मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावरील टीकेला परराष्ट्रमंत्रालयाचे प्रत्युत्तर; जपानी मंत्री हिदेकी माकिहारा यांची टीका अवास्तव!

    20-Jul-2026

Bullet Train India
 
नवी दिल्ली : (Bullet Train India) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विलंबासाठी भारताला जबाबदार धरणार्‍या जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांना भारताने उत्तर दिले असून, त्यांची विधाने वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे म्हटले आहे. भारत-जपानदरम्यानचा उच्चगती रेल्वे प्रकल्प पूर्वनियोजित चौकटीत पुढे सरकत असून, दोन्ही देशांतील परस्पर सहकार्य पूर्ववत असल्याचेही मंत्रालयाने अधोरेखित केले.
 
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत आणि जपान यांच्यातील या महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाबाबत सातत्याने उच्चस्तरीय संवाद सुरू आहे. जपान भारताला ई-20 श्रेणीतील हाय स्पीड रेल्वे देणार असून, सध्या त्यांच्या निर्मितीचे काम सुरु आहे. या रेल्वे 2030च्या सुरुवातीला उपलब्ध होतील असेही जयस्वाल म्हणाले. तसेच,हाय स्पीड प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027मध्ये सुरु करण्यात दोन्ही बांजूंचे एकमत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांच्या टीकेला उत्तर देताना हे त्यांचे व्यक्तिगत मत असून, त्याचा वास्तवाशी संबंध नसल्याचेही जयस्वाल यांनी अधोरेखित केले.(Bullet Train India)
 
दरम्यान, जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाला झालेल्या विलंबाबाबत टीका करताना भारताला जबाबदार धरले असून, भारत दिलेली आश्वासने पाळत नसल्याची टीका केली होती. तसेच, एखादे वचन दिल्यास त्यापासून माघार घेतात अथवा त्यात बदल करतात असेही म्हटले होते. तसेच, हा प्रकल्प अयशस्वी ठरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.(Bullet Train India)
 
सिग्नलयंत्रणेवरुन दोन्ही पक्षात मतभिन्नता!
 
भारताने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानच्या पारंपरिक शिंकांसेन अर्थात डीएस-एटीसी प्रणालीऐवजी युरोपियन ट्रेन कंट्रोल सिस्टीम अर्थात ईटीसीएस लेव्हल 2 वापरण्याचा पर्याय निवडला. या निर्णयामुळे आणि भारताच्या स्वदेशी हाय-स्पीड ट्रेन निर्मितीच्या निर्णयामुळे, मतभिन्नता निर्माण झाली होती.(Bullet Train India)
 
 




संबंधित मजकूर