पाकिस्तान पुरस्क़ृत दहशतवादाने देशातील नागरिकांचे गेली काही दशके रक्त सांडले. मात्र, मोदी सरकारच्या काळात सीमा भागात वाढलेल्या सुरक्षेमुळे, पाकिस्तानातून दहशतवाद्यांना घुसखोरी निव्वळ अशक्य झाली आहे. त्यामुळेच त्यांनी मदरशांतील तरुणांच्या ब्रेनवॉश करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा आता ही जाळीही उद्ध्वस्त करत आहेत...
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने जिहादी निर्माण करणारे आणि अशा धर्मांध व्यक्तींना बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण देणारे साहित्य, मोठ्या प्रमाणात जप्त केले. गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या या कारवाईमध्ये, ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेशी संबंधित 13 जणांना अटक केली आहे. जिहादी मानसिकता तयार करण्याचे शिक्षण मदरशांमधून दिले जात असल्याचे, या कारवाईच्या माध्यमातून लक्षात आले आहे. जिहादी मानसिकता निर्माण करण्यासाठी, या संघटनेतील अतिरेक्यांकडून नवनवीन पद्धतींचा वापर केला जात असल्याचेही दिसले. जिहादी तयार करण्यासाठी ‘अकेला जिहादी’ या नावाची एक पुस्तिका तयार करण्यात आली असून, या पुस्तिकेचे वितरण आरोपींना करण्यात आल्याचे समोर आले आहे. मदरशांमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेत असलेल्या युवकांना, जिहादसाठी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. तसेच अन्य विद्यार्थ्यांनाही त्या मार्गावर वळविण्यासाठी संबंधित प्रयत्न करत असत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून, मदरशांमध्ये किमान तीन मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत होते. विद्यार्थ्यांना जिहादसाठी प्रवृत्त करण्यासाठी, अशा मेळाव्यांचे आयोजन केले जात असे.
गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने, गेल्या दि. 3 जुलैच्या सुमारास ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित आठजणांना अटक केली. काहींना गुजरातमधून, तर एकास मध्य प्रदेशातील देवास येथून ताब्यात घेण्यात आले. अहमद अब्दुल्ला गाझीवाला, इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा, मुदस्सीर अब्दुला गाझीवाला, झकारिया दुर्रानी मोहम्मद अम्मार घाघा, मुफ्ती फौजन इस्माईल दाउवा, मोहम्मद अमीन शेरा , मोहम्मद अब्दुल रहमान सावदी आणि बिलाल दुर्रानी मोहम्मद अम्मार अशी त्यांची नावे आहेत.
अटक करण्यात आलेल्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्या दहशतवादी जाळ्याचे एकेक पदर उलगडू लागले. गुजरात पोलिसांनी पाटण जिल्ह्यात सिद्धपूर तालुक्यातील खादियाल या गावात छापे टाकले. तेथून आणखी पाचजणांना अटक करण्यात आली. या पाचजणांना मेहसाणा जिल्ह्यातील कडी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर, त्यांना दि. 24 जुलैपर्यंत ‘एटीस’ कोठडी देण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करता, पकडण्यात आलेले अनेक आरोपी पाटण जिल्ह्यातील खादियाल येथे असलेल्या जामिया अबुल हसन मदरशामध्ये वास्तव्यास होते. तीन आरोपी या मदरशाशी संबंधित होते. त्यांच्याकडून ‘आयईडी’कसे बनवायचे याचे वर्ग घेतले जात. ‘हाऊ अ लोन मुजाहिद शुड वेज जिहाद’ असे शीर्षक असलेल्या पुस्तिकेतील ‘बॉम्ब कसे तयार करावेत’ या तंत्रज्ञानाची माहिती, शिक्षण घेणाऱ्यांना दिली जात असे. ‘आयईडी’ची निर्मिती आणि त्याची लहानशा प्रमाणात चाचणीही घेतली जाई. एक संघटनात्मक जाळे निर्माण करण्यामध्ये, हे अतिरेकी सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले. काही अतिरेक्यांनी स्फोटकांच्या उत्पादनासंदर्भात प्रयोग केल्याची माहितीही, गुजरात दहशतवादविरोधी पथकाचा हाती लागली. मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांचे ‘ब्रेनवॉशिंग’ करायचे आणि त्यांना इस्लामी तत्त्वज्ञानासंदर्भात अधिक कट्टर बनवण्याचा कार्यक्रम, या अतिरेक्यांकडून चालवला जात असे. ‘हाऊ अ लोन मुजाहिद शुड वेज जिहाद’ ही पुस्तिका एक महत्त्वाचा पुरावा असल्याचे, ‘एटीस’चे म्हणणे आहे. पकडण्यात आलेल्या 13 आरोपींनी या पुस्तिकेचा सखोल अभ्यास करून, सर्व माहिती जाणून घेतली. या अतिरेक्यांनी 2023 ते 2026 या कालावधीत किमान आठ ठिकाणी स्फोटके, ‘आयईडी’ आदींच्या चाचण्या घेतल्याचे तपासात आढळले. पकडण्यात आलेल्यांतील एकाने, टाईम बॉम्ब निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती सरकारी वकिलाकडून न्यायालयात देण्यात आली. पकडण्यात आलेल्यांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता यातील विविध कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातील दोनजणांचा पाकिस्तानमधील बहलावपूर येथे असलेल्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या मुख्यालयाशी संपर्क होता, असेही तपासात आढळले.
गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये, ‘जैश’च्या जाळ्याचा उलगडा झाला आणि काही अतिरेक्यांना अटकही करण्यात आली. एकट्या गुजरातमध्ये ही कारवाई झाली. ‘जैश’शी संबंधित असे अनेक अतिरेकी, देशाच्या विविध भागांमध्ये नक्कीच कार्यरत असतील. त्यांच्या शोध पोलीस यंत्रणा घेतीलच. आपणही सदैव जागरूक राहून अशा संशयितांची माहिती तपास यंत्रणांना देत राहिल्यास, अशी ‘जैश’ची जाळी त्वरेने उद्ध्वस्त होतील.
बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहीम
भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान असलेल्या सीमाभागातून जी घुसखोरी होत आहे, त्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने जोरदार मोहीम उघडली. बांगलादेशी नागरिकांची भारतात तस्करी करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत, त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई आरंभली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या असून, त्या दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे, सुरत आदी शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांची तस्करी करत असल्याचेही समोर आले आहे. प. बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोंगाव येथील रहिवासी, सहाबुद्दिन मोंडल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केला आहे. मानवी तस्करी करणाऱ्यांचे जे संघटित जाळे आहे, त्याचा सहाबुद्दिन मोंडल हा एक भाग असल्याचे तपास यंत्रणेच्या लक्षात. ज्या भागात तारेचे कुंपण नाही, तसेच सीमेवर दुर्गम असलेल्या ठिकाणातून पैशांच्या मोबदल्यात अशी तस्करी होत असल्याचेही आढळले.
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बोंगाव आणि बागडा येथून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याचे दिसले. भारतात आल्यानंतर या बांगलादेशी लोकांना, रस्तामार्गे हावडा रेल्वे स्थानकात आणण्यात येत असे आणि तेथूनच देशाच्या विविध भागांमध्ये त्यांची रवानगी या टोळ्यांकडून केली जाई. मानवी तस्करीचे एक सुसंघटित जाळे, या तस्करांच्या टोळीकडून चालविले जात असल्याचे आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर लागेबांधे असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ही तस्करी लक्षात घेता, भारत-बांगलादेश सीमेवर तातडीने कुंपण घालण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे कुंपण घालण्यासाठी राज्य शासनाने 1025 एकर जमीन सीमासुरक्षा दलाला दिली असून, प. बंगालमधील सीमाभागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्या भागाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ही मानवी तस्करी रोखण्यासाठी, अधिक प्रभावी उपाययोजना करण्यावर नक्कीच मंथन होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
पाकिस्तानी ‘दलाल’ फसले!
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, लष्करप्रमुख-फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही, याबद्दल पाकिस्तानच्या या नेत्यांचे कौतुक केले होते. पण, दोन्ही देशांत जो युद्धबंदीचा करार झाला होता, तो पाळण्याच्या स्थितीत अमेरिका नाही आणि इराणही नाही. एकीकडे सौदी अरबचे सुरक्षा भागीदार म्हणून भूमिका बजावायची आणि दुसरीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबावे यासाठी मध्यस्थी करायची, अशी पाकिस्तानची भूमिका राहिली आहे.
पण, इराण समर्थित ‘हुती’, ‘शिया’ अतिरेकी सौदी अरबवर क्षेपणास्त्रांचा मारा करीत आहेत. अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तानची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. मध्य-पूर्वेतील घडामोडीच्या संदर्भात सर्वपक्षीय बैठकीत बोलताना आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, भारत हे पाकिस्तानसारखे ‘दलाल राष्ट्र’ नसल्याचे वक्तव्य केले होते. अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यामध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानच्या भूमिकेकडे, त्यांचा नामनिर्देश होता. पाकिस्तान मध्यस्थीसाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांकडे प्रयत्न करीत आहे. पण, हे दोन्ही देश कोणाचेही ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. पाकिस्तानने 2025 मध्ये, सौदी अरबसमवेत एक संरक्षण सहकार्यविषयक करार केला. त्यानुसार, हजारो पाकिस्तानी सैनिक सौदीमध्ये आहेत. पाकिस्तानची लढाऊ विमानेही त्या देशात आहेत. पाकिस्तानच्या या लष्करी उपस्थितीमुळे, मध्यस्थी करण्याच्या त्या देशाच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला आहे. ‘सौदीवर झालेला हल्ला हा पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल,’ असे पाकिस्तानने इराणला सांगितले आहे. ‘हुती’ अतिरेक्यांनी सौदी अरबवर हल्ले सुरू ठेवल्यास, पाकिस्तानला अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना खूश ठेवता येणार नाही. मध्यस्थी करण्यात पुढाकार घेतलेला पाकिस्तान, ज्या नव्या घडामोडी घडत आहेत त्या लक्षात घेता, तोंडघशी पडणार असल्याची चिन्हे आहेत.
9869020732