावर तरंगणाऱ्या समुद्री शैवलामध्ये ही गोगलगाय वास्तव्य करत असल्यामुळे तिला 'सरगॅसम न्युडिब्रँच' असे म्हटले जाते. (sea slug)
समुद्री गोगलगायी या मृदुकाय (Mollusca) प्राण्यांच्या अतिशय आकर्षक, रंगीबेरंगी आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गटात या प्रजातीचा समावेश होतो. या प्राण्यांना बाह्य कवच नसते. त्यामुळे त्यांच्यात संरक्षणासाठी विविध प्रकारचे युक्त्या विकसित झालेल्या आहेत. अनेक समुद्री गोगलगायी समुद्री परिसंस्थेच्या आरोग्याचे निर्देशक (Bio-indicators) मानल्या जातात. वसईच्या किनाऱ्यांवर आढळणाऱ्या अशा प्रकारच्या गोगलगायींच्या निरीक्षणाचे काम भूईगावमधील दत्ता व प्रतिभा पेडणेकर हे दाम्पत्य आणि त्यांच्या मुली पूजा व प्राची पेडणेकर करतात. वसईतील किनाऱ्यांवर फिरुन तेथील सूक्ष्म सागरी जीवांचे निरीक्षण आणि त्यांच्या नोंदी घेण्याचे काम हे कुटुंब करते. याच निरीक्षणादरम्यान दत्ता पेडणेकर यांनी महाराष्ट्रातून प्रथमच 'सरगॅसम न्युडिब्रँच' या समुद्री गोगलगायीच्या प्रजातीची नोंद केली आहे.
२०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या रेकाॅर्ड आॅफ सी सग्ल फ्रौना या संशोधन निबंधात गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर २०१६ ते २०१८ या तीन वर्षांच्या अभ्यासादरम्यान १५ समुद्री गोगलगायींच्या प्रजातींची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये 'सरगॅसम न्युडिब्रँच' हिचाही समावेश होता. ही प्रजात भारतात आजवर तामिळनाडू, गोवा, लक्षद्वीप आणि आंधप्रदेश या राज्यांमध्येच आढळून आली आहे. या गोगलगायीची लांबी साधारण ७ ते १० सेंमी (३–४ इंच) पर्यंत असते. शरीर लांबट, जाडसर आणि वरून-खाली चपटे असते. त्यामुळे ती शैवालाच्या पानांमध्ये सहज लपून राहते. डोक्याजवळ दोन जोड्या स्पर्शेंद्रियांची असतात. याशिवाय वास आणि रासायनिक संकेत ओळखण्यासाठी रायनोफोर्स नावाची संवेदनेंद्रिये असतात.
सरगॅसमवरील अधिवासाकरिता विकास
'सरगॅसम न्युडिब्रँच'ही इतर बहुतांश समुद्री गोगलगायींपेक्षा वेगळी आहे. ही प्रजाती समुद्रात तरंगणाऱ्या सरगॅसम शैवालांच्या पुंजक्यांवरच संपूर्ण जीवन व्यतीत करते. तिच्या शरीराचा रंग, आकार आणि त्वचेवरील उपांग हे शैवालांसारखेच असल्यामुळे ती सहज ओळखू येत नाही. हा उत्कृष्ट छद्मवेष तिला भक्षकांपासून संरक्षण देतो.ही गोगलगाय सरगॅसमवर वाढणाऱ्या हायड्रॉइड्स या सूक्ष्म जीवांवर उपजीविका करते. याच शैवालांवर ती जिलेटिनयुक्त सर्पिल आकाराची अंडीही घालते. त्यामुळे या प्रजातीचे अस्तित्व पूर्णपणे सरगॅसमच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. या प्रजातीचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे शरीराच्या दोन्ही बाजूंना असलेले दोन जोड्या पानांसारखे उपांग ज्याला सिराटा म्हणतात. या उपांगांच्या कडा दातेरी असतात. त्यांचा आकार सरगॅसम शैवालाच्या पानांसारखा दिसतो. या उपांगांच्या आतील बाजूस असंख्य सूक्ष्म गिल्स (श्वसनेंद्रिये) असतात, ज्यांच्या साहाय्याने ती श्वसन करते. शरीराच्या मागील टोकाला चपट्या पंख्यासारखा उंचवटा असतो. हा भागही शैवालाच्या फांदीसारखा दिसतो, त्यामुळे छद्मवेष अधिक प्रभावी होतो.