अथक परिश्रम, जिद्द आणि स्वप्नांवरील अखंड विश्वासाच्या बळावर स्कायरुटच्या विक्रम-१ मोहिमेच्या माध्यमातून आकाशालाही गवसणी घालणार्या चिन्मय शिरोडकर यांच्याविषयी...
ध्येय घेऊन जगणारी माणसे फार वेगळी असतात. त्यांच्याकडे पाहिले की, प्रथमदर्शनी काही विशेष जाणवत नाही; ती आपल्यासारखीच बसमध्ये चढतात, रांगेत उभी राहतात, चहाचा कप हातात धरून गप्पाही मारतात. पण, त्यांच्या मनात कुठेतरी एक छोटासा ध्येयासक्तीचा दिवा सतत तेवत असतो. बाकी जग वेळ, परिस्थिती आणि नशिबाची गणिते मांडत बसते; ही माणसे मात्र त्या दिव्याची वात विझू नये म्हणून झटत राहतात. त्यांना थकवा येतो, अपयश येते, कधी लोक हसतातही; पण ध्येयाशी मैत्री केलेल्या माणसांना मागे वळून पाहायला फुरसतच नसते. कारण, त्यांना माहीत असते स्वप्नांचा रस्ता हा कधीच सरळ नसतो; पण चालत राहणार्यांसाठी गगनही ठेंगणे होते. ‘विक्रम-१’च्या यशात अशीच ध्येयाने झपाटलेली कामगिरी करत, गगनाला गवसणी घालणारा एक मराठी तरुण म्हणजे चिन्मय मनोज शिरोडकर!
चिन्मयचा जन्म मुंबईतलाच. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला हा मुलगा; पण घरात दोन गोष्टींची कमतरता कधीच नव्हती, शिक्षणाची ओढ आणि देशाविषयीची आपुलकी. वडील रेल्वेत नोकरी करणारे, कला शाखेचे पदवीधर; तर आई पदव्युत्तर शिक्षण घेऊन शाळेत शिक्षिका. घरात कोणी शास्त्रज्ञ नव्हते; पण अभ्यास करावा, चांगले माणूस व्हावे आणि देशासाठी काहीतरी करावे, हा संस्कार मात्र नक्की होता.
माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये त्याचा शालेय प्रवास सुरू झाला. दहावीपर्यंत तो कधी पोहोचला, हे स्वतः चिन्मयलाही कळले नाही, असे तो सांगतो. सरस्वतीच्या त्या प्रांगणात विज्ञानाविषयीची आवड नकळत रुजत गेली. काही मुलांना क्रिकेटचे वेड असते, काहींना गाण्याचे; चिन्मयला मात्र विज्ञानाचे ज्ञान जाणण्याची उत्सुकता होती.
दहावीनंतर त्याने घरच्यांपेक्षा थोडा वेगळा मार्ग निवडला. दादरच्या कीर्ती महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बारावी पूर्ण झाल्यावर अभियांत्रिकीचा निर्णय पक्का केला. ‘जेईई’ परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन, विलेपार्लेच्या द्वारकादासजी संघवी महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीसाठी प्रवेशही मिळवला. त्याकाळात संगणक आणि इतर आकर्षक शाखांचे पर्याय असताना, निव्वळ प्रयोगशीलतेला वाव मिळेल म्हणून त्याने मेकॅनिकल ही शाखा निवडली. पुढील चार वर्षे त्याने याच क्षेत्रातील बारकावे मन लावून अभ्यासले.
अभियांत्रिकीमध्ये उत्तम यश मिळाल्यावर, त्याच्यासमोर दोन वाटा होत्या. एक म्हणजे चांगले अर्थार्जन आणि दुसरी म्हणजे ज्ञानसाधना सुरू ठेवणे. परदेशातील संधीही त्याला खुणावत होत्याच. पण, जे काही करायचे, ते देशातच राहून आणि देशासाठीच, हा त्याचा निर्धार अधिक दृढ होता. त्यामुळेच त्याने दुसरी वाट निवडली. मनात अवकाशाविषयीचे आकर्षण आधीपासूनच होते. मात्र, मेकॅनिकल शाखेचे शिक्षण असल्याने, अवकाश संशोधनात संधी मिळणे कठीण वाटत होते. कारण, त्या क्षेत्रात भौतिकशास्त्राचे ज्ञान असलेल्यांना अधिक संधी असतात. पण, संशोधक वृत्ती असलेल्या चिन्मयने त्यावर ‘रॉकेट्री’ हा पर्याय शोधून काढला. रॉकेट तयार करणार्या या क्षेत्रात मेकॅनिकल अभियांत्रिकीचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे.
यानंतर त्याचा शोध त्याला तिरुवनंतपुरमच्या भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेपर्यंत घेऊन गेला. प्रवेशासाठी ‘गेट’ परीक्षा आवश्यक होती. त्यासाठी त्याने थेट दिल्लीच गाठली. एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेऊन सात महिने अहोरात्र मेहनत केली आणि परीक्षा उत्तीर्ण झाला. ‘थर्मल’ आणि ‘प्रपल्शन’ या विषयात शिक्षणासाठी अर्ज केला, त्यावेळी या विषयाच्या फक्त आठच जागा होत्या. पण, गुण आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला प्रवेश मिळाला. पुढील दोन वर्षांत त्याने प्रचंड मेहनत घेतली. या प्रवासात ‘इस्रो’च्या अनेक शास्त्रज्ञांचे त्याला मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण करताना तो वर्गात दुसरा आला. केरळम्मधील ‘इस्रो’च्या एका केंद्रात, ‘इस्रो’चे तत्कालीन अध्यक्ष एस. सोमनाथ आणि वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या हस्ते त्याचा सत्कारही झाला.
शेवटच्या सहा महिन्यांत त्याने ‘स्कायरूट एरोस्पेस’मध्ये इंटर्नशिप केली. त्याची कार्यकुशलता पाहून कंपनीने त्याला पदवी घेताच, कायमस्वरूपी कामावर घेतले आणि ‘विक्रम-१’ मोहिमेतील ‘थर्मल’ विभागात जबाबदारी दिली. हा विभाग यानाला प्रवासात सहन कराव्या लागणार्या तापमानाच्या झळांपासून संरक्षण देतो. त्यासाठीची विविध प्रकारची आवरणे तयार करण्याचे काम, याच विभागात केले जाते.
‘विक्रम-१’च्या निर्मितीत चिन्मयचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. जवळपास ७० टक्के काम चिन्मयने जबाबदारीने केले. त्यामुळे लॉन्च-क्रूमध्येही त्याच्यावर मोठीच जबाबदारी सोपवण्यात आली होती. यान अवकाशाकडे झेपावले, त्याक्षणी साडेतीन वर्षांची मेहनत सार्थकी लागल्याची भावना मनात आल्याचे चिन्मय सांगतो. संधी दिल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल चिन्मयने कंपनीचे प्रमुख आणि वरिष्ठांप्रति ऋणी असल्याचेही तो सांगतो.
आज एक मिशन पूर्ण झाले असले, तरी भारतीय अवकाश क्षेत्र आता अधिक वेगाने विस्तारत आहे. पुढील मोहिमांमध्ये अधिक काम करून, देशाला या क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्याचा त्याचा मानस आहे. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी ‘रूट’ ते ‘स्कायरूट’ असा प्रवास करत, देशाचा गौरव वाढवणार्या चिन्मय शिरोडकर याला पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- कौस्तुभ वीरकर