आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात, ‘एआय’च्या वेगाने बदलणार्या जगात, आज प्रत्येक देश स्वतःचे स्थान मजबूत करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेत आहे. या शर्यतीत ब्रिटन सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ब्रिटनच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ‘एआय’ आणि ऑनलाईन सुरक्षेला थेट मुख्य कॅबिनेट दर्जा देण्यात आला असून, या महत्त्वपूर्ण जबाबदारीची धुरा भारतीय वंशाचे तरुण नेते कनिष्क नारायण यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. बिहारच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास, आज लंडनच्या ’१० डाऊनिंग स्ट्रीट’ आणि थेट कॅबिनेटपर्यंत पोहोचला. ही बाब संपूर्ण भारतासाठी आणि जागतिक पातळीवरील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
कनिष्क नारायण यांची ही कामगिरी केवळ राजकीय यश नसून चिकाटी, उच्चशिक्षण आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. कनिष्क यांचा जन्म बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झाला. वयाच्या १२व्या वर्षी ते आपल्या कुटुंबासह ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. त्यांनी इटन कॉलेज, ऑसफर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यांसारख्या जगातील अग्रगण्य शिक्षण संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले. ब्रिटनच्या लेबर पार्टीचे सदस्य असलेल्या कनिष्क यांनी, २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत वेल्समधील ‘व्हेल ऑफ ग्लॅमॉर्गन’ या मतदारसंघातून विजय मिळवला. वेल्सचे पहिले अल्पसंख्याक खासदार ठरून, त्यांनी इतिहासाची नोंद केली होती.
ब्रिटनचे पंतप्रधान अॅण्डी बर्नहॅम यांनी मंत्रिमंडळ फेररचनेत, कनिष्क नारायण यांना कॅबिनेट दर्जाचे ‘एआय’ मंत्री म्हणून पदोन्नती दिली आहे. आता ब्रिटनमध्ये ‘एआय’, डेटा सेंटर, सेमीकंडटर्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित सर्व प्रमुख धोरणे ठरवण्याचे मुख्य अधिकार, कनिष्क यांच्याकडे असतील. यापूर्वी, राज्यमंत्री दर्जा असलेल्या या पदाला आता थेट मुख्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने, ‘एआय’शी संबंधित निर्णय अधिक वेगाने आणि उच्चस्तरावर घेतले जातील.
ब्रिटनला जगाचे ‘ग्लोबल एआय हब’ बनवण्यासाठी, सरकारने प्रशासकीय रचनेत काही मोठे बदल केले आहेत. ‘डिपार्टमेंट ऑफ सायन्स, इनोव्हेशन अॅण्ड टेनोलॉजी’ हे स्वतंत्र मंत्रालय बंद करून, ‘बिजनेस अॅण्ड ट्रेड डिपार्टमेंट’मध्ये त्याचे विलीन करण्यात आले आहे. ‘एआय’ आणि व्यापाराला एकाच छताखाली आणून, नवीन तंत्रज्ञानाला आणि स्टार्ट-अप्सना थेट व्यावसायिक व औद्योगिक रूप देणे हेच यामागचे खरे उद्दिष्ट आहे. या विलीनीकरणावर काही ‘टेक’ तज्ज्ञांनी टीका केली असली तरी सरकारच्या मते, या बदलामुळे संशोधन आणि व्यवसायांमधील अंतर कमी होईल आणि धोरणात्मक निर्णय जलदगतीने होतील.
जागतिक स्तरावर भारतीय वंशाच्या नेत्यांनी आणि तंत्रज्ञांनी, नेहमीच आपली छाप पाडली आहे. ‘गुगल’चे सुंदर पिचाई असतील किंवा ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्य नडेला यांच्यासारख्या ‘टेक’ दिग्गजांनंतर, आता जागतिक स्तरावरील ‘एआय’ गव्हर्नन्स आणि धोरणनिर्मितीच्या सर्वोच्चपदी एका भारतीय वंशाच्या नेत्याची निवड होणे, ही ‘भारत गौरवाची’ परिसीमा आहे. कनिष्क नारायण यांची ही नियुक्ती सिद्ध करते की, भारतीय बुद्धिमत्ता केवळ तंत्रज्ञान विकसित करण्यातच नाही, तर जगाचे भविष्य घडवणार्या धोरणांचे नेतृत्व करण्यातही अग्रेसर आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमधून सुरू झालेला हा प्रवास, आज जगभरातील तरुण भारतीयांसाठी एक मोठीच प्रेरणा ठरत आहे.
कनिष्क नारायण यांची ब्रिटनच्या पहिल्या ‘एआय’ मंत्रिपदी झालेली नियुक्ती ही केवळ एका व्यक्तीची राजकीय प्रगती नसून, जागतिक पटलावर भारतीय संस्कार आणि मूल्यांची एक मोठीच पोचपावती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये लहानपणापासूनच जपली जाणारी ज्ञानाची उपासना,परिश्रम, कठोर शिस्त आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना भारतीयांना जगात एक वेगळी ओळख मिळवून देते. बिहारच्या भूमीचे संस्कार आणि ब्रिटन-अमेरिकेत घेतलेले उच्चशिक्षण, यांच्या समन्वयातून कनिष्क यांनी सिद्ध केले की, आपली मुळे न विसरता जागतिक नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे सांभाळू शकतात. भारतीय समुदाय ज्या देशात जातो, तेथील कायदे आणि संस्कृतीचा आदर करत त्या देशाच्या प्रगतीत पूर्ण निष्ठेने योगदान देता आहे. त्यामुळे आज अमेरिका असो, ब्रिटन असो किंवा युरोपातील अन्य देश; तेथील सरकारे आणि प्रशासकीय यंत्रणा भारतीय वंशाच्या लोकांवर अथांग विश्वास दाखवत आहेत.