सीजेपीच्या आंदोलनात 'भाडोत्री गुंड' असल्याचा संशय; दगडफेकीत ११८ हून अधिक पोलीस जखमी; पत्रकारांवर हल्ले, गाडी पेटवण्याचा प्रयत्न

हिंसाचारामागे मोठ्या "षड्यंत्रा"ची शक्यता; ७० जणांना घेतले ताब्यात

    21-Jul-2026   
Sansad Morcha
 
मुंबई : (Sansad Morcha) जंतर-मंतरवरून सुरू झालेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे आंदोलन सोमवारी संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकत होते. मात्र संसद भवनावर मोर्चा काढण्यास परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी दिल्ली पोलिसांवर दगडफेक झाल्याची चित्रेही समोर आली. अशी माहिती आहे की, ११८ हून अधिक पोलीस कर्मचारी यात जखमी झाले आहेत. व्हिडिओ फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. सुमारे ७० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मागे हटण्यास तयार नव्हते. कॉन्स्टेबलपासून आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली, अनेक जवानांचे डोके फुटले, तर त्यांच्या हातांनाही दुखापत झाली. एका एएसआयला खाली पडल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला आणि त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले सब-इन्स्पेक्टर अजय कुमार हेही जखमी झाले.
 
एका जखमी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनास्थळी ज्या प्रकारे दगडफेक झाली, त्यावरून ते दगड आधीपासूनच तेथे जमा करून ठेवले असावेत, असे वाटत होते.
 
मात्र, याची खात्री तपासानंतरच होऊ शकेल त्यांच्या मते, संसद मार्गावरील मुख्य आंदोलन संपल्यानंतर उरलेले आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले आणि त्यानंतर हिंसक झटापट सुरू झाली. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या हिंसाचारात ११८ हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये स्पेशल कमिश्नर, जॉइंट कमिश्नर, अतिरिक्त कमिश्नर, डीसीपी, अतिरिक्त डीसीपी आणि एसीपी दर्जाचे वरिष्ठ अधिकारीही आहेत. अनेक महिला पोलिस कर्मचाऱ्यांनाही दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच सुमारे ६० आंदोलनकर्तेही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Sansad Morcha)
 
दिल्ली पोलिसांचा आरोप आहे की, सीजेपीच्या आंदोलनादरम्यान जमावाने वारंवार देण्यात आलेल्या इशाऱ्यांकडे आणि कायदेशीर निर्देशांकडे दुर्लक्ष केले. आंदोलनकर्त्यांनी लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले, बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर दगड आणि इतर वस्तूंनी हल्ला केला तसेच शासकीय वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या हिंसाचारामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला होता. सध्या ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी अनेक जण विद्यार्थी नसल्याने या हिंसेमागे काही कट आहे का, याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. पोलीस प्रशासन या संपूर्ण आंदोलनाची 'षड्यंत्र' या दृष्टिकोनातून तपास करणार असल्याचे सांगत आहेत. (Sansad Morcha)
 
आंदोलनादरम्यान पत्रकारांवर हल्ले
 
आंदोलनादरम्यान विविध माध्यमांच्या पत्रकारांवर सुद्धा हल्ले झाले असून त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या विविध माध्यम संस्थांच्या पत्रकारांना केवळ धक्काबुक्कीच करण्यात आली नाही, तर ‘गोदी मीडिया हाय-हाय’ अशा आक्रमक घोषणा देत त्यांच्यावर अज्ञात वस्तू आणि पांढऱ्या रंगाचा पदार्थही फेकण्यात आला. त्यांना घाबरवण्याच्या उद्देशाने मॉब लिंचिंगसारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनकर्त्यांच्या नावाखाली वावरणाऱ्या गुंडांचे खरे स्वरूप सर्वांसमोर येत आहे. या घटनेशी संबंधित गैरवर्तनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आंदोलनात चेहरा झाकलेले आणि मुखवटे घातलेले युवक हे कोणत्याही अर्थाने सामान्य आंदोलनकर्ते वाटत नव्हते; उलट ते भाडोत्री गुंड असल्याचे भासत होते, ज्यांना केवळ गोंधळ, दंगल आणि हिंसाचार घडवून आणण्यासाठी पाठवण्यात आले होते.
महिला पत्रकारांनाही सोडले नाही. (Sansad Morcha)
 
स्वतःला आंदोलनकर्ते म्हणवणाऱ्या या भाडोत्री गुंडांनी पुरुष पत्रकारांसोबतच महिला पत्रकारांनाही लक्ष्य केले. आंदोलनादरम्यान महिला पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले आणि काही ठिकाणी त्यांच्याशी छेडछाड झाल्याच्याही घटना घडल्या. हे कुठल्याही अर्थाने विद्यार्थी वाटत नाहीत; हे केवळ संधी साधणारे दंगेखोर होते. त्यांच्या घोषणा नीट ऐकल्यास हे दंगेखोर नेमके कोण होते, याची कल्पना येईल. (Sansad Morcha)
 
बनावट आकडेवारी; दिशाभूल करणाऱ्या पोस्ट
 
तपासाचा मोठा भाग इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केंद्रित आहे. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, या काळात अनेक बनावट आणि संशयास्पद सोशल मीडिया हँडल्स सक्रिय होते, जे हिंसाचार भडकवण्यासाठी सातत्याने अफवा पसरवत होते. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की, यापैकी अनेक हँडल्स शेजारील पाकिस्तानमधून चालवले जात होते. या हँडल्सवरून सातत्याने भडकाऊ पोस्ट, व्हिडिओ आणि ट्वीट्स करण्यात आले, जेणेकरून दिल्लीतील वातावरण आणखी बिघडवता येईल. नवी दिल्लीतील या हिंसाचारानंतर लगेचच सोशल मीडियावर काही बनावट आकडेवारी आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. इंटरनेटवर असा दावा करण्यात आला की, पोलिस कारवाईत ७ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, ३९१ जण गंभीर जखमी झाले आणि २५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. (Sansad Morcha)
दिपके समोरच पोलिसांना मारहाण
अभिजित दिपके आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असतानाच काही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित एका पोलिसाला घेरून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा अभिजितने हे त्याचे आंदोलक नसल्याचा दावा केला आणि पोलिसांना त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली. त्यानुसार नंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत दंगेखोरांना पळवून लावले आणि आपल्या अधिकाऱ्याची त्यातून सुटका केली. (Sansad Morcha)
 
धर्मांधांकडून थार गाडी पेटवण्याचा प्रयत्न
 
रत्यावर उभी असलेली एक काळ्या रंगाची थार गाडी पेटवण्याचा प्रयत्न काही धर्मांध मुस्लिमांकडून होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये गाडीच्या पेट्रोल / डिझेल भरण्याच्या ठिकाणी एक धर्मांध मुस्लिम व्यक्ती जळती काडी टाकत गाडी पेटवताना दिसतो आहे. पोलिसांना त्याला अडवले मात्र उपस्थित अन्य समाजकंटक पोलिसांना रोखत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. (Sansad Morcha)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर