मुंबई: (Eastern Freeway, MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्रीवे) विस्तारीकरण प्रकल्पाच्या कामात आणखी एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. छेडानगर ते आनंदनगरदरम्यान उभारण्यात येत असलेल्या १३.९ किलोमीटर लांबीच्या उन्नत हाय-स्पीड कॉरिडॉरसाठी गजबजलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सेगमेंट लाँचरचे प्रत्येकी ५९ मीटर लांबीचे आणि १६० मेट्रिक टन वजनाचे मुख्य गर्डर लाँचरचे दोन भाग अवघ्या चार तासांत उभारण्यात आले.
सामान्यतः इतक्या जटिल स्वरूपाच्या कामासाठी १८ ते २४ तासांचा कालावधी लागतो. मात्र, एमएमआरडीएचे अचूक नियोजन, अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान, काटेकोर सुरक्षा उपाययोजना आणि मुंबई वाहतूक पोलिसांशी केलेल्या प्रभावी समन्वयामुळे हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात यश आले.(Eastern Freeway, MMRDA)
आता व्हायाडक्टच्या उभारणीला वेग
मुख्य गर्डर लाँचरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता या यंत्रणेच्या साहाय्याने १,६३२ प्रीकास्ट सेगमेंट्स टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे ९० मेट्रिक टन असून, त्यातून २५ मीटर रुंदीच्या सिंगल-सेल सेगमेंट सुपर स्ट्रक्चरची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे व्हायाडक्टच्या बांधकामाला अधिक वेग मिळणार असून प्रकल्प पुढील महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करणार आहे.(Eastern Freeway, MMRDA)
मुंबईच्या वाहतुकीला मोठा दिलासा
पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्प हा आनंदनगर (ठाणे) ते छेडानगर (घाटकोपर) असा १३.९ किलोमीटर लांबीचा पूर्णपणे उन्नत सहापदरी हाय-स्पीड कॉरिडॉर आहे. हा मार्ग आनंदनगर, मुलुंड, ऐरोली, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), विक्रोळी, कांजूरमार्ग, मानखुर्द आणि घाटकोपर परिसरांना जोडणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच, दक्षिण मुंबई आणि ठाणेदरम्यानचा प्रवास २५ ते ३० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार असून, मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक जलद, विश्वासार्ह आणि कार्यक्षम होईल.(Eastern Freeway, MMRDA)
एमएमआरडीएच्या मते, या महत्त्वाच्या अभियांत्रिकी टप्प्यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती मिळणार असून, मुंबईतील भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे.(Eastern Freeway, MMRDA)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.