मुंबई : (Swami Laxmananand Saraswati) विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय व्यवस्थापन समितीची दोन दिवसीय (१९-२० जुलै) बैठक तेरापंथ भवन, छतरपूर येथे पार पडली. या बैठकीत देशभरातून विहिंपचे केंद्रीय पदाधिकारी आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला. समकालीन राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. त्यापैकी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती हत्याकांड चौकशी आयोगाच्या अहवालावरील मंजूर ठराव विशेष लक्षवेधी ठरला.
पुज्य स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ओडिशाच्या कंधमाल येथे झालेल्या निर्घृण हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचा अहवाल गायब झाल्याबद्दल आणि तो सार्वजनिक न केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. केंद्रीय व्यवस्थापन समितीने या संपूर्ण प्रकरणाची सी.बी.आय. मार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. परिषदेने म्हटले की, या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर सत्य समोर आणणे न्याय आणि जनविश्वास टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तसेच ओडिशामध्ये धर्मांतरावर पूर्ण बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले.(Swami Laxmananand Saraswati)
बैठकीत भारतीय समाजाची मूळ शक्ती असलेल्या कुटुंब व्यवस्थेला सुरक्षित आणि सुदृढ करण्यावर भर देण्यात आला. भारतीय कुटुंब व्यवस्थेने शतकानुशतके समाजाला संस्कारित, संघटित आणि आपुलकीने जोडलेले ठेवले आहे, असे या ठरावात नमूद करण्यात आले. वर्तमान काळातील आव्हानांवर समाज आणि शासन या दोन्ही स्तरांवर गंभीर उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही न्यायालयीन निर्णयांनी पारंपारिक सुदृढ कुटुंब व्यवस्थेला धक्का पोहोचवला आहे. कौटुंबिक हानी रोखण्यासाठी विवाहबाह्य संबंधांना मान्यता, लिव्ह-इन-रिलेशनशिपला वैधता, समलैंगिकतेला मान्यता, इ. यांसारख्या विषयांवर व्यापक चर्चा घडवून आणून कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली. परिषदेने कुटुंब प्रबोधन आणि कौटुंबिक मूल्यांच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला.(Swami Laxmananand Saraswati)
संत शिरोमणी गुरु रविदास जी यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त एक विशेष वक्तव्य पारित करण्यात आले. संत रविदास जी यांचे सामाजिक समरसता, समता, आध्यात्मिक चेतना आणि मानवी मूल्यांचे संदेश आजही संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्थान आहेत, असे परिषदेने म्हटले. परिषद राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करते. हिंदू समाजाला संघटित करणे, सनातन मूल्यांचे रक्षण करणे आणि राष्ट्रहिताच्या कार्यात सक्रिय भूमिका बजावण्याच्या संकल्पाने बैठकीची सांगता झाली.(Swami Laxmananand Saraswati)
श्रद्धेय अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने योजना
श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रणेते श्रद्धेय अशोक सिंघल यांची दि. २७ सप्टेंबर रोजी जयंती आहे. बैठकीत निर्णय घेण्यात आला की, त्यांनी हिंदू समाजासाठी केलेल्या अतुलनीय कार्याची माहिती वर्षभर समाजात पोहोचवली जाईल. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात विश्व हिंदू परिषद संघटनात्मक विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित करेल. अशोक सिंघल यांनी राम मंदिर आंदोलनाला मजबूत नेतृत्व दिले, हिंदू जागरण मोहीम राबवली आणि सामाजिक समरसतेला चालना दिली. गो-आधारित शेतीद्वारे गोसंरक्षण आणि संवर्धनाचे कार्य वाढवले जाईल. वेद विद्यालये ही प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेच्या पुनरुत्थानाची केंद्रे बनतील. त्यांनी विश्व हिंदू परिषदेला एक शक्तिशाली संघटना म्हणून स्थापित केले. त्यांच्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नांनी हिंदू समाजात नव्या चेतनेचा संचार केला. विहिपने एक कोटी हितचिंतक (सदस्य) जोडण्याचा संकल्प केला आहे.(Swami Laxmananand Saraswati)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक