वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेतील गोंधळावर विद्यार्थ्यांच्या मागण्या न्याय्य म्हटल्या तरी, जंतरमंतरवर पुकारलेले ‘सीजेपी’चे आंदोलन आता पूर्णपणे भरकटले असून, ते ‘हायजॅक’ झाल्याचे कालच्या गोंधळातून दिसून आलेच. या आंदोलनाच्या आडून भारताला नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेप्रमाणे पेटवण्याचेच देशविघातक षड्यंत्र रचले जात आहे. मग आंदोलकांचा नेमका उद्देश काय?
‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अतोनात नुकसान झाले, हे मान्य करावेच लागेल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रवृत्तींचा निषेध करावा, तेवढा थोडाच. या परीक्षेतील त्रुटी दूर व्हाव्यात, दोषींना कडक शासन व्हावे आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी, या न्याय्य मागणीला पाठिंबाही असायलाच हवा. मात्र, आजघडीला दिल्लीत जे काही तथाकथित विद्यार्थी आंदोलन सुरू आहे, ते पाहता यातून विद्यार्थ्यांचे भले कमी आणि राजकीय पोळ्या भाजण्याचे उद्योगच जास्त सुरू असल्याचे स्पष्ट होते.
समाजात खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तन करायचे असेल, तर केवळ रस्त्यावर मोर्चे काढून भागत नाही; तुम्हाला स्वतःला ती व्यवस्था व्हावे लागते किंवा व्यवस्थेचा भाग बनून धोरणात्मक बदल करावे लागतात. आपल्याकडे महाराष्ट्रात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘युवक क्रांती दल’ आणि इतर सहयोगी संघटनांच्या माध्यमातून मोठी क्रांती घडवून आणण्याचे, व्यवस्था परिवर्तनाचे अनेक प्रयोग केले. तरुणांची मोठी फळी त्यांनी उभीही केली. पण, शेवटी काय झाले? ते आंदोलन फोल ठरले आणि ज्या ईप्सिताची अपेक्षा होती, ते साध्य करता आले नाहीत. कारण, जोवर तुम्ही लोकशाहीच्या चौकटीत राहून प्रशासकीय बदलांचा भाग होत नाही, तोवर रस्त्यावरील क्रांतीला यशाचे पूर्णत्व मिळत नाही. आज दिल्लीत जंतरमंतरवर जे काही सुरू आहे, त्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. किंबहुना, ती अधिकच भयावह!
या आंदोलनाचा चेहरा म्हणून जो अभिजित दीपके नावाचा कार्यकर्ता पुढे आला, त्याची राजकीय पार्श्वभूमी तपासली; तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. दीपके हा मूळचा ‘आप’चा कार्यकर्ता. उत्स्फूर्त आंदोलनाचा आव आणणाऱ्या दीपकेला, दिल्लीत आंदोलन उभे करण्यासाठी पुन्हा एकदा ‘आप’नेच रसद पुरवली. त्यामुळे हे आंदोलन आता केजरीवाल आणि त्यांच्या आंदोलनजीवी कंपूच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा आणि राजकीय नौटंकीचाच एक भाग झालेले दिसते. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, केजरीवालांना आपला राजकीय स्वार्थ साधायचा आहे, हे कालच्या आंदोलनाने अधिक स्पष्ट केले.
अशा या आंदोलनाचे विदारक सत्य हेच की, हे आंदोलन आता पूर्णपणे ‘हायजॅक’ झाले आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा वापर जसा केजरीवालांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी केला, त्याचीच ही पुनरावृत्ती. ‘विद्यार्थ्यांचे आंदोलन’ म्हणून सुरू झालेल्या या झुरळांच्या मंचावर आता कोण-कोण हजेरी लावत आहे, हे पाहिले की या आंदोलनाची भरकटलेली दिशा दिसून येते. या मंचावर हिंदू धर्मद्वेष्टे, कट्टरपंथी मुस्लीम संघटना, तथाकथित शेतकरी संघटना, डाव्या संघटनांचे कार्यकर्ते आणि अगदी ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाचे झेंडे घेऊन फिरणारेही जमा झाले. ‘नीट’च्या परीक्षेचा आणि या सर्व घटकांचा अर्थाअर्थी काय संबंध? या आंदोलनात मूळ ‘नीट’चे विद्यार्थी आणि त्यांचे हवालदिल झालेले पालक यांचा सहभाग नेमका किती, हा एक मोठा प्रश्नच.
त्यातच आंदोलनाचा म्होरक्या दीपकेवर एका महिलेने शाई फेकल्याची घटना यादरम्यान घडली. यानंतर जे काही चित्र समोर आले, ते भयंकर होते. या मंचावरून भारतमातेचा अपमान केला गेला, प्रभू श्रीरामाचा अपमान करणारी आणि हिंदू धर्माविषयी द्वेष पसरवणारी भाषणेही झोडली गेली. ज्या मंचावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चर्चा हवी, तो मंच हिंदूविरोधी आणि देशविरोधी घोषणांचा अड्डा कसा झाला? यावरूनच हे आंदोलन विद्यार्थ्यांचे राहिलेले नसून, निव्वळ मोदीविरोधी गटाचे आणि देशविघातक शक्तींचे एक सामाईक व्यासपीठ
ठरले आहे, हे निश्चित.
दुसरा एक कळीचा प्रश्न असा की, ‘सीजेपी’ आणि या आंदोलकांना विद्यार्थ्यांचा एवढाच कळवळा आहे, तर त्यांनी ‘नीट’ पेपरफुटीचे खरे दोषी असलेल्या पेपर-माफियांच्या विरोधात आंदोलन का केले नाही? बिहार, गुजरात किंवा इतर राज्यांत ज्यांनी ही रॅकेट चालवली, त्या गुन्हेगारांच्या घराबाहेर या आंदोलकांनी धरणे का धरले नाही? दोषींना फासावर लटकवा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी या तथाकथित विद्यार्थी नेत्यांकडून का समोर आली नाही? याचाच अर्थ स्पष्ट आहे की, त्यांना गुन्हेगारांना शिक्षा होण्याशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना केवळ देशात अराजकता निर्माण करायची आहे. कारण, केजरीवाल आणि कंपनी म्हणजेच, ‘अराजकता’ असे हे साधेसरळ समीकरण!
याच राजकीय गोंधळात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भूमिकाही, अत्यंत हास्यास्पदच अशीच. नरेंद्र मोदी हे आजवरचे सर्वांत तरुणविरोधी पंतप्रधान असल्याची, बालिश टिप्पणी राहुल गांधींनी केली. पण, राहुल गांधींना तरुणांची एवढीच चिंता आहे, तर ते स्वतः या आंदोलनस्थळी का गेले नाहीत? स्वतःला युवानेते म्हणवून घेणाऱ्या राहुल गांधींनी, जंतरमंतरवरील या आंदोलनापासून जाणीवपूर्वक सुरक्षित अंतर का राखले? हे आंदोलन निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि ते थेट ‘आप’शी संबंधित आहे, याची राहुल गांधींना पूर्ण कल्पना आहे. आम आदमी पाटच्या मंचावर जाऊन, राजकीय उंची कमी करून घेण्याची त्यांची मानसिकता नाही. राहुल गांधींनी स्वतः या ‘नीट’च्या प्रश्नावर संसदेबाहेर आणि आत भाषणे केली. मात्र, देशातील तरुणांनी त्यांना थंड प्रतिसाद दिला. कारण, तरुणांनाही काँग्रेसचा ढोंगीपणा चांगल्या प्रकारे समजतो. आज जंतरमंतरवर जे काही घडले, ते निव्वळ आंदोलन नव्हते, ती एक धोक्याची घंटा होती. अशा भरकटलेल्या आंदोलनांमध्ये, देशविरोधी शक्तींचा अतिशय सहजपणे शिरकाव होतो आणि त्यानंतर आंदोलनाची दिशाच बदलते. आज दिल्लीत जो गोंधळ झाला, पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला आणि भयंकर दगडफेक करण्यात आली, ती सामान्य विद्यार्थ्यांची कृती असूच शकत नाही. यामागे आंतरराष्ट्रीय आणि देशविघातक षड्यंत्र आहे. नेपाळमध्ये ज्याप्रमाणे अराजकता माजवली गेली, बांगलादेशात ज्याप्रमाणे रस्त्यावर हिंसाचार करून सत्तांतराचे डाव रचले आणि श्रीलंकेत राष्ट्रपती भवनावर चाल करून जसा देश पेटवला गेला; अगदी तशीच परिस्थिती भारतात निर्माण करण्याचे हे पूर्वनियोजित कारस्थान. राजधानी दिल्लीत आणि तेही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा हिंसाचार घडवून आणणे, हा योगायोग नक्कीच नाही. हे ‘टूलकिट’च आहे. विद्यार्थ्यांच्या असंतोषाचा ढाल म्हणून वापर करायचा, आंदोलनात समाजकंटक घुसवून पोलिसांवर हल्ले करायचे आणि देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून केंद्र सरकारला कोंडीत पकडायचे, असा हा कुटिल डाव. यामागे विदेशी शक्तींचा आणि देशांतर्गत नक्षलवादी-डाव्या विचारधारेचाही मोठा हात असण्याची दाट शक्यता आहे.
सरकारने ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी सुरू केली आहे, नवीन कडक कायदेही आणले आहेत आणि परीक्षा प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी समित्याही नेमल्या आहेत. जे विद्यार्थी खरोखरच अन्यायग्रस्त आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि न्यायव्यवस्थेकडूनही योग्य तो निर्णय येईलच. परंतु, या प्रक्रियेला वेळ द्यावा लागतो. रस्त्यावर दगडफेक करून प्रश्न सुटत नसतात. देशातील होतकरू विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी अशा ‘हायजॅक’ झालेल्या आणि राजकीय स्वार्थाने बरबटलेल्या आंदोलनांपासून, स्वतःला चार हात दूर ठेवले पाहिजे. केंद्र सरकारने आणि गृहमंत्रालयानेही या अराजकतेची अत्यंत गंभीर दखल घेऊन, विद्यार्थ्यांच्या नावाखाली दिल्लीत हिंसाचार घडवणाऱ्या या ‘कॉकरोच’ प्रवृत्तींना आणि त्यांच्या राजकीय आकांचा शोध घेऊन त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, तरच, भविष्यात भारताला पेटवण्याचे हे देशविघातक मनसुबे उधळून लावता येतील.