महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दशकभरात विकास, पायाभूत सुविधा, प्रशासनातील निर्णयक्षमता आणि सामाजिक न्याय हे विषय सातत्याने चर्चेत राहिले. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास प्रकल्प, धोरणात्मक निर्णय आणि सामाजिक समावेशकतेवर आधारित उपक्रम राबविण्यात आले. आज त्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सार्वजनिक नेतृत्वातील विकासाभिमुख दृष्टिकोनाचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारा हा लेख...
राजकारणात लोकप्रियता मिळविणे आणि प्रभावी नेतृत्व सिद्ध करणे, या दोन वेगळ्या गोष्टी. लोकप्रियता काळानुसार बदलत असते; परंतु दूरदृष्टी, निर्णयक्षमता, सातत्यपूर्ण प्रशासन आणि विकासाभिमुख धोरणे यांच्या आधारे उभे राहिलेले नेतृत्व दीर्घकाळ चर्चेत राहते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक जीवनाचा मागोवा घेतला असता, विकास हा त्यांच्या राजकीय प्रवासातील सातत्याने अधोरेखित झालेला मुद्दा असल्याचे दिसून येते.
राजकारणातील यश केवळ निवडणुका जिंकण्यात नसते, तर राज्याच्या भविष्यासाठी दिशा ठरविण्यात असते. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, कृषी, सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेने समृद्ध राज्याला विकासाच्या नव्या टप्प्यावर नेण्यासाठी सक्षम नेतृत्व आणि परिणामकारक प्रशासन आवश्यक असते. विविध कार्यकाळात फडणवीस यांनी राज्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प आणि धोरणांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, विकास आणि सामाजिक न्याय यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न. विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या विविध योजनांना चालना, चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी, ‘एमआयडीसी’मध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव भूखंडांच्या धोरणाला गती, तसेच परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार यांसारख्या निर्णयांचा उल्लेख सामाजिक समावेशकतेसंदर्भात केला जातो.
मुख्यमंत्रिपदाबरोबरच विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. शासनाच्या निर्णयांवर टीका करताना पर्यायी उपाय मांडणे, लोकहिताचे प्रश्न सातत्याने उपस्थित करणे आणि प्रशासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका विधायक असू शकते, हा संदेशही त्यांच्या राजकीय वाटचालीतून दिसून येतो. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतानाही विकास प्रकल्पांचा वेग कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला. बदलत्या राजकीय परिस्थितीतही पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि प्रशासनातील समन्वय या बाबींना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला.
सध्याच्या कार्यकाळात महाराष्ट्राला आधुनिक पायाभूत सुविधांनी सक्षम राज्य बनविण्याच्या उद्देशाने अनेक महत्त्वाचे प्रकल्प पुढे नेण्यात आले आहेत. रस्ते, द्रुतगती महामार्ग, पूल, बंदरे, जलव्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्था यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यावर भर देण्यात आला आहे. आर्थिक प्रगतीसाठी पायाभूत सुविधा हा महत्त्वाचा आधार मानला जात असल्याने या क्षेत्रातील गुंतवणूक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. मुंबई कोस्टल रोड हा महानगरातील वाहतूक व्यवस्थेतील ताण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या दोन टोकांतील दळणवळण अधिक गतिमान होण्याबरोबरच उद्योग, शेती, पर्यटन आणि सेवाक्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते.
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचा प्रस्तावित विकास हा महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा प्रकल्प. जागतिक व्यापारातील राज्याची क्षमता वाढविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे वर्धा ते कोल्हापूर प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे धार्मिक पर्यटनासह प्रादेशिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भविष्यातील जलसुरक्षेच्या दृष्टीने नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पासारख्या योजनांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हवामानबदल, पाणीटंचाई आणि सिंचनाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, अशा प्रकल्पांकडे दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने पाहिले जात आहे. राजकीय नेतृत्वाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होत असते. विविध राजकीय घडामोडी, टीका आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवरही विकासाचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यशैलीत दिसून येतो. प्रशासनातील निर्णयक्षमता, समन्वय आणि वेळेवर निर्णय घेण्याच्या भूमिकेमुळे त्यांची स्वतंत्र कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे. त्यांच्या नेतृत्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, सर्वसमावेशक विकासाचा आग्रह. जाती, धर्म, भाषा, प्रदेश किंवा सामाजिक पार्श्वभूमी यांच्या पलीकडे जाऊन विकासाचे लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावेत, हा दृष्टिकोन विविध योजनांमधून आणि निर्णयांमधून दिसून येतो. सामाजिक समरसता आणि आर्थिक प्रगती यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न हा त्यांच्या प्रशासनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
महाराष्ट्राची ओळख केवळ सांस्कृतिक परंपरेपुरती मर्यादित नाही. उद्योग, शेती, शिक्षण, संशोधन आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये राज्याने देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेत स्पर्धात्मक राहण्यासाठी पायाभूत सुविधा, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि कार्यक्षम प्रशासन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न राज्यात सातत्याने होत असल्याचे दिसून येते. अर्थात, लोकशाही व्यवस्थेत मोठ्या प्रकल्पांबाबत मतभेद, प्रश्न आणि सार्वजनिक चर्चा होणे स्वाभाविक आहे. विकासाचा वेग, पर्यावरणीय परिणाम, सामाजिक समतोल आणि आर्थिक व्यवहार्यता या सर्व बाबींचा सातत्याने आढावा घेणे, हेही तितकेच आवश्यक आहे. लोकशाहीचे सामर्थ्य अशा विधायक चर्चेतच दडलेले असते. गेल्या काही वर्षांचा एकत्रित विचार केला असता, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा विस्तार, गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न, प्रशासनातील गती आणि भविष्योन्मुख नियोजन या मुद्द्यांमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची चर्चा सातत्याने होताना दिसते. विकासाला केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येतो.
भविष्यात महाराष्ट्राची प्रगती अनेक आर्थिक, सामाजिक आणि जागतिक घटकांवर अवलंबून असेल. मात्र, विकासाला केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन, दीर्घकालीन नियोजनाची तयारी आणि राज्याला राष्ट्रीय, तसेच जागतिक स्तरावर अधिक सक्षम करण्याची महत्त्वाकांक्षा या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा संदर्भबिंदू म्हणून अभ्यासले जाईल. महाराष्ट्राच्या विकासाच्या या प्रवासात त्यांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांना अधिक यश लाभत राहो, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरो आणि त्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य व सर्वांगीण सुयश लाभो, अशाच मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.
अॅड. धर्मपाल मेश्राम
(लेखक माजी उपाध्यक्ष, अनुसूचित जाती-जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य आहेत.)
९४२२४४०६०२