अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; गस्तीवर असलेल्या जवानांवर गोळीबार;एक जवान हुतात्मा

लाल चौक परिसरात शोधमोहीम सुरु

    22-Jul-2026   
Anantnag Terrorist Attack
 
मुंबई : (Anantnag Terrorist Attack) जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्याचे निदर्शनास आले. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील लाल चौकाजवळील कोकेरनाग रोडवर गस्त घालत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. या अंधाधुंद गोळीबारात हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण लाल चौक परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजता लाल चौक येथे हा गोळीबार झाला. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा बंदोबस्तावर तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन यांना या हल्ल्यात गोळी लागली. अज्ञात दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य करत अंधाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागताच आशिक हुसेन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. हल्ला केल्यानंतर दहशतवादी आपल्या वाहनातून घटनास्थळावरून फरार झाले. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले.(Anantnag Terrorist Attack)
 
हल्ल्यानंतर सहकारी पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत गंभीर जखमी आशिक हुसेन यांना तातडीने जीएमसी अनंतनाग रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतींमुळे त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.(Anantnag, Terrorist Attack)
 
हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे अतिरिक्त जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा दलांनी तत्काळ लाल चौक आणि परिसरातील सर्व मार्गांची नाकेबंदी केली. परिसरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके उभारून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोरांचा शोध वेगाने सुरू असून या भ्याड हल्ल्यात सहभागी असलेल्या दोषींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.(Anantnag, Terrorist Attack)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर