कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला मनसेनेही पाठिंबा जाहीर केला आणि मागेच राजपुत्र दिल्लीवारी करून अभिजित दीपकेलाही भेटून आले. हा तोच दीपके, ज्याला अमित ठाकरेंनी आधी विरोधही दर्शविला होता. सोनम वांगचूक उपोषणाला बसले असताना, दीपके आणि तेथील आंदोलनकर्त्या तरुणांना त्याचे गांभीर्य नसल्याची टीका करणारे हेच राजपुत्र, परवा दीपकेंना हातात हात धरून धीरही देऊन आले. म्हणा, सोयीस्कर भूमिकाबदल हा काही मनसेला नवीन नाहीच. त्यामुळे यंदाही अन्य मोदी विरोधकांप्रमाणे मनसेनेही त्यांच्या थंड पडलेल्या इंजिनात ‘सीजेपी’च्या आंदोलनातून का होईना, आग पेटवण्याचा प्रयत्न केला, त्यात नवल ते काय!
काल राज ठाकरे यांनी ‘सीजेपी’ आंदोलनाच्या हाताळणीवरून मोदी सरकारवर सोशल मीडियावरून टीकास्त्र डागले. पण, त्या पोस्टमधील राज ठाकरे यांच्या आजवरच्या ‘खळ्ळखट्याक्’ भूमिकेला न शोभणारे चार शब्द तर अगदी लक्षवेधी ठरावे. राज ठाकरे मोदी सरकारला सल्ला देतात, ‘निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवा.’ मग राजसाहेब, २००८ साली तुम्ही आणि तुमच्या पक्षाने हाच समजूतदारपणा रेल्वे भरती परीक्षा केंद्रांवर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण, तोडफोडीच्या वेळी का दाखवला नाही? तसेच टोलनाके बंद पाडण्याच्या आंदोलनासाठी केलेली तोडफोड असो, विधानसभेत अबू आझमीच्या कानशिलात लगावण्याचे प्रकरण असो, हा सगळा मनसेचा कुणीकडचा समजूतदारपणा म्हणायचा? म्हणजे, मनसेने सरकारसमोर ठेवलेल्या मागण्या मान्य झाल्या नाही की, कार्यकर्त्यांकरवी रस्त्यावर उतरून नुसता धुडगूस घालायचा, धमकवायचे हादेखील निर्दयीपणाच! पण, आपण जी-जी आंदोलने करतो, ती जनहितासाठी असा समज असल्यामुळे यांना शंभर गुन्हे माफ हवे, असा हा सगळा दुटप्पीपणा!
आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करावी, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करावा आणि सरकारने त्याविरोधात समजूतदारपणा दाखवावा, ही बाष्कळ अपेक्षाच मुळी अशा परिस्थितीत गैरलागू ठरते. कारण, इथे प्रश्न केवळ सरकारचा नाही, तर सार्वजनिक मालमत्ता आणि नागरिकांच्या जीविताचाही आहे. त्यामुळे इतरांना शहाजोगपणे शहाणपणाचे सल्ले देताना, ठाकरेंनीही किमान समजूतदारपणा दाखवला तरी पुरे!
तळ्यातला बेडूक
कालच्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पुढे राज ठाकरे म्हणतात, "इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, ‘लेम डक प्रेसिडेंट.’ म्हणजे, ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरू असतो, ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे, असं दिसतंय.” खरेतर यावरून देशाच्या पंतप्रधानांविषयीचे राज ठाकरेंचे आकलन हे किती संकुचित, पूर्वग्रहदूषित आहे, याचीच कल्पना यावी. शिवाय, राज ठाकरेंचा या एकाच वाक्यातील विरोधाभासही तितकाच हास्यास्पद. म्हणजे एकीकडे म्हणायचे, पंतप्रधानांचा प्रभाव कमी होतोय आणि दुसरीकडे ते जगभराचे दौरेही करतात. पण, वास्तविक मोदींचा प्रभाव राजसाहेब म्हणतात तसा खरोखरच लयाला जात असता, तर त्यांनी अशा दौर्यांचा घाटच घातला नसता. एवढेच नाही, तर प्रभावशून्य होणार्या पंतप्रधानाला अन्य देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्याचे मुळात औदार्यच दाखवले असते का? त्यामुळे इतरांना ‘लेम डक’ म्हणून संबोधण्यापूर्वी आपले, आपल्या पक्षाचे कार्यक्षेत्र डबक्यातल्या बेडकाएवढेच आक्रसलेले आहे, याचा मात्र त्यांना विसर पडलेला दिसतो. त्यातच राजसाहेबांना ‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या निमित्ताने बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि अगदी ‘अरब स्प्रिंग’च्या विध्वंसक जनआंदोलनाचेही स्मरण झाले. पण, या प्रत्येक देशातील परिस्थिती, जनआंदोलनामागची कारणे ही पूर्णत: भिन्न होती. देशातील बिकट आर्थिक परिस्थिती, नेत्यांची हुकूमशाही, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरोधात जनता पेटून उठली होती. जनता म्हणजे शब्दश: जनता बरं का! सर्व वयोगटातील, सर्व जाती-धर्माचे, सर्व प्रांतातील कोट्यवधी लोक! इथे तर ‘सीजेपी’चे आंदोलन हे ‘जेन-झी’ आणि त्यातही दिल्लीपुरतेच मर्यादित. त्यामुळे त्याची अन्य देशांतील सत्तांतराला कारणीभूत ठरणार्या जनआंदोलनांशी मुळात तुलना करणे, हेच असंबद्ध ठरावे.
एकूणच काय, तर ‘सीजेपी’च्या आंदोलनामुळे ‘बीजेपी’ला देशातून हद्दपार करण्याचे स्वप्नरंजन करणार्या डबक्यातील बेडकांनी कितीही डराव डराव केले, तरी मोदींवरील जनविश्वासाला कदापि तडा जाणार नाही, हे निश्चित!