मुंबई : (Vishwa Hindu Parishad) उबाठाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर परिसरात 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) समर्थकांनी क्रुरकर्मा औरंगजेबाचा फोटो झळकवल्याचे निदर्शनास आले. सोमवार, दि. २० जुलै रोजी सोनम वांगचून यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारला नीट पेपरफुटीबाबत जाब विचारण्याच्या निमित्ताने सीजेपीच्या समर्थकांनी एक रॅली आयोजित केली होती. याप्रसंगी रस्त्यावरून जाणाऱ्या एका हिंदू युवकास रॅलीमध्ये औरंग्याचा फोटो झळकवल्याची बाब लक्षात आली. त्याविरोधात त्याने आवाज उठवल्यानंतर संपूर्ण प्रकार लक्षात आला. (Vishwa Hindu Parishad)
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार, दि. १८ जुलै रोजी नागपूर येथे रामरक्षा महाआरतीचे आयोजन केले होते. त्यादरम्यान त्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आपण मुंबईत दादर परिसरात आंदोलन करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी अन्य सीजेपी समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर 'जिथे जिथे जे जे करणे शक्य असेल, ते शांततापूर्ण मार्गाने करा...' असे देखील ते म्हणाले होते. त्यांच्या आवाहनानंतर सोमवार, दि. २० जुलै रोजी दादर परिसरात सीजेपीच्या समर्थनार्थ रॅली निघाली. या रॅलीमध्ये एका महिलेने औरंगजेबाचा फोटो हातात धरल्याचे एका हिंदू युवकाच्या निदर्शनास आले. (Vishwa Hindu Parishad)
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार हिंदू युवकाने रॅलीमध्ये शिरून महिलेच्या हातून औरंग्याचा फोटो हिसकावला व नीट पेपरफुटी प्रकरणातील आंदोलनात औरंगजेबाचा फोटो वापरायचे कारण काय? अशा स्पष्ट शब्दांत जाब विचारला. तेव्हा उपस्थित आंदोलकांनीच हिंदू युवकास घेराव घालून त्याच्या अंकावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. ज्या दादर आणि शिवाजी पार्कच्या भूमीतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची वज्रमूठ बांधली, त्याच दादरमध्ये क्रूरकर्मा औरंगजेबाचे फोटो उघडपणे रॅलीतून झळकवणे, हा मूळ शिवसैनिकांच्या आणि तमाम शिवभक्तांच्या भावनांवर थेट प्रहार आहे. (Vishwa Hindu Parishad)
जर हा लढा केवळ विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि भविष्यासाठी होता, तर मग दादरसारख्या भागात काढलेल्या रॅलीमध्ये क्रूरकर्मा औरंगजेबाचे फोटो झळकवण्याची गरज का भासली? कॉकरोच जनता पार्टीचे समर्थन करताना औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रकार नेमका कोणता हेतू साध्य करण्यासाठी होता? आंदोलनाच्या आडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हा केवळ योगायोग नसून सामाजिक शांतता बिघडवण्याचा कट होता का? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे हिंदुत्ववादी संघटनांकडून याबाबत रॅलीच्या आयोजकांवर तात्काळ कारवाई व्हावी, याबाबत मागणी करण्यात आली आहे. (Vishwa Hindu Parishad)
रॅलीच्या आयोजकाला शोधून कारवाई करा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात क्रुरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण हिंदू समाज चालू देणार नाही. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात औरंग्याचा फोटो घेऊन आंदोलन करणाऱ्यांना नेमके काय हवे आहे? ते दंगल घडवू पाहतायत का? त्यांना धार्मिक तेढ निर्माण करायची आहे का? नीट पेपरफुटीचा मुद्दा बाजूला सारून हिंदू देवीदेवता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधत वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, हे संतापजनक आहे. दादरमधील रॅलीचा आयोजक कोण होता हे शोधून पोलिसांनी व प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाची मागणी आहे. (Vishwa Hindu Parishad)
- गौतम रावरिया, कोकण प्रांत सहसंयोजक, बजरंग दल
व्होटबँकेचे राजकारण करणारी उबाठा मूग गिळून गप्प!
दादरसारख्या परिसरात जिथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे सेनाभवन आहे, त्याठिकाणी निघालेल्या रॅलीमध्ये औरंगजेबाचा फोटो सीजेपी समर्थक घेऊन यायची हिंम्मत करूच कशी शकतात. उबाठाने हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याचे हे परिणाम आहेत. बाळासाहेबांच्या विचाराचा आमदार याठिकाणी असता, तर रॅलीमध्ये फोटो वापरायची हिंम्मत कोणी केलीच नसती. हिंदुत्वाच्या नावाखाली उबाठा केवळ व्होटबँकेचे राजकारण करत असून अद्यापही या प्रकारानंतर मूग गिळून गप्प आहेत.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक