पावसाळ्यातील वाढत्या आर्द्रता आणि दमट वातावरणामुळे केसगळती, कोंडा, केस कोरडे व निजव होणे इत्यादींसारख्या समस्या उद्भवतात. त्यानिमित्ताने एकूणच केसांच्या समस्या, रासायनिक उत्पादनांचे दुष्परिणाम याविषयी...
आयुर्वेदानुसार केस (केश) हे शरीरातील अस्थी धातूचे (हाडांचे) मळ (उपउत्पादन) मानले जातात. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा शरीरात ‘आहार रस’ तयार होतो. या पोषणातून एकापाठोपाठ एक सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र) तयार होतात. जेव्हा अस्थी धातूचे पोषण होते, त्या प्रक्रियेतून केसांची निर्मिती होते. केसांच्या निर्मिती आणि पोषणाबाबत आयुर्वेदातील महत्त्वाचे सिद्धांत खालीलप्रमाणे आहेत:
पंचमहाभूते: केस प्रामुख्याने ‘पार्थिव’ (पृथ्वी तत्त्व) गुणांपासून बनलेले असतात.
पितृज भाव : आयुर्वेदानुसार गर्भोत्पत्तीत सहाव्या मासात गर्भात केसांची उत्पत्ती होते व जन्मानंतर ते वाढत असतात. गर्भधारणेच्या वेळी आई-वडिलांच्या जनुकांवरून केसांचा पोत, रंग आणि लांबी ठरते.
पोषण प्रक्रिया : ‘चरक संहिते’नुसार, पचनानंतर तयार झालेला किट्ट भाग (कचरा किव्हा मल) रोम-कूप (hair follicle) मार्गे केसांचे पोषण करतो. ‘सुश्रुत संहिते’नुसार, धमन्या (वाहिन्या) केसांच्या मुळांपर्यंत पोषणद्रव्ये पोहोचवतात.
आयुर्वेदात माणसाच्या तीन वेगवेगळ्या प्रकृती सांगितलेल्या आहेत.
प्रकृतीनुसार प्रत्येकाचे केस वेगवेगळे असतात. केस निरोगी राहण्यासाठी शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन दोषांचे संतुलन असणे आवश्यक आहे. वातदोषामुळे केस रुक्ष, दुभंगलेले व पातळ होतात.
पित्तदोषामुळे केसांचा रंग आणि उष्णतेचे नियमन होते. जास्त पित्त वाढल्यास केस पांढरे होणे किंवा गळणे (खालित्य) या समस्या उद्भवतात.
कफ दोषामुळे केसांची घनता व मुलायमपणा टिकून राहतो, तर त्याचे केस सिंग्ध, मऊ, लांब व सहसा कमी गळणारे असतात.
गर्भधारणेच्या वेळी आई-वडिलांच्या जनुकांवरून केसांचा पोत, रंग आणि लांबी ठरते, जसे आई-वडिलांपैकी कुणाचे केस कुरळे असतील, तर मुलांमध्ये पण कुरळे केस असू शकतात, पण हे सर्वांमध्ये होईल असे नसते. जर कुणाच्या आई-वडिलांपैकी एकाचे केस कुरळे, लांब किंवा दाट असतील, तर मुलांमध्ये केस तसे होऊ शकतात. केसांच्या आरोग्यासोबतच केसांचे विकारपण पालकांकडून मुलांकडे येत असतात, जसे अनुवांशिक पुरुषांमध्ये केस गळण्याची पद्धत ’Hamilton-Norwood scale'ने मोजली जाते. कपाळावर इंग्रजी ‘M’ आकाराचे टक्कल पडते आणि नंतर डोक्याचा वरचा भाग पूर्णपणे टकला होतो. स्त्रियांमध्ये टक्कल पडताना कपाळाची रेषा सहसा मागे जात नाही; परंतु डोक्याच्या मध्यभागी असणारी भांग रुंद होते आणि संपूर्ण डोक्यावर केस पातळ होतात, तर काही रुग्णांमध्ये कपाळावरील केसांची रेषा (Hairline) मागे जाते किंवा डोक्याच्या मध्यभागी केस पातळ होतात. कमी वयातच केसांच्या गळण्याचे व पिकण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ओपीडीत येणाऱ्या 100 पैकी 50 टक्के प्रमाण हे तरुण मुलांचे आहे. कमी वयात टक्कल पडत आहे, केस पिकत आहेत, केस खूप रुक्ष होत आहेत, खाज येत आहे अशा अनेक समस्या घेऊन तरुण रुग्ण येतात. वय कमी असताना का बरं असं होत असेल, असा रुग्णांचाच प्रश्न असतो. ‘हिस्टरी’ घेताना मला त्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. आजकाल ‘फॅशन’च्या नावाखाली कमी वयात केस कलर करणे, केस रचना करणाऱ्या उपकरणांचा अतिवापर, हायलाईट यांसारख्या गोष्टीमुळे केसांची नैसर्गिक, जन्मतः असणारी चमक व पोषण करणारी रूम कुपे नष्ट किंवा खराब होतात. अति उष्णतेमुळे केस आपली नैसर्गिक स्निग्धता गमावतात व त्यामुळे केस रुक्ष व मुळापासून कुमकुवत होऊन गळू लागतात. आयुर्वेदात म्हटले आहे की, अति गरम पाणी डोक्यावरून घेऊ नये, अति उष्ण गोष्टीपासून केसांना सुरक्षित ठेवावे. पण ‘फॅशन’च्या नादात आपण आपल्या केसांना अति उष्ण उपकरणाने हाताळतो. तसेच जेव्हा आपण केसांना ‘फॅशन’च्या नावाखाली वेगवेगळ्या रंगांनी रंगवतो, तेव्हा ते करताना असणाऱ्या प्रक्रियेत अति प्रमाणात रासायनिक द्रव्य उपयोगात आणली जातात. काही कालावधीसाठी ते सुंदरपण दिसते; पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या formaldehyde आणि अति उष्णतेमुळे केसांचे गंभीर नुकसान होते. यामध्ये मुख्यत्वे केसांचा कोरडेपणा, अति प्रमाणात केस गळणे, तुटणे, टाळूला खाज सुटणे किंवा जळजळ होणे, यांचा समावेश आहे. तसेच वारंवार ’Keratenin', 'blow dry', ’हायलाईट’ केल्यामुळे केसांचा नैसर्गिक पोत कायमचा संपतो. केस पांढरे होणे, ही एक सामान्य समस्या आहे, जी मुख्यतः शरीरातील ‘मेलॅनिन’ (Melanin) नावाच्या रंजकाची पातळी कमी झाल्यामुळे किंवा अनुवांशिकता, ताणतणाव आणि जीवनशैलीतील बदलांमुळे होते. जेव्हा केस पांढरे व्हायला सुरुवात होते, तेव्हा आपण त्यांना रंग न लावता, आपल्या जीवनात बदल केले, तर कमी पांढरे असलेले केस पूर्ण पांढरे होण्यापासून आपण थांबवू शकतो. पण, तेव्हा आपण केसांना रंग लावायला सुरुवात करतो व काही काळानंतर ती आपली गरज बनते. केसांना रंग लावणे ‘फॅशनेबल’ असले, तरी त्यातील ‘अमोनिया’ आणि इतर रसायनामुळे केस कोरडे निजव होणे, फाटे फुटणे, केस मुळापासून कुमकवत होऊन गळणे, टाळूवर खाज जळजळ किंवा ॲलर्जी होणे इत्यादी परिणाम होऊ शकतात, तर काही लोकांना रंगांच्या ॲलर्जीमुळे ’scalp psoriasis' सारखी समस्या उद्भवू शकते.
हेअरस्टाईल मशीन (उदा. हेअर स्ट्रेटनर, कलरर आणि हेअर ड्रायर)चा अतिवापर केल्याने केसांमधील नैसर्गिक ओलावा आणि प्रोटीन नष्ट होतात. यामुळे केस कोरडे होणे, दोन फाटे फुटणे (split ends), केस तुटणे आणि निस्तेज होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मशीनच्या अति उष्णतेमुळे केसांमधील नैसर्गिक तेल आणि ओलावा निघून जातो. व केस रुक्ष होतात. तसेच केस ओढले जाऊन टाळूवर ताण येतो. आजकालच्या आधुनिक ‘फॅशनेबल’ जगात साधे, न कलर केलेले, तेल लावलेले केस म्हणजे ‘टिपिकल’ समजले किंवा ’out off fashion' समजले जातात, तर रंगीबेरंगी केस वेगवेगळ्या हेअरस्टाईल आधुनिक समजले जाते. त्यामुळे कोणी आवडीने, तर कोणी आधुनिक दिसण्याच्या दबावामुळे या सर्वांचा वापर करताना दिसतात. ओपीडीमध्ये रोज असे रुग्ण येत असतात, ज्यांचे अति प्रमाणात केस गळतात, अधून-मधून तुटतात, खूप रुक्ष झाले आहेत वगैरे वगैरे, तर 20 वर्षांखालील तरुण व्यक्तीमध्ये पण टकलेपणाचे प्रमाण वाढलेले आढळते. मग हे सर्व थांबवण्यासाठी, केसांची चांगली वाढ होण्यासाठी रासायनिक उत्पादनांचा सर्रास वापर केला जातो. रासायनिक केस उत्पादनांच्या (Chemical hair products) अति वापर केल्यास त्याचे केसांवर आणि आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. यामध्ये प्रामुख्याने शॅम्पू, हेअर डाय, कलर, स्ट्रेटनिंग क्रीम्स आणि हेअर स्प्रे यांचा समावेश होतो, जे आजकाल सर्व वयोगटांतील व्यक्ती, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्ती वापरतात.