कधीकधी इतिहास जिंकणाऱ्यांच्या हातात चषक देतो आणि हरणाऱ्याच्या डोळ्यांत अमरत्व!‘मेटलाईफ स्टेडियम’वर अर्जेंटिनावर 1-0 असा अतिरिक्त वेळेत फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर स्पेनच्या खेळाडूंवर सोनेरी कागदांचा वर्षाव होत होता. फटाक्यांच्या रोषणाईत दुसऱ्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष रंगला होता. पण त्या हजारो दिव्यांपेक्षाही जगाचे लक्ष एका अश्रूकडे खिळले होते.
लिओनेल मेस्सीच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या त्या अश्रूकडे!
गळ्यात रौप्यपदक, डोके खाली, ओठांवर शब्द नव्हते आणि डोळ्यांत दोन दशकांचा प्रवास होता. या अश्रूचा हिशोब मांडायचा तरी कसा? 2006 मध्ये विश्वचषकात पहिल्यांदा उतरलेला तो सडपातळ अर्जेंटिनाचा मुलगा. 2022 मध्ये जग जिंकणारा सम्राट आणि 2026 मध्ये शेवटचा विश्वचषक खेळत असलेला 39 वर्षांचा योद्धा. यावेळी चमत्कार घडला नाही.
काही परीकथा सुखांत असतात. काही मात्र इतक्या सुंदर असतात की त्यांचा शेवट दुःखद असलाच पाहिजे; कारण त्यानेच त्या अमर होतात. स्पेनने हा अंतिम सामना जिंकला, यात शंका नाही. पण त्यांनी केवळ अर्जेंटिनाला हरवले नाही; त्यांनी एका युगाचा शेवट लिहिला. अर्जेंटिनाच्या महानतेवर स्पेनच्या ‘टिकीटाका’ शैलीने मिळवलेला तो विजय होता.
संपूर्ण स्पर्धेत अनेक वेळा मृत्यूच्या दारातून परतलेला अर्जेंटिना यावेळी मात्र उठू शकला नाही. फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये अवघ्या 37 सेकंदांत केलेला गोल हा केवळ विजयी गोल नव्हता; तो एका स्वप्नाचा शेवट होता. लक्षात घ्या, संपूर्ण वर्ल्डकपमध्ये स्पेनने फक्त एकच गोल स्वीकारला. यावरून त्यांच्या अभेद्य बचावाची ताकद लक्षात येईल. आणि मग कॅमेरा पुन्हा एकदा मेस्सीकडे गेला. 19 वर्षांचा लामिन यामाल फेरान टोरेसला मिठी मारत होता. फुटबॉलच्या नव्या युगाने जल्लोष सुरू केला होता, तर दुसरीकडे फुटबॉलच्या एका महान पर्वाने शांतपणे निरोप घेण्याची तयारी केली होती.
हा क्षण केवळ पराभवाचा नव्हता. हा काळाच्या हाती मशाल सोपवण्याचा क्षण होता. एके काळी डिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद दिले. त्यानंतर मेस्सीने त्या वारशाला न्याय दिला. आता कदाचित यामाल, पेड्री, गावी किंवा एखादा नवा सुपरस्टार पुढची कहाणी लिहेल. पण मेस्सीसारखा अध्याय पुन्हा लिहिता येईल का?
बहुधा नाहीच! कारण आकडे महान बनवत नाहीत. विश्वचषक, बॅलन डी’ऑर, गोल, विक्रम हे सारे महत्त्वाचे आहेत. पण मेस्सीला महान बनवणारी गोष्ट वेगळी होती. चेंडू पायाशी आला की लाखो लोकांना अशक्य शक्य होईल, अशी जी श्रद्धा वाटायची, ती फक्त त्याच्याकडे होती. त्यामुळेच अंतिम शिट्टी वाजल्यानंतर अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. कारण त्यांना माहीत होते, हा पराभूत खेळाडू नाही; हा त्यांचा अभिमान आहे. एखाद्या खेळाडूचे महानत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज नसते. ते काळ स्वतः मान्य करतो.
होय, स्पेनने विश्वचषक जिंकला. पण त्या रात्री ‘मेटलाईफ स्टेडियम’मधून बाहेर पडताना हजारो लोकांच्या मनात चषक नव्हता; त्यांच्या मनात होता, गळ्यात रौप्यपदक घालून शांतपणे चालणारा एक माणूस. कारण काही खेळाडू ट्रॉफी जिंकतात. आणि काही खेळाडू लोकांची हृदये! लिओनेल मेस्सीने अब्जावधी फुटबॉल शौकीनांची हृदये जिंकली.
2026च्या विश्वचषकाची कथा म्हणून दोन ओळींत सांगता येईल. सर्वोत्तम खेळाडू मेस्सी होता; पण सर्वोत्तम फुटबॉल स्पेन खेळला. आणि विश्वचषक नेहमीच त्या संघाला मिळतो, जो केवळ प्रतिस्पर्ध्याला हरवत नाही, तर फुटबॉलच्या सौंदर्यालाच नवी उंची देतो. स्पेन या विजेतेपदाचा खऱ्या अर्थाने हकदार होता.
- संदीप चव्हाण