पायवाटेवरून विद्यापीठाकडे...

    21-Jul-2026   

खान्देशातील छोट्या गावातून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास, आर्थिक अडचणींशी झुंज, अध्यापनाचे ध्येयवेड आणि सामाजिक बांधिलकीतून समाजकार्य करणाऱ्य प्रा. डॉ. सुधाकर अहिरे यांच्याविषयी...

जळगावच्या चोपडा तालुक्यातील निमगव्हाण या छोट्याशा गावात प्रा. डॉ. सुधाकर अहिरे यांचे बालपण गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. नंतर तांदळवाडी येथील जय श्री दादाजी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्याकाळात शाळेची इमारत नसल्याने, ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या खोल्यांमध्येच वर्ग भरत. शिक्षणाची ओढ आणि शिक्षकांची प्रेरणेमुळेच, अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. त्यांनी ‌‘स्काऊट‌’चे प्रशिक्षणही घेतले. मर्यादित साधनांमध्येही शिक्षणाची जिद्द कायम ठेवण्याचा संस्कार, याच काळात त्यांच्यावर झाला.

अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण चोपडा येथील, महात्मा गांधी शिक्षण संस्थेत झाले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने, सुधाकर यांचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. त्यामुळे शिक्षणाचा भार त्यांच्यावर टाकणे शक्य नसल्याने, सुधाकार यांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला. शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी शेतात काम केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शिकवणीही घेतली. पहिलीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते शिकवत. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच, त्यांनी शिक्षणाचा खर्च भागवला.

याच काळात त्यांच्यात अध्यापनाची रुची निर्माण झाली. त्यामुळेच, शिक्षक होण्याचा निर्धार सुधाकर यांनी केला. सुधाकर यांनी पदवीलाच इंग्रजी हा विशेष विषय निवडला. त्यानंतर प्राध्यापक होण्याचे ध्येय ठेवत, ‌‘एमए‌’ इंग्रजी, ‌‘सेट‌’ आणि ‌‘नेट‌’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचाही संकल्प केला.

याच्या पूर्ततेसाठी 2008 मध्ये सुधाकर यांनी पुणे गाठले. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून, त्यांनी ‌‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा‌’च्या इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेशही मिळवला. पुण्यात आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मित्र, बंधू आणि पत्रकार बंधूंनी त्यांना आर्थिक मदत केली. धाकटा भाऊ राहुल अहिरे याने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीत नोकरी करून, त्याने कुटुंबाला आधार दिला.

विद्यापीठाच्या ‌‘कमवा आणि शिका‌’ योजनेत सहभागी झाल्याने, सुधाकर यांना खर्चासाठी मदत मिळाली. पुढे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहण्याचीही सोय झाली.

मात्र, 2009 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील वेदनादायी ठरले. त्यांचे पितृछत्र हरपले. वडिलांचे पार्थिव बंगळुरू येथून गावी आणण्यासाठी, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली. मात्र, त्याचे भाडे देण्यासाठीही कुटुंबाकडे पैसे नव्हते. वडिलांच्या निधनाचे दुःख आणि आर्थिक संकट अशा स्थितीत मित्र, हितचिंतक आणि नातेवाईकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या सहकार्यामुळेच ॲम्ब्युलन्सचे भाडे देता आले. या प्रसंगाने आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व आणि माणुसकीचे मूल्य त्यांच्या मनावर कायमचे कोरले गेले. संघर्षातून मार्ग काढतच त्यांनी ‌‘एमए‌’, ‌‘एमफिल‌’ पूर्ण केले आणि ‌‘सेट‌’ व ‌‘नेट‌’ परीक्षा उत्तीर्ण केल्या.

पुढे विविध महाविद्यालयांत इंग्रजी विषयाचे अध्यापनही केले. नंतर ‌‘पीएचडी‌’ही केली. गेले एक तप सुधाकर अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून, सध्या पुण्यातील नामांकित महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ज्या ‌‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा‌’त शिक्षण घेतले, त्याच विद्यापीठात जवळपास दोन वर्षे अध्यापनाची संधी मिळणे, हे त्यांच्यासाठी विशेष होते. विद्यापीठात शिकताना प्रा. सागर शिंदे यांच्याशी सुधाकर यांचा संपर्क झाला, आणि त्यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी त्यांचे नाते दृढ झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये त्यांनी कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतला.

महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, ‌‘भारतरत्न‌’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि राजगुरू यांच्या विचारांचा, त्यांच्या जीवनावर मोठाच प्रभाव. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजातील, दुर्लक्षित घटकांसाठी योगदान देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. यातूनच गेल्या अनेक वर्षांपासून ते ‌‘विवेक विचार मंच, महाराष्ट्र‌’ या सामाजिक चळवळीशी जोडले आहेत. सध्या पुणे शहर, तसेच पुणे विद्यापीठ परिसराचे संयोजक म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. परिश्रम करून आर्थिक स्थैर्य मिळवणे आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणे, हा त्यांचा संकल्प आहे. शिक्षण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये काम करताना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी योगदान देण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.

शिक्षण, परिश्रमाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढता येतो, याची साक्ष म्हणजे सुधाकर यांचा प्रवास. खान्देशातील एका गावातून सुरू झालेली ही वाटचाल, आज अध्यापन, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’तर्फे प्रा. डॉ. सुधाकर अहिरे यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक कार्यास
मनःपूर्वक शुभेच्छा!

9967020364





सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर