मुंबई : (Assault Case Mumbai) शिवडी येथील दारूखाना परिसरात सार्वजनिक शौचालयातून परत येताना झालेल्या क्षुल्लक धक्क्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेच्या माहितीनुसार, दि. १५ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास तिची १६ वर्षांची मुलगी ही घरासमोरील सार्वजनिक शौचालयातून घरी परतत होती. त्यावेळी समोर राहणाऱ्या कमरूनिस्सा हिने मुलीला समोरून धक्का दिला. मुलीने याबद्दल विचारणा केली असता कमरूनिस्साने तिच्याशी वाद घालत भररस्त्यात तिच्या कानशिलात लगावली. मुलीने घरात येऊन रडत हा प्रकार सांगितल्यानंतर तक्रारदार महिला मुलीसह जाब विचारण्यासाठी घराबाहेर आली.(Assault Case Mumbai)
तक्रारदार महिला बाहेर येताच कमरूनिस्साने तिलाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान कमरूनिस्साचा पती वसिम तिथे आला आणि त्याने तक्रारदार महिलेचा भाचा रोहित सिंग याच्याशी वाद घालत त्याला हाताने व बांबूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर वसिमचा भाऊ इब्राईम आणि कमरूनिस्सा या दोघांनी रोहित सिंग व काजल सिंग यांना बांबूने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर कुटुंबातील इतर महिला सदस्य तजरूनिस्सा आणि जमुनिस्सा यांनीही तक्रारदार महिला, मुलगी, रोहित व काजल यांना मारहाण करत रस्त्यावरील दगड फेकून मारले.(Assault Case Mumbai)
माहिती मिळताच शिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पीडित कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले. पीडित महिलेच्या जबाबावरून शिवडी पोलिसांनी आरोपी वसिम, इब्राईम, कमरूनिस्सा, तजरूनिस्सा आणि जमुनिस्सा या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५(२), ११८(१), १८९(२), १९०, १९१(२), १२५(अ), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. शिवडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.(Assault Case Mumbai)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक