मानवी जिद्दीचा थांग

    20-Jul-2026   

Human Determination
 
सीढ़ियाँ उन्हें मुबारक हों
जिन्हें छत तक जाना है,
मेरी मंज़िल तो आसमाँ है,
रास्ता मुझे खुद बनाना है!
दि. २२ जुलै २००५. स्थळ लंडन. ख्रिस्टल पॅलेस अ‍ॅथलेटिस ग्रांप्री. इंग्लंडच्या त्या गुलाबी थंडीत आम्ही कानटोपी घालून एका ऐतिहासिक क्षणाची वाट पाहात होतो. महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये पाच मीटर ही उंची तेव्हा एव्हरेस्ट मानली जात होती! जगातील कोणत्याही महिलेला ती ओलांडता आली नव्हती.
 
रशियाची एलेना इसिनबायेव्हा धावपट्टीवर आली.
 
क्षणभर संपूर्ण स्टेडियम शांत झालं. तिच्या हातातला फायबरग्लासचा पोल वाकला, शरीर हवेत झेपावलं आणि एका क्षणात तिने ४.९६ मीटरची उंची पार केली. जगाचा नवा विक्रम! स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दणाणून गेलं. आम्हीही इतिहास डोळ्यांनी पाहिल्याच्या आनंदात हरवून गेलो.
 
पण एलेनाच्या डोळ्यांत अजून समाधान नव्हतं.
 
तिने पुन्हा बार पाच मीटरवर नेण्याची मागणी केली. स्टेडियममध्ये एकच कुजबुज सुरू झाली. हा अट्टाहास होता की वेडेपणा?
पुन्हा धाव, पुन्हा झेप आणि एका क्षणात मानवजातीने पहिल्यांदाच पाच मीटरची भिंत पार केली! त्या दिवशी आम्ही फक्त एक विश्वविक्रम पाहिला नव्हता; आम्ही मानवी क्षमतेच्या सीमा बदलताना पाहिल्या होत्या. त्या क्षणी मनात आलं होतं, बस्स! यापुढे याहून उंच कुणी जाऊ शकणार नाही.
 
पण महान खेळाडूंची खरी स्पर्धा इतरांशी नसते. ती स्वतःशी असते.
 
एलेनाने त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना नाही, तर स्वतःलाच हरवायला सुरुवात केली. एकदा-दोनदा नव्हे, तर तब्बल पाचवेळा तिने स्वतःचाच विक्रम मोडला. दि. २८ ऑगस्ट २००९ रोजी झ्युरिखमध्ये तिने ५.०६ मीटरची झेप घेतली आणि तो विक्रम गेली १५ वर्षे आजही जगाच्या माथ्यावर तसाच उभा आहे.
 
हे सगळं आज पुन्हा आठवण्याचं कारण म्हणजे, अमेरिकेत सुरू असलेला फुटबॉल विश्वचषक. फ्रान्सच्या किलियन एम्बाप्पेने इंग्लंडविरुद्ध तिसर्‍या क्रमांकाच्या सामन्यात दोन अप्रतिम गोल करत विश्वचषकातील आपल्या गोलांची संख्या २२ वर नेली आणि लिओनेल मेस्सीच्या २१ गोलांच्या विक्रमाला मागे टाकलं. सर्वाधिक गोलच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे जर्मनिचा मिरोस्लोव्ह लोस (१६ गोल), त्यानंतर आठव्या क्रमांकावर आहे, फुटबॉलचा सम्राट ब्राझिलचा पेले (१२ गोल). विशेषतः विश्वचषक हा चार वर्षांतून एकदाच येतो. एका खेळाडूला संपूर्ण कारकिर्दीत वर्ल्डकप खेळण्याच्या कदाचित चार किंवा पाच संधी मिळतात. एका दुखापतीने, एका चुकीच्या निर्णयाने किंवा एका अपयशी स्पर्धेने इतिहास बदलू शकतो. त्यामुळे या यादीतील प्रत्येक नाव हे मेहनत, मानसिक ताकद आणि योग्य वेळ यांचं अद्वितीय मिश्रण आहे.
 
हा लेख वाचेपर्यंत कदाचित मेस्सीने अंतिम सामन्यात पुन्हा शिखर गाठलं असेल. कदाचित नसेलही. पण हा लेख विक्रम कोणाच्या नावावर राहिला, यासाठी नाही. तो लिहिण्यामागचं कारण वेगळंच आहे. प्रत्येक पिढीला वाटतं की, आता मानवी क्षमतेची परिसीमा गाठली गेली आहे. रोजर बॅनिस्टर चार मिनिटांत एक मैल धावला, तेव्हा वाटलं होतं, यापुढे शक्य नाही. उसेन बोल्टने ९.५८ सेकंदांत १०० मीटर धावल्यानंतरही तेच म्हटलं गेलं. एलेनाने पाच मीटर ओलांडल्यानंतरही तेच ऐकायला मिळालं. आता एम्बाप्पेने विश्वचषकातील २२ गोल्सचा नवा मापदंड निर्माण केला आहे.
 
पण इतिहासाचा एक नियम आहे. विक्रम हे कायमस्वरूपी मुकुट नसतात; ते पुढच्या स्वप्नवेड्याला दिलेलं निमंत्रण असतं.
 
मानवाचा सर्वांत मोठा शत्रू गुरुत्वाकर्षण नाही, वेळ नाही आणि परिस्थितीही नाही. त्याचा सर्वांत मोठा शत्रू असतो, हे अशक्य आहे, हा विचार. आणि प्रत्येक महान खेळाडू आपल्या कारकिर्दीत तो विचार मोडून काढत असतो. एलेना इसिनबायेव्हाने बारच्या वरून उडी मारली नव्हती; तिने मानवी कल्पनाशक्तीच्या वरून झेप घेतली होती. एम्बाप्पेने फक्त गोल केले नाहीत; त्याने पुढच्या पिढीच्या मनात २२च्या पुढे जाण्याचं स्वप्न रुजवलं आहे. म्हणूनच खेळ हा फक्त विजय-पराभवाचा नसतो. तो मानवी उत्क्रांतीचा सर्वांत सुंदर प्रयोग आहे. प्रत्येक विक्रम सांगतो, इथपर्यंत आम्ही आलो; आता पुढे तुम्ही या!
 
आणि म्हणूनच, मानवी शरीराची मर्यादा असते; पण मानवी जिद्दीची नसते. एलेना इसिनबायेव्हा असो, किलियन एम्बाप्पे असो की उद्याचा एखादा अजून नावही नसलेला खेळाडू. मानवी जिद्दीचा थांग आजवर कुणालाच लागलेला नाही. आणि कदाचित कधी लागणारही नाही.




संबंधित मजकूर