हिंदूंच्या जनजागरणामुळे हिंदुत्वविरोधी मायावी टोळ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल केला असून, त्यांनी आता आपल्याच श्रद्धास्थानांच्या आधारे हिंदू समाजात संभ्रम निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार निधर्मी मायावी टोळ्या वारीलाही लक्ष्य करीत आहेत. पूर्वी त्यांनी शिवजयंती तिथी की तारीख अशी फूट पाडली आहे. आता त्याच धर्तीवर पंढरपूर वारीला लक्ष्य करून, वारीतील एकतेची वीण विस्कळीत करण्यासाठी वारीतील निधर्मी दांभिकांचा मुक्तसंचार वाढला आहे.
पंढरपूरची वारी व आषाढी एकादशीचे व्रत महाराष्ट्रातील सामाजिक समरसतेचा सर्वांत मोठा उत्सव असून, विठ्ठल हे सर्वसामान्य माणसाचे दैवत आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर वारीमध्ये, वैष्णवांचा जनसागर आपल्या दैवताचे रूप पाहण्यासाठी उपस्थित होतो. पंढरपूरच्या वारी उत्सवाला कोणालाही निमंत्रण नसते किंवा ‘चलो पंढरपूर’ अशी सुविधासुद्धा कोणी करत नाही. फक्त कालदर्शिकेच्या तिथीप्रमाणे देशाच्या विविध भागांमधून ग्रामीण, शहरी शेतकरी ते जमीनदार, श्रीमंत ते सामान्य माणूस स्वखर्चाने, स्वतःला विठ्ठलभक्त म्हणत व विठ्ठलास मायबाप म्हणत पंढरपूरच्या दिशेने पायी निघतो. दशमीच्या दिवशी पंढरपुरात विसावा घेत, विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावतो. दशमी ते पौर्णिमा हे पाच दिवस पंढरपुरात विठ्ठलभक्तांचा जनसागरच उसळतो. सामाजिक समरसता व राष्ट्रीय एकतेच्या मोठ्या उत्सवाचे दर्शनच तेथे घडते. हिंदुत्वाच्या एकतेचे विशाल स्वरूप असलेल्या वारीमधील समरसता, बंधुभाव काही समाजविघातक मायावी टोळ्या आणि संघटनांच्या डोळ्यांत सतत खुपत आहे. त्यामुळे त्यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये प्रवेश करून, वारकरी बंधूची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सामाजिक समरसतेचा कणा मोडण्यासाठी त्यांनी समाजमाध्यमांद्वारे काही छुपे प्रयोग करण्यासही सुरूवात केली आहे. पावसाळ्यात ज्याप्रमाणे जागोजागी कुत्र्याच्या छत्र्या उभ्या राहतात किंवा पावसात जिकडे-तिकडे बेडकाची पैदास पाहावयास मिळते, त्याचप्रमाणे हिंदुत्वविरोधी मायावी टोळ्या वारी पर्वादरम्यानच बिळांमधून पटापट बाहेर पडून समाजविरोधी डराव-डराव करीत असतात. या डराव डराव करणार्या मायावी व स्वतःला नास्तिक म्हणणार्या टोळ्या मुळातच सहिष्णू असलेल्या वैष्णवांचा धर्म, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या समरस आणि बंधुभाव विचाराच्या वारीला वेगवेगळ्या विचारात-प्रवाहात विभागण्यासाठी आटापिटा करीत आहेत. त्यासाठी ‘संविधान दिंडी‘पासून ‘समता दिंडी’ असे षड्यंत्र, ख्रिश्चन मिशनर्यांचे वारीत येशू ख्रिस्ताचे माहितीपत्रक वितरणाचे प्रयोग व मुस्लीम वारकरी यांना माध्यमांमध्ये दिलेली अवास्तव प्रसिद्धी चिंतनीय बाब असून, वारीमधील निधर्मीय दांभिकांचा मुक्तसंचार किंवा घुसखोरी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.
आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या गावागावांमधून हजारो पालख्या, दिंड्या, लाखो वारकरी पंढरपूर दिशेने पायी निघत असतात. अशा दिंड्यांमध्ये नास्तिक मंडळी नकली वारकरी होऊन वावरत असून, आपण वारकरी असल्याचा बनावही करीत आहेत. तसेच काही हिंदुत्वविरोधी डावे पत्रकार-लेखकसुद्धा यात घुसले असून, ते वारीचे चुकीचे वार्तांकन करून संभ्रम निर्माण करीत आहेत. वारीमध्ये कोणीही येऊ शकते, वारी ही सर्वांची आहे, विठ्ठलसुद्धा सर्व वैष्णवांचाच, त्यामुळे वारी व विठ्ठलावर कोणाचीही मक्तेदारी नाही हे सत्यच. पण, वारीमध्ये सामील होण्याचा हेतू शुद्ध असला पाहिजे. वारीचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. तुकोबांनी ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी’ म्हटले आहे. आता वारीमध्ये काही पत्रकार मंडळी, तथाकथित समाजसेवक, ख्रिस्ती मिशनरी घुसल्या असून, त्यांचा वारीमध्ये सामील होण्याचा हेतू शुद्ध नसल्याचेच लक्षात येत आहे. तुकोबांनी ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ हा विचार मांडलेल्या वारीत निधर्मी टोळ्या वारकरी बंधूंना समतेचा विचार सांगत आहेत. विठ्ठल विष्णूचे अवतार नाहीत; तर बुद्ध मूर्ती असल्याचा वाद निर्माण करणारेही वारीत सहभागी झाले. एखादा मुस्लीम अभंग म्हणतो, अशा काही घटनांना माध्यमांमध्ये अवास्तव प्रसिद्धी दिली जाते. तसेच ख्रिश्चन मिशनरीचे धर्मप्रसारक, वारीमध्ये ‘बायबल’च्या प्रती वाटण्याचे कामसुद्धा करीत आहेत. एकूणच, वारीला समाजविघातक मंडळींनी चारी बाजूंनी घेरले असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून, ते चिंतनीय आहे.
मागील वर्षापासून पंढरपूर वारीमध्ये दांभिक राजकीय मंडळींचा मुक्तसंचार सुरू असून, राजकारणसुद्धा केले जात आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते एक वारकरी म्हणून वारीमध्ये सामील व्हायचे. त्यांनी कधी वारीमध्ये राजकारण केल्याची किंवा वारकरी संप्रदायामध्ये संभ्रम निर्माण करण्याची नोंद नाही. परंतु, आताच्या वारीमधील चित्र आश्चर्यकारकच आहे. कारण, काही वर्षांपूर्वी हिंदू देव-देवता, हिंदू सण-उत्सव, ज्ञानेश्वर माऊलीची टिंगलटवाळी करणार्या सुषमा अंधारे यांनी, मागील वर्षी वारीत प्रवेश केला होता. त्यांचे व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये होते किंवा जाणीवपूर्वक फिरविले जात असावेत. शरद पवार यांचे काही समर्थकसुद्धा वारीत घुसले होते. त्यांनी तर शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची विठ्ठल-रखुमाईसोबत तुलनाही केली होती. वास्तविक पाहता, एम. बी. पाटील यांनी शरद पवार यांच्या जीवनकार्यावर ‘दगाबाज’ पुस्तक लिहिले असून, त्यांना दगाबाज म्हणत नामोहरमही केले आहे. मात्र, त्याच शरद पवार यांना ‘विठ्ठल’ संबोधले जाणे थट्टाच म्हणावी लागेल. ‘मी तुमच्या देवाचा बाप आहे’ असे म्हणत, हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवणार्या शरद पवार यांची विठ्ठलासोबत तुलना कितपत योग्य? ज्यांनी आयुष्यभर स्वतःला नास्तिक असण्याचा टेंभा मिरवून सतत मुस्लीम अनुनय केला, लांगूलचालन केले, सत्यनारायण पूजेला विरोध आणि ‘इफ्तार’मध्ये शिरखुर्मावर ताव मारला, ‘पूजा घरात आणि नमाज रस्त्यावर’ अशा दुटप्पी विचाराचे समर्थन करणार्यांची तुलना विठ्ठलासोबत करताना लाज कशी वाटत नाही? जो राजकीय नेता हिंदूंना सरळसरळ हिंसाचारी म्हणतो, त्यास वारीमध्ये येण्याचे आमंत्रणसुद्धा दिले होते. तसेच नवरात्र उत्सवात भगवतीची आणि ज्ञानेश्वर माऊलींची टिंगलटवाळी करणार्या सुषमा अंधारे यांचे वारीत काय काम?
त्यामुळे अशा दुटप्पी व बेगडी नास्तिक मंडळींच्या वारीतील मुक्तसंचारावर प्रश्नचिन्ह करून, वारीमध्ये काय काम आहे असा प्रश्नही वारकरी बंधूंनी उपस्थित केला होता. वारकरी संप्रदायांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज विचार करण्याची गरज आहे. वारीमधील किळसवाणे प्रकार कुठेतरी थांबण्यासाठी, सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचीही वेळ आली आहे. अन्यथा, येणार्या पाच-दहा वर्षांत बेगडी नास्तिक व दांभिक पुरोगामी मंडळी, पंढरपूरच्या वारीची वीण विस्कळीत केल्याशिवाय राहणार नाहीत.
देशात हिंदुत्वाच्या जागरणामुळे हिंदुत्वविरोधी मायावी टोळ्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केलेला दिसत असून, त्यांनी आता आपल्याच दैवत व श्रद्धास्थानांच्या आधारे हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हिंदू समाजात छत्रपती शिवरायांची जयंती आणि पंढरपूरची वारी असे उत्सव आहेत की, त्या उत्सवात जातिपातीच्या वर उठून हिंदू समाज हिंदू म्हणून एकत्र येतो. शिवजयंती उत्सवात प्रत्येक माणूस स्वतःला शिवरायांचा मावळा आणि वारीमध्ये वारकरी समजत असतो. तेथे जातिपातीचा विचार होत नाही. त्यामुळेच निधर्मी मायावी टोळ्या वारीला लक्ष्य करीत आहेत. यापूर्वी, त्यांनी शिवजयंती तिथीप्रमाणे की इंग्रजी तारखेप्रमाणे, असा प्रयोग केला तथा खोटे ‘नॅरेटिव्ह’ उभे करून, शिवभक्तांमध्ये फूट पाडली आहे. आता त्याच धर्तीवर पंढरपूर वारीला लक्ष्य करून, वारीमधील एकतेची वीण विस्कळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. वारीमध्ये निधर्मी दांभिकांचा मुक्तसंचार, संविधान ते समता दिंडी, ‘अल्ला देवे अल्ला दिलावे’ म्हणत मुस्लीम समाजाकडून पाणी-अल्पोपाहार वितरण, दर्ग्यात वारीचे स्वागत, तमाशा कलावंतांकडून लावणीचे सादरीरण आणि अशा घटनांना प्रसिद्धी माध्यमांत अवास्तव प्रसिद्धी देणे, हे सर्वच प्रकार वारकरी बंधूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्रच म्हणावे लागेल. त्यामुळे पंढरपूर वारीमध्ये दांभिकांचा मुक्तसंचार मोठ्या षड्यंत्राचा प्रयोग आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशोक राणे
९४२३६५८३८५