मुंबई : वाढदिवस म्हटला की शुभेच्छा, केक आणि आनंदोत्सव असे काहीसे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी यंदाचा वाढदिवस वेगळ्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला. त्यांनी मुंबईतील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयात अवयवदानासाठी अधिकृत नोंदणी करून मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान देण्याचा संकल्प केला.
यावेळी बोलताना भांदिर्गे म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, समाजासाठी काहीतरी करण्याची संधी असते. माझ्या मृत्यूनंतर माझ्या अवयवांमुळे एखाद्याला नवजीवन मिळणार असेल, तर त्यापेक्षा मोठे भाग्य आणि समाधान दुसरे असू शकत नाही.”
या उपक्रमामुळे नायर रुग्णालयाच्या इतिहासात महत्त्वाची नोंद झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष म्हणून अवयवदानासाठी अधिकृत अर्ज करणारे हरिष भांदिर्गे हे पहिले व्यक्ती ठरले आहेत.
“आरोग्य समितीचे अध्यक्ष या नात्याने अवयवदानाबाबत समाजात जनजागृती करणे, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. “देशभरात आज हजारो रुग्ण हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे आणि इतर अवयवांच्या प्रतीक्षेत जीवन-मरणाशी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत एका व्यक्तीचे अवयवदान अनेकांना नवजीवन देऊ शकते, हाच खऱ्या अर्थाने मानवसेवेचा संदेश आहे,” असे त्यांनी सांगितले.
“मृत्यूनंतर शरीर संपते; मात्र आपल्या अवयवांमुळे अनेकांचे आयुष्य पुन्हा फुलू शकते. आपण या जगातून निघून गेल्यानंतरही आपल्या अस्तित्वाचा एक भाग कोणाच्या तरी श्वासात, हृदयाच्या ठोक्यात किंवा डोळ्यांतील प्रकाशात जिवंत राहू शकतो. यापेक्षा मोठे दान आणि मानवतेची सेवा दुसरी कोणती?” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले.
“समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करून, या पवित्र कार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले. “वाढदिवसानिमित्त घेतलेला हा संकल्प केवळ वैयक्तिक निर्णय नसून समाजात अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेंद्र मोहिते यांच्यासह रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि सहकारी कर्मचारी उपस्थित होते.